स्पोर्ट्स mania
यू आर सिम्पली ग्रेट!, नीरज चोप्रा
एखादा ऑलिम्पियन असेल, ऍथलिट वा कोणत्याही क्रीडा प्रकारात सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचलेला क्रीडापटू. यातील प्रत्येकाचे स्वतःचे स्वतंत्र डाएट असते. प्रत्येक जण स्वतंत्र पद्धतीने आपल्या फिटनेसची काळजी घेत असतो. भालाफेकीत भारताला आजवरच्या ऑलिम्पिक इतिहासातील एकमेव सुवर्ण जिंकून देणारा नीरज चोप्रा हा देखील त्याला अपवाद असण्याचे कारण नाही. आजच्या विशेष भागात याच नीरज चोप्राचे डाएट कसे असते, तो सरावाचे नियोजन कसे करतो आणि तंदुरुस्तीसाठी कसे काटेकोर प्रयत्न करतो, हे थोडक्यात पाहुयात!
टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये भारताला भालाफेकीत ऐतिहासिक सुवर्ण जिंकून देत नवा इतिहास रचणारा नीरज चोप्रा आता क्रीडाप्रेमींच्या गळय़ातील ताईत बनला असेल तर यात आश्चर्याचे कारण नाही. त्याने ऑलिम्पिक सुवर्ण जिंकत ऑलिम्पिक सुवर्णपदकाचा कित्येक वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणला. अर्थातच, या यशामागे त्याची कित्येक वर्षांची मेहनत आणि त्याने केलेले त्याग दडलेले आहेत. वास्तविक, भालाफेकीतही प्रचंड ताकद व कमालीचा फिटनेस असणे क्रमप्राप्त असते. तो प्राप्त करण्यासाठी डाएट व वर्कआऊट विशेष महत्त्वाचे असते. यावर नीरज चोप्राने बरेच लक्ष <पुरवले आहे.
आश्चर्य म्हणजे नीरज प्रारंभी पूर्ण शाकाहारी होता. पण, त्याने खेळातील गरज ओळखून मांसाहार सुरु करण्याचा कठीण निर्णय घेतला आणि तो कसोशीने अंमलात आणला.
नीरज 2016 पर्यंत पूर्ण शाकाहारी होता. त्यावर्षी पोलंड दौऱयावर असताना शाकाहाराचे खूपच कमी पर्याय त्याच्यासाठी अडचणीचे होते. या परिस्थितीत त्याचे वजन घटू लागले आणि ट्रेनिंग व रिकव्हरीसाठी अडचणी जाणवू लागल्या. ही कसर आहाराच्या माध्यमातूनच भरुन काढावी लागणार होती आणि या पार्श्वभूमीवर त्याने मांसाहाराकडे वळण्याचा निर्णय घेतला.
पानिपतचा जन्म असलेल्या नीरजचे डाएट प्लॅन अगदी काटेकोर असते. एका खासगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या डाएटमध्ये चिकन, अंडी, सॅलड, फळे, सालमन मासे, फळांचा रस समाविष्ट असतात, असे सांगितले होते. खाण्याची आपली आवड सांगत असताना तो म्हणाला होता की, आपण ब्रेड आम्लेट कोणत्याही वेळी खाऊ शकतो. याशिवाय, त्याला आपण स्वतः बनवलेली व्हेज बिर्याणी अधिक पसंत असते.
नीरजचे वर्कआऊट रुटीन
टोकियोत नीरजने ऑलिम्पिक सुवर्ण जिंकले, त्यावेळेपासून सातत्याने सोशल मीडियावर त्याच्यावरील व्हीडिओ व्हायरल होत राहिले आणि यातील काही व्हीडिओ त्याच्या वर्कआऊटवर आधारितही आहेत. भाला फेकण्यासाठी खूप ताकद लागते आणि प्रचंड उर्जाही लागते. यासाठी तो बॉल वर्कआऊट, हर्डल जम्प, बॉल फेकणे आदी कसरती करताना दिसून येतो. याशिवाय, लवचिकता वाढवण्यासाठी आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी रनिंग करतो. तसेच, डेड-लिफ्ट, पुल-अप्स, स्क्वॅट्स, ट्रायसेप्स, डबल प्रंट, साईड रेज आदींवरही तो भर देतो.
हा आहे नीरजचा वीक पॉईंट!
एरवी, आपल्या आहाराबद्दल आणि वर्कआऊटबद्दल अतिशय सक्त असणारा नीरज समोर चुरमा आणि पाणीपुरी आल्यानंतर मात्र त्यावर अक्षरशः तुटून पडतो. एका अर्थाने चुरमा आणि पाणीपुरी हे त्याचे वीक पॉईंट झाले आहेत. पाणीपुरीत पाण्याचे प्रमाण अधिक आणि आटय़ाचे प्रमाण कमी असते. यामुळे आपला पाणीपुरीवर अधिक भर असतो, असे नीरज यापूर्वी म्हणाला होता.
फळांना आपले कम्फर्ट फूड मानणारा नीरज हरियाणातील आपल्या घरी जातो, त्यावेळी त्याला चुरमा खाणे अधिक पसंत असते. अलीकडेच अमेरिकेत संपन्न झालेल्या वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपला सहा महिन्यांचा कालावधी बाकी असताना त्याने मिठाईपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. एखादे मेडल जिंकण्यासाठी ऍथलिटला किती विचार करावा लागतो, किती प्रकारचे त्याग करावे लागतात, याचे हे सर्वोत्तम उदाहरण ठरावे!
अति वजनामुळे भालाफेकीकडे वळला आणि भालाफेकीने आयुष्य घडवले!
नीरज चोप्राला भालाफेकीची आवड निर्माण होण्यामागे त्याचा जाडेपणा कारणीभूत ठरला होता, याची खूपच कमी जणांना कल्पना असेल. नीरज लहानपणी खूपच जाड होता आणि कुटुंबियांनी बऱयाचदा सांगितल्यानंतरच वजन कमी करण्याच्या उद्देशाने तो खेळाकडे वळला.
वजन कमी करण्यासाठी तगादा वाढत असताना नीरजला त्याचे काका तेथून 15 किलोमीटर अंतरावर पानिपतमधील शिवाजी स्टेडियमवर घेऊन गेले होते. तेथे नीरजने प्रथमच खेळाडूंना भालाफेकीचा सराव करताना पाहिले. ते पाहिल्यानंतर नीरजला देखील त्या खेळाप्रती आवड निर्माण झाली आणि त्याने सर्वप्रथम भाला हातात घेतला.
वेळ एकसारखी राहत नाही, असे म्हणतात. आज समोर कित्येक अडचणी असतील तर एक वेळ अशीही येते की, आपल्या अडचणीच आपल्यासाठी सुवर्णमार्ग घेऊन येतात. ‘गोल्डन बॉय’ नीरजबाबतही तेच घडले. वजन कमी करण्याच्या उद्देशाने तो भालाफेकीकडे वळला आणि एका अर्थाने याच भालाफेकीने त्याचे आयुष्य घडवले!
थोडेसे नीरजच्या डाएटविषयी!
- ब्रेड-आम्लेटचा कोम्बो नीरजच्या विशेष आवडीचा. आपण कधीही ब्रेड आम्लेट खाऊ शकतो, असे तो कदाचित म्हणूनच हक्काने सांगतो.
- ‘नमकीन चावल’ हा गोल्डन बॉयच्या आहारातील आणखी एक आवडीचा घटक. विशेष म्हणजे तो स्वतः बनवू शकतो.
- नीरजच्या आहारात ग्रिल्ड चिकन ब्रिस्टचा समावेश असतो. यामुळे, प्रोटिनची कसर भरुन निघते, असे तो सांगतो.
- सालमनमध्ये प्रोटिन, आयर्न, फायबर, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्सचे प्रमाण खूप चांगले असते आणि यामुळे नीरजसारखे ऍथलिट सॅलमनला अधिक प्राधान्य देत असताना आढळून येतात.
- सराव आणि प्रशिक्षण शिबिरादरम्यान नीरज फळांचा रस, सॅलड घेत असतो.
- सरावाला सुरुवात करण्यापूर्वी नीरजच्या आहारात उकडलेल्या अंडीचा आवर्जून समावेश असतो.
- हरियाणाचा चुरमा हे नीरजसाठी चीट मिल असते!
थोडक्यात नीरज चोप्रा
पूर्ण नाव : नीरज सतीश चोप्रा
जन्म ठिकाण
जन्म तारीख : 24 डिसेंबर 1997
पालक : सरोज देवी, सतीश कुमार
पुरस्कार : परम विशिष्ठ सेवा पदक, विशिष्ठ सेवा पदक, अर्जुन पुरस्कार
कशी झाली बुद्धिबळाची सुरुवात? : किती वर्षे जुना आहे बुद्धिबळ?
हे माहित आहे का?
जागतिक स्तरावर अनेक खेळ खेळले जातात. यातील काही खेळ मैदानी तर काही खेळ बैठय़ा स्वरुपातील असतात. खेळांमध्ये तंत्रज्ञानाचीही आता मोठय़ा प्रमाणात मदत घेतली जाते. अशाच खेळातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे बुद्धिबळ! बुद्धिबळ हा तब्बल 1500 वर्षांहून अधिक जुना खेळ आहे, असे मानले जाते. आज थोडेसे याच खेळाविषयी!
भारतात बुद्धिबळाची सुरुवात पाचव्या-सहाव्या शतकात झाली, असे मानले जाते. या खेळाचा अविष्कार गुप्तकाळाच्या वेळी झाला, अशी वंदता आहे. महाभारतात पांडव व कौरवांमध्ये चौरस खेळण्याचा प्रसंग आढळून आला आहे. मात्र, गुप्त काळातील राजांनी चौरसची जागा दुसऱया खेळाने घ्यावी, असे ठरवले आणि बुद्धिबळाची सुरुवात केली.
ज्यावेळी बुद्धिबळाचा शोध लावण्यात आला, त्यावेळी त्याला चतुरंग खेळ असे ओळखले जायचे. युरोप व रशियासारख्या काही मोजक्या ठिकाणी हा खेळ नवव्या शतकापर्यंत पोहोचला होता आणि आता बुद्धिबळाला जवळपास प्रत्येक देशाने खुल्या दिलाने अंगीकारले आहे.
पोर्तुगालमध्ये बुद्धिबळाला जादरेज तर स्पेनमध्ये एजेडरेज या नावाने ओळखले जाते. बुद्धिबळाच्या या प्रदीर्घ इतिहासात बदलही अगदी व्यापक स्वरुपाचे झाले आहेत. एक काळ असाही होता, ज्यावेळी बुद्धिबळात राजाला मारले जाणे शक्य होते. पण, आजच्या बुद्धिबळात हे शक्य नाही.
वजीराचा इतिहासही रंजक आहे. आजच्या पटावर वजीर मारला गेला तर पटावरील सर्वात ताकदवान मोहरा गमावला, असाच त्याचा अर्थ असतो. पण, प्राचीन काळात हाच वजीर एखाद्या कोपऱयात असायचा आणि पटावरील सर्वात कमजोर मोहरा, इतकीच त्याची ओळख असायची. सध्या वजीराला मिळालेली ताकद ही 500 वर्षांपूर्वीची आहे. हत्ती व घोडय़ासारखे प्यादे कित्येक शतके सध्याच्या अंदाजातच चालवले जातात. रुक हा हत्तीसाठी वापरला जाणारा शब्द पारशी आहे. चेन्नईत अलीकडेच 44 वे चेस ऑलिम्पियाड संपन्न झाले आणि बुद्धिबळाचा हा कित्येक शतकांचा वारसा पुन्हा एकदा विशेष प्रकाशझोतात आला!
कसे खेळले जाते बुद्धिबळ?
बुद्धिबळाचा पट 64 घरांचा. यातील 32 घरे पांढऱया रंगाची तर 32 घरे काळय़ा रंगाची असतात. हा खेळ एकावेळी दोन खेळाडू खेळू शकतात. दोन्ही खेळाडूंकडे 1 राजा, 1 वजीर, 2 हत्ती, 2 घोडे, 2 उंट व 8 सैनिक असतात. बुद्धिबळाच्या नियमानुसार, पांढऱया मोहऱयांनी खेळणारा खेळाडूच डावाची सुरुवात करतो. बुद्धिबळात ग्रँडमास्टर ही मानाची उपाधी आहे. सध्या या खेळाचे नियंत्रण देशात अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना आणि जागतिक स्तरावर फिडे ही संघटना करते.
कसा ठरतो बुद्धिबळातील वर्ल्ड चॅम्पियन?
बुद्धिबळातील पहिली अधिकृत वर्ल्ड चॅम्पियनशिप 1886 साली खेळवण्यात आली आणि त्यात विलहेल्म स्टेईनित्झ हा पहिला वर्ल्ड चॅम्पियन बनला. सध्या डाटाबेस, चेस इंजिन्स आणि स्ट्रटेजिकल प्रिपेरेशन्ससाठी सुपर कॉम्प्युटर्सची मोठय़ा प्रमाणात मदत घेतली जाते आणि यामुळे या हजारो वर्षांची परंपरा असणाऱया खेळाने आधुनिकतेचे रुपडेही लेवले आहे. सध्या नवा वर्ल्ड चॅम्पियन ठरवण्यासाठी स्पर्धेतील विद्यमान विजेत्याला थेट प्रवेश मिळतो आणि त्याचा प्रतिस्पर्धी कँडिडेट्स टुर्नामेंटच्या माध्यमातून निश्चित केला जातो. याचाच अर्थ असा की, कँडिडेट्स टुर्नामेंट जिंकणारा खेळाडू हा विद्यमान वर्ल्ड चॅम्पियनचा आव्हानवीर असतो.
स्केटिंग शिकताय? हे नक्की वाचा!
- 1) प्रारंभी संयम व एकाग्रता यावर भर द्या
- 2) हेड गियर (हेल्मेट), नी गार्ड्स न चुकता वापरा
- 3) घाई गडबड न करता तंत्रशुद्धतेवर भर द्या
- 4) प्रशिक्षकांच्या मार्गदर्शक सूचना काटेकोर पाळा
- 5) बॅलन्स सांभाळून त्यानंतरच स्पीडवर भर द्या
- 6) शिकत असताना स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेवर भर द्या
- 7) थेट स्पर्धेत उतरण्यापूर्वी उत्तम तयारी करा
- 8) स्पर्धेच्या नियम व अटी वेळीच समजून घ्या
- 9) डाएट, सराव यावर योग्य भर द्या
- 10) कठोर परिश्रमाला पर्याय नसतो. त्यामुळे, शॉर्टकट टाळा.
-सूर्यकांत हिंडलगेकर स्केटिंग प्रशिक्षक, बेळगाव.
मोबाईल : 9449563393
लॉन बॉल्स! : खेळ जुनाच, ओळख नवी!
लॉन बॉल्स हा आऊटडोअर खेळ आहे. लॉन बॉल्स एका रुपात प्राचीन मिस्त्रमध्ये खेळवला जायचा आणि आता तो युरोपियन देशांमध्ये विशेष लोकप्रिय झाला आहे. अलीकडेच झालेल्या बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत लॉन बॉल्समध्ये भारताने ऐतिहासिक यश मिळाले आणि अवघ्या क्रीडा विश्वात हा खेळ कसा खेळला जातो, याची उत्कंठा निर्माण केली. त्या पार्श्वभूमीवर आज ओळख करुन घेऊयात लॉन बॉल्सची!
लॉन बॉल्स
एका बॉलचे वजन साधारणपणे दीड किलोच्या आसपास असते. हा चेंडू एका बाजूने अधिक जड असतो, जेणेकरुन खेळाडू त्याला एका बाजूने वळवू शकतील.
जॅक
लॉन बॉल्सच्या सहाय्याने ज्या छोटय़ा चेंडूचा वेध घ्यायचा, त्याला जॅक असे संबोधले जातात. हा छोटा चेंडू अर्थात जॅक 23 मीटर अंतरावर असतो.
कसा खेळतात हा खेळ?
दीड किलोचा चेंडू घेऊन तो 23 मीटर अंतरावरील छोटय़ा चेंडूच्या दिशेने जमिनीलगत फेकायचा असतो. मोठय़ा चेंडूने जॅकचा अचूक वेध घेतल्यास त्या आधारे गुण दिले जातात. एकेरी, दुहेरी, तिहेरी अशा विविध गटातून हा खेळ खेळला जातो.
असा ठरवला जातो विजेता
ज्या देशाचा खेळाडू जॅकच्या सर्वाधिक नजीक पोहोचण्यात यशस्वी होतो, त्याला विजयी घोषित केले जाते. एका सामन्यात सर्वात लवकर ज्या खेळाडूचे 21 गुण होतात, तो विजयी ठरतो. दुहेरी व अन्य गटात सर्वात प्रथम 18 गुण मिळवणारा संघाला विजयी घोषित केले जाते.