स्मार्ट सिटीचे काम, उपयोगाविना थांब!
बसथांब्यानंतर आता स्वच्छतागृहांचीही दुरवस्था
बेळगाव : स्मार्टसिटीचे काम, उपयोगाविना थांब, असेच चित्र सध्या दिसत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत बांधण्यात आलेल्या बसथांब्याची दुरवस्था झालीच आहे, आता त्यापाठोपाठ स्वच्छतागृहांचीसुद्धा दुरवस्था झाली आहे. त्यामुळे स्मार्टसिटीच्या पैशाचा निष्कारण अपव्यय होत आहे. ध. संभाजी चौक येथे स्मार्ट सिटीच्या निधीअंतर्गत स्वच्छतागृहे उभारण्यात आली. परंतु अवघ्या काही महिन्यातच त्यांची पूर्ण दुरवस्था झाली आहे. केवळ जाहिरात आणि फलक लावण्यासाठी त्यांचा उपयोग राहीला आहे. मुळात येथे पाण्याची पुरेशी व नियमित व्यवस्था नाही. अस्वच्छतेमुळे आत जाणेसुद्धा अशक्य होत आहे.
वास्तविक ध. संभाजी चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग आहे. शहर आणि तालुक्यासाठी येथून बसची सतत ये-जा असते. परिणामी प्रवाशांची संख्या अधिक असते. प्रवाशांना बऱ्याचदा स्वच्छतागृहाची आवश्यकता भासते. परंतु या स्वच्छतागृहांचा उपयोग शून्य झाला आहे. त्यातही महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे. परंतु स्वच्छतागृहे असूनही अस्वच्छता, पाण्याची कमतरता व नियमित देखरेख याचा अभाव यामुळे त्यांचा उपयोग होत नाही. त्यामुळे स्मार्टसिटीच्या निधीचा दुरुपयोग झालेले हे आणखी एक उदारहण ठरले आहे.