8 कंपन्यांच्या बाजार भांडवलात 1.21 लाख कोटींची वाढ
1027 अंकांनी वाढता होता सेन्सेक्स : रिलायन्स आघाडीवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागच्या शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात देशातील आघाडीवरच्या 10 पैकी 8 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 1.21 लाख कोटींनी वाढले आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज ही बाजार भांडवल मूल्यात वाढ करण्यामध्ये आघाडीवर राहिली आहे.
मागच्या आठवड्यामध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 1027 अंकांनी किंवा 1.21 टक्के वाढलेला पाहायला मिळाला. शुक्रवारी सेन्सेक्स निर्देशांकाने 25,978 ची सर्वोच्च पातळी गाठली होती. याच दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल मूल्य 53,652 कोटी रुपयांनी वाढत 20 लाख 65 हजार 197 कोटी रुपयांवर पोहोचले.
यातुलनेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल मूल्य 18518 कोटींनी वाढत 7 लाख 16 हजार 333 कोटी आणि दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलचे बाजार भांडवल 13 हजार 94 कोटींसह 9 लाख 87 हजार 904 कोटी रुपयांवर पोहोचले होते.
आयटी क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांचे बाजार भांडवल मूल्य 8592 कोटींनी वाढत 15 लाख 59 हजार 52 कोटी रुपयांवर तर एफएमसीजी क्षेत्रातील आयटीसीचे भांडवल मूल्य 9927 कोटींनी वाढत 6 लाख 53 हजार 834 कोटी रुपयांवर पोहोचले होते. याचप्रमाणे एचडीएफसी बँकेचे 8581 कोटींसह 37 हजार 186 कोटी रुपयांवर आणि जीवन विमा कंपनी एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य 843 कोटींसोबत 6 लाख 47 हजार 616 कोटी रुपयांवर पोहोचले होते. यासोबतच इन्फोसिसचे मूल्य 459 कोटींनी वाढत 7 लाख 91 हजार 897 रुपयांवर स्थिरावले होते.
यांचे भांडवल मूल्य घसरले
दुसरीकडे काही कंपन्यांचे बाजार भांडवल मात्र घसरलेले पाहायला मिळाले. यामध्ये हिंदुस्थान युनिलिवरचा समावेश होता. हिंदुस्थान युनिलिवरचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये 3195 कोटी रुपयांनी कमी होत 6 लाख 96 हजार 888 कोटी रुपयांवर राहिले होते. याचप्रमाणे आयसीआयसीआय बँकेचे बाजार मूल्यसुद्धा 23,706 कोटींनी कमी होत 9,20,520 कोटींवर घटलेले पाहायला मिळाले.