हिंदोळेतील सप्तकोटेश्वराची साडेतीन शतके
डिचोली तालुक्यातल्या पूर्वाश्रमीच्या हिंदोळे गावात डोंगराच्या खोलगट भागात मांडवीच्या उजव्या तीरावर गोवा कदंब राजकर्त्यांचे दैवत असलेल्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा छत्रपती शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केल्याला साडेतीनशे वर्षे पूर्ण झालेली आहेत. अशा पार्श्वभूमीवर या मंदिराला नवा साज दिला जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून, सर्वधर्मसमभाव वृत्तीचा प्रसार केला असला तरी सोळाव्या शतकातल्या धर्मसमीक्षण संस्थेच्या माध्यमातून धर्मांध पोर्तुगीजांनी आरंभलेल्या अमानवीय कृत्यांना वेसण घालण्यासाठी कठोर पावले उचलली. 1541 ते 1559 या काळात पोर्तुगीजांनी इथल्या जनतेवर जे धार्मिक आणि सांस्कृतिक ऱहासपर्व कार्यान्वित केले आणि सर्वसामान्यांच्या श्रद्धा आणि संचितांची जी तोडफोड केली, त्याची अन्यत्र अपवादात्मक तुलना होऊ शकते.
आज अंत्रुज महालातल्या ज्या दैवतांनी देवभूमीच्या लौकिकात मानाचा तुरा खोवलेला आहे, त्यांचे स्थलांतर जुवारी नदी ओलांडून मांडवी काठावरच्या कुळागरी प्रदेशात होऊन हिंदवी स्वराज्याची अभिवृद्धी नव्या काबिजादीत झाली, त्याला शिवाजी महाराज कारणीभूत ठरले. दीपवती बेटावरचा सुपिक प्रदेश तिथल्या सप्तकोटेश्वर, महागणपती आदी दैवत परिवारामुळे दिवाळीच्या लौकिकास नित्यदिनी पात्र ठरला होता. तेथे पोर्तुगीजांनी धार्मिक छळाचा उच्छाद मांडला. ‘पोरणे तीर्थ’ आणि तिथली कोकण काशी त्यांनी अक्षरशः जमीनदोस्त करून टाकली. इथल्या जाती-जमातींना सक्तीने धर्मांतरीत केले.
इथली कटू वार्ता शिवरायांच्या कानी पडली आणि त्यासाठी त्यांनी गोवा-कोकणची मोहीम हाती घेतली. 30 नोव्हेंबर 1667 रोजी त्यांनी चार पाद्रय़ांना हिंदू धर्म स्वीकारण्यास भाग पाडले, असा जो इंग्रजांच्या पत्रात उल्लेख आहे आणि धर्म बदलण्यास नकार दिल्याने त्यांचा शिरच्छेद केला, ही नोंद संभवनीय नाही, असे इतिहासकार डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांनी स्पष्ट केलेले आहे. बार्देश स्वारीत शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याने हस्तगत केलेली सर्व लूट, स्त्रिया व मुले, पोर्तुगीजांना परत करण्यात आल्याचे विजरई कोंदिद साव्हिसेंती याने पोर्तुगालला कळविले होते. या प्रसंगावरून महाराजांच्या एकंदर वृत्तीची कल्पना मिळते. ही स्वारी करून, त्यांनी ‘रोम ऑफ द ईस्ट’मध्ये रुपांतरीत ओल्ड गोव्याच्या (एला) दुसऱया किनारी श्री सप्तकोटेश्वर मंदिरात जीर्णोद्धार 13 नोव्हेंबर 1668 रोजी करून जबरदस्त चपराक दिली होती. जीर्णोद्धाराचा उल्लेख असलेला शिवकालीन शिलालेख या गौरवमयी इतिहासाची साक्ष आहे.
आज डिचोली नगरपालिका क्षेत्रात येणाऱया व्हाळशीत स्थायिक वाळवे कुटुंब श्री सप्तकोटेश्वर, मयेची श्री केळबाय त्याचप्रमाणे डिचोलीची अधिष्ठात्री श्री शांतादुर्गा देवस्थानाशी संबंधित असले पाहिजे. 1636च्या ‘मये आगर दानपत्र’ असा उल्लेख असलेल्या कागदपत्रात श्री सप्तकोटेश्वराच्या मंदिराचा संदर्भ असून त्यात वेदमूर्ती केसभट वाळुवे यांना अब्रवनग्राम विठ शेणवी सूर्याराव नारायण सेणवी सूर्यराव यांनी दान दिल्याचा उल्लेख आहे. त्यात माडाचे आगर आणि वडाचे भाट येथील कुळागरांचे दान केल्याचे म्हटले आहे. 19 नोव्हेंबर 1668 रोजी केसभटाचा पुत्र पुरोसोतम भट याला चेंदवण गाव दिल्याचा उल्लेख आहे. 24 जून 1674च्या पत्रात वेदमूर्ती वालवे यास उपसर्ग न देणे असा उल्लेख असलेले पुरुषोत्तम भट वाळवे शिवछत्रपतींना राज्याभिषेक करणाऱया ब्राह्मणांपैकी एक होते, असे संदर्भ आढळतात परंतु हे पत्र कोल्हापूरचे शिवाजी द्वितीय यांचे असल्याचे गजानन मेहेंदळे यांनी नमूद केलेले आहे.
1749च्या कागदपत्रात भतग्राम पोर्तुगीजांच्या ताब्यात आल्यापासून श्री सप्तकोटेश्वर देवस्थानाची पूजा बंद पडली आहे. तेव्हा छत्रपती शाहूंना या गोष्टीत लक्ष घालून योग्य व्यवस्था करावी, अशी कोल्हापूरकर छत्रपती संभाजींनी विनंती केली होती. या साऱया ऐतिहासिक घटनाक्रमांतून हिंदोळे गावातील श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या गतवैभवाची आणि सांस्कृतिक संपदेची प्रचिती मिळते. एक हजारपेक्षा ज्यादा वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार असणारा श्री सप्तकोटेश्वर, हे गोव्याचेच नव्हे तर कोकणाचे राजदैवत आहे. आज श्री सप्तकोटेश्वरामुळेच पूर्वाश्रमीचा हिंदोळे नार्वे म्हणून प्रसिद्धीस पावलेला आहे. हिरव्यागार कुळागारांच्या सान्निध्यात आणि जैन इतिहासाची स्मृती जागविणाऱया सागर तलाव, शेकडो वर्षांचा साक्षीदार श्री सिद्धेश्वर आणि अन्य ऐतिहासिक संचितांच्या कुशीत श्री सप्तकोटेश्वर मंदिराला नवी झळाळी देताना गोवा सरकारने त्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे रक्षण करणे गरजेचे आहे.
श्री सप्तकोटेश्वराचे मंदिर आज डिचोलीतील नार्वे गावात असले तरी पोर्तुगीजांच्या ताब्यात तिसवाडी महाल जाण्यापूर्वी त्याचे मूळस्थान दीपवती (दिवाडी) बेटावरच्या नार्वे गावात होते. गोवा कदंबाचा मूळ पुरुष त्रिलोचन अथवा जयंत असून, कदंब राजघराण्याने श्री सप्तकोटेश्वर देवाला आराध्य म्हणून पूजण्याची परंपरा जपलेली होती. कदंब नृपती जयकेशी द्वितीय याने 1138 साली जी सुवर्ण नाणी पाडली, त्यावरती ‘श्री सप्तकोटीशवरविरा जयकेशी देव मालवशमारी’ असा उल्लेख केला होता. चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात गोवा जेव्हा बहामनी साम्राज्याच्या अखत्यारीत आला, तेव्हा गोमंतकीय समाजमनाचे मानदंड असणाऱया श्री सप्तकोटेश्वर देवाच्या शिवलिंगावरती घाला घातला आणि हे शिवलिंग उखडून बांधावरच्या चिखलात टाकले. विजयनगर साम्राज्याच्या काळात राजा हरिहराच्या माधव मंत्र्याने श्री सप्तकोटेश्वराच्या शिवलिंगाला त्याचे गतवैभव मिळवून दिले परंतु सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात दीपवती बेट तिसवाडी महालाबरोबर पोर्तुगीजांनी जिंकून घेतल्यावर धर्मांधांनी हे शिवलिंग पुन्हा उखडून विहिरीवरती पाणी काढताना त्याची अवहेलना करण्यासाठी टाकले. कालांतराने भतग्राम महालाचे अधिकारी नारायण शेणवी सूर्यराव यांनी या शिवलिंगाचे स्थलांतर लाटंबार्सेत केले आणि 1549 साली हिंदोळे गावातील टेकडीच्या पायथ्याशी दुर्गम ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली. डिचोली महालावरती आपली सत्ता स्थापन झाल्यावर तिसवाडी, बार्देश आणि सासष्टी महालाचा ताबा ज्या पोर्तुगीजांकडे त्यांना अद्दल घडविण्याचा शिवाजी महाराजांचा इरादा होता. त्यावेळी नार्वे येथील श्री सप्तकोटेश्वराच्या दर्शनासाठी गेले असता महाराजांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे नियोजन केले. या परिसरात असलेल्या जांभा दगडाचा कल्पकतेने उपयोग करून मंदिराची उभारणी केली होती. शिवाजी महाराज पोर्तुगीजांच्या गोव्यात प्रवेश करणार असल्याची खबर लागल्याने त्यांनी विशेष दक्षता घेतली होती. याच मार्गे 24 नोव्हेंबर 1683 रोजी छत्रपती संभाजींनी गोव्यावर स्वारी केली त्यामुळे नार्वे गावातील श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून गोमंतकीय सामाजिक आणि सांस्कृतिक अधःपतनास चालना देणाऱया पोर्तुगीजांना त्यांच्या राज्याच्या सीमेवरती आव्हान देण्याची कामगिरी महाराजांनी केली होती. गेल्या साडेतीनशे वर्षांहून अधिक कालखंड नार्वेत उभ्या असलेल्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमीबरोबर वैभव संपन्न भारतीय सांस्कृतिक मूल्यांचा तेजस्वी वारसा लाभलेला आहे, हे विशेष महत्त्वाचे आहे.
- राजेंद्र पां. केरकर