गुंतवणुकीच्या आमिषाने 38 लाखांची फसवणूक
सातारा :
शेअर मार्केटिंगमध्ये पैसे गुंतवा, तुम्हाला 4 टक्के नफा मिळवून देतो, अशी बतावणी करुन शाहीनाथ पारुजी घोलप (रा. इंदिरानगर, नाशिक) याने सातारा शहरातील 11 जणांची सुमारे 38 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, कैलास हणमंतराव धुमाळ (वय 60, रा. सुयोग हौसिंग सोसायटी, सदरबाजार) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते कृषी विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना व त्यांच्या इतर सहकाऱ्यांना डिसेंबर 2023 ते जानेवारी 2025 दरम्यान संशयित घोलप याने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा, तुम्हाला गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर दामदुप्पट रक्कम व 4 टक्के नफा मिळवून देतो, अशी बतावणी करुन पैसे गुंतवण्यास भाग पाडले. त्यानंतर 11 जणांनी त्याच्याकडे पैसे गुंतवले. त्याने सुमारे 38 लाखांची फसवणूक केली असून त्यावरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी करत आहेत.