20 वर्षांत 1.45 लाख कोटी जप्त
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
देशात मनी लॉन्ड्रिंग आणि त्याच्याशी निगडित प्रकरणांवर नजर ठेवणारी यंत्रणा ईडीने अलिकडेच पीएमएलएशी निगडित काही आकडे जारी केले आहेत. या कायद्याच्या अंतर्गत आतापर्यंत 1.45 लाख कोटी रुपयांच्या संपत्ती जप्त करण्यात आल्या आहेत. 2024-25 आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांमध्येच 21,370 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती असे ईडीकडून सांगण्यात आले. पीएमएलए हा 1 जुलै 2005 पासून लागू करण्यात आला होता. याचा उद्देश करचोरी, काळा पैसा जमविणे अन् मनी लॉन्ड्रिंग सारख्या गंभीर गुन्ह्यांना रोखणे आहे.
हा कायदा लागू झाल्यापासून ईडीने आतापर्यंत 911 जणांना अटक केली आहे. आतापर्यंत 44 प्रकरणांमध्ये पीएमएलए अंतर्गत 100 जणांना दोषी ठरविण्यात आले आहे. यातील 36 जणांना मागील वर्षाच्या एप्रिलपासून डिसेंबरदरम्यान दोषी ठरविण्यात आले. मागील 5-6 वर्षांमध्ये ईडीने मनी लॉन्ड्रिंग विरोधात स्वत:च्या कारवाईला वेग दिला असून अनेक नेते, व्यापारी, हवाला एजंट, सायबर गुन्हेगार अन् तस्करांना अटक करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
ईडीच्या आकडेवारीनुसार 2024 पूर्वी ईडीने एकूण 1.24 लाख कोटी रुपये जप्त केले होते. यातील बहुतांश संपत्ती म्हणजेच 1.19 लाख कोटी रुपये हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर जप्त करण्यात आले आहेत. परंतु मागील काही वर्षांमध्ये ईडीने पीएमएलएचा गैरवापर केल्याचा आरोप काँग्रेससमवेत अन्य विरोधी पक्षांनी केला आहे. तर आम्ही एक स्वतंत्र यंत्रणा असून आमचा तपास पूर्णपणे निष्पक्ष असतो असे ईडीने म्हटले आहे.
2024 मध्ये मोठे यश
भ्रष्टाचाराचे शिकार ठरलेले पीडित आणि बँका यासारख्या वैध दावेदारांना जप्त संपत्ती परत मिळवून देण्यात ईडीला 2024 मध्ये मोठे यश मिळाले आहे. ईडीने आतापर्यंत 22,737 कोटी रुपये वैध दावेदारांपर्यंत पोहोचविले आहेत. तर एप्रिल 2024 पासून आतापर्यंत 7,404 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत.