ऊसतोडीसाठी कामगार देण्याच्या बहाण्याने 16 लाखांची फसवणूक
उंब्रज :
नांदगाव (ता. कराड) येथील एकास ऊसतोडीसाठी कामगार पुरवतो असे सांगून सुमारे 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपीला पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 6 फेब्रुवारी 2025 रोजी तळबीड पोलीस ठाणे येथे तक्रारदार रितेश पाटील (रा. नांदगाव, ता. कराड) यांनी संशयित आरोपी काशिनाथ प्रल्हाद जाधव (वय 36, रा. ढोकसाळ, ता. मंठा, जि. जालना) व त्याच्या इतर दोन साथीदारांनी ऊसतोडीसाठी कामगार पुरवतो असे सांगून वेळोवेळी तक्रारदार रितेश पाटील यांची सुमारे 16 लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संशयित आरोपी चाकण (ता. खेड, जि. पुणे) येथे लपून बसल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांना मिळाली. त्यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार केले. संशयितांचा शोध घेण्यासाठी हवालदार योगेश भोसले, पोलीस कॉन्स्टेबल निलेश विभूते यांना आदेश दिले. त्यांनी संशयित काशिनाथ जाधव याचा चाकण येथे जाऊन शोध घेतला. त्याला स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स, विघ्नेश पार्क, चाकण येथून 21 मार्च रोजी रात्री दीडच्या सुमारास अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.