8 कंपन्यांच्या भांडवल मूल्यात 1.28 लाख कोटीची घसरण
टीसीएस, इन्फोसिसचे सर्वाधिक नुकसान : सेन्सेक्स 350 अंकासह होता घसरणीत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आघाडीवरच्या दहापैकी 8 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये 1 लाख 28 हजार कोटी रुपयांनी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये आयटी क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि इन्फोसिस यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये सर्वाधिक घसरण अनुभवायला मिळाली.
टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 37 हजार 971.83 कोटी रुपयांनी कमी होत 15 लाख 49 हजार 626 कोटी रुपयांवर राहिले होते. मागच्या आठवड्यामध्ये 8 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य एकंदर 1 लाख 28 हजार 913 कोटी रुपयांनी घसरणीत दिसून आले. इन्फोसिसचे बाजार मूल्य 23811 कोटींनी घटत 7 लाख 56 हजार 250 कोटी रुपयांवर राहिले होते. याच पद्धतीने आयटीसीचे बाजार भांडवल मूल्य 16619 कोटी रुपयांनी कमी होत 6 लाख 11 हजार 423 कोटी रुपयांवर राहिले. त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयचे बाजार मूल्य 13431 कोटी रुपयांनी कमी होत 7 लाख 56 हजार 717 कोटी रुपयांवर राहिले.
दिग्गज कंपन्याही नुकसानीत
यासोबत बाजारातील दिग्गज कंपनी आणि बाजार मूल्यामध्ये सर्वाधिक मूल्यासह आघाडीवर असणारी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल मूल्य 13 हजार 135 कोटी रुपयांनी कमी होत 20 लाख 28 हजार 695 कोटी रुपयांवर राहिले होते. याच दरम्यान दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलचे बाजार भांडवल 11821 कोटींनी घटक 8 लाख 50 हजार 389 कोटी रुपये आणि आयसीआयसीआय बँकेचे बाजार मूल्य 7843 कोटी रुपयांनी कमी होत 8 लाख 42 हजार 176 कोटींवर घसरले. हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार मूल्य 4288 कोटी रुपयांनी कमी होत 6 लाख 32 हजार 862 कोटी रुपयांवर राहिले.
यांच्या भांडवलात मात्र वाढ
याच दरम्यान दोन कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मात्र मागच्या आठवड्यात वाढलेले पाहायला मिळाले. यामध्ये एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मूल्य 32 हजार 759 कोटी रुपयांनी वाढत 12 लाख 63 हजार 601 कोटी रुपयांवर पोहचले तर एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य 1075 कोटी रुपयांनी वाढत 7 लाख 47 हजार 677 कोटी रुपयांवर पोहचले. मागच्या आठवड्यामध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 350 अंकांनी घसरणीत राहिला होता..
32 हजार कोटीची विदेशी गुंतवणूक
विदेशी गुंतवणूकदारांनी 32 हजार 365 कोटी रुपयांची शेअरबाजारात गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक एकंदर जुलैमध्ये करण्यात आली आहे. दुसरीकडे ऑगस्टच्या पहिल्या दोन सत्रांमध्ये म्हणजे एक आणि दोन ऑगस्ट रोजी गुंतवणूकदारांनी 1027 कोटी रुपये बाजारातून काढून घेतले आहेत.