7 कंपन्यांच्या भांडवल मूल्यात 1.22 लाख कोटीची घसरण
टीसीएस, रिलायन्सचे नुकसान : भारती एअरटेल, इन्फोसिस मात्र नफ्यात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शेअर बाजारातील आघाडीवरच्या 10 पैकी 7कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये 1 लाख 22 हजार 107 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या भांडवलात मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.
मागच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 360 अंकांनी घसरत 81,381 अंकांवर राहिला होता. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांचे बाजार भांडवल मूल्य 35 हजार 638 कोटी रुपयांनी कमी होत 15 लाख 1723 कोटी रुपयांवर राहिले होते.
रिलायन्सच्या मूल्यातही घसरण
त्याचप्रमाणे भांडवल मूल्यात आघाडीवर असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीचे बाजार भांडवल मूल्यसुद्धा 21351 कोटी रुपयांनी कमी होत 18 लाख 55 हजार 366 कोटी रुपयांवर राहिले होते. यासोबतच आयटीसीचे बाजार भांडवल मूल्यसुद्धा 18,761 कोटी रुपयांनी कमी होऊन 6 लाख 10 हजार 933 कोटी रुपयांवर राहिले होते. आणखीन एक दिग्गज कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजारमूल्य 16 हजार 47 कोटी रुपयांनी कमी होत 6 लाख 53 हजार 315 कोटी रुपयांवर घसरले. एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य 13 हजार 946 कोटी रुपयांनी कमी होत 6 लाख 179 कोटी रुपयांवर आले होते.
यांचे मूल्य मात्र वाढले
तर दुसरीकडे दोन कंपन्यांचे बाजार भांडवल मात्र वाढलेले दिसून आले. यामध्ये भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य 26,330 कोटी रुपयांनी वाढत 9,60,435 कोटी रुपयांवर पोहचले आहे तर इन्फोसिसचे भांडवलमूल्य 6913 कोटी रुपयांच्या वाढीसह 8,03,440 कोटी रुपयांवर पोहचले होते.