कराड शहराच्या विकासासाठी 10 कोटी मंजूर
कराड :
गणपती बाप्पाच्या आगमनाने कराड शहर सणाच्या उत्साहात न्हाऊन निघाले असतानाच; भाजप-महायुती सरकारने कराड शहरातील विविध विकासकामांसाठी तब्बल 10 कोटींचा निधी मंजूर करुन कराडकरांचा आनंद द्विगुणित केला आहे. भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीच्या माध्यमातून, शहरात नवी उद्याने व क्रीडांगण, सामाजिक सभागृहे, प्रशासकीय इमारतीचे नूतनीकरण, स्मशानभूमीचा विकास अशा पायाभूत कामांना चालना मिळणार आहे. त्यामुळे कराड शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे.
कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले विशेष प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ‘नगरपरिषदांना वैशिष्ट्यापूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ या योजनेअंतर्गत नगर विकास विभागाच्यावतीने कराडसाठी 10 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून शासन आदेश आज प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या निधीच्या माध्यमातून कराड नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे नूतनीकरण व फर्निचर कामासाठी 3.50 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. तसेच नगरपरिषदेच्या मालकीची हिंदू स्मशानभूमी विकसित करणे (1.25 कोटी), शनिवार पेठेतील आरक्षित भूखंड क्रमांक 72 मधील गार्डन विकसित करणे (1 कोटी), मंगळवार पेठेतील खुल्या जागेत गार्डन विकसित करणे (1 कोटी), बुधवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह व व्यापारी संकुलाचे बांधकाम करणे (1 कोटी), तसेच याच परिसरातील नगर भूमापन क्र. 35 या सार्वजनिक जागेत अभ्यासिका बांधणे (1 कोटी), रविवार पेठेतील सर्व्हे नंबर 430 येथे कुंभार समाजाचे सामाजिक सभागृह बांधणे (50 लाख), नगरपरिषदेच्या मालकीच्या आरक्षण क्रमांक 16 मधील खेळाचे मैदान विकसित करणे (50 लाख) आणि नगरपरिषदेच्या मालकीच्या आरक्षण क्रमांक 17 मधील गार्डन विकसित करणे (25 लाख) अशी विकासकामे साकारली जाणार आहेत.
या विकासकामांमुळे शहरातील पायाभूत सुविधा विस्तारण्यास मदत होणार आहे. तसेच शहरातील खुल्या जागांचा विकास होणार असल्याने नव्या उद्यानांची भर पडणार आहे. खेळाच्या मैदानांचा विकास आणि अभ्यासिकेच्या उभारणीमुळे याचा युवावर्गाला मोठा लाभ होणार आहे. निधी मंजूर केल्याबद्दल शहवासीयांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह भाजपा-महायुती सरकारचे आभार मानले जात आहेत.
- कराडचा चेहरामोहरा बदले
भाजपा-महायुती सरकारने मंजूर केलेल्या या निधीमुळे कराडचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे. या निधीतून शहरात उद्याने, खुल्या जागांचा विकास, खेळाचे मैदान, अभ्यासिका, सभागृह व व्यापारी संकुलाची उभारणी अशा विविध पायाभूत सुविधांची उभारणी केली जाणार आहे. येथून पुढेही कराडकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या माध्यमातून भरघोस निधी मिळवून देण्यास मी कटीबद्ध आहे.
-आमदार डॉ. अतुलबाबा भोसले,जिल्हाध्यक्ष, भाजपा