स्पोर्ट्स mania
ब्राझीलचा अव्वल नेमबाज
नेमार दा सिल्वा सांतोस ज्युनियर प्रसिद्धीच्या झोतात आला तो ब्राझीलच्या ‘सांतोस’ क्लबमधून. त्यानं 17 व्या वर्षी व्यावसायिक फुटबॉलमध्ये पाऊल ठेवलं ते ‘सांतोस’मार्फतच...क्लबला 1963 नंतर प्रथमच 2011 साली उचलता आलेल्या ‘कोपा लिबर्टादोरेस’सह अनेक स्पर्धा जिंकण्याच्या बाबतीत त्याचा मोलाचा वाटा राहिलाय. 2011 नि 2012 अशी सलग दोन वर्षं ‘साऊथ अमेरिकन फुटबॉलर ऑफ द इयर’ म्हणून त्याची निवड झाली आणि त्यानंतर लगेच स्पेनच्या दिग्गज ‘बार्सिलोना’ क्लबमध्ये सामील होण्यासाठी त्यानं युरोपची वाट पकडली...
अर्जेन्टिनाचा मेस्सी आणि उरुग्वेचा लुईस सुआरेझ यांच्यासह नेमार असं हे घातक त्रिकूट छान जमून त्यांनी ‘ला लीगा’, ‘कोपा डेल रे’ आणि ‘युएफा चॅम्पियन्स लीग’ असे एकाच वर्षात तीन किताब ‘बार्सिलोना’च्या खात्यात जमा करून एक अफलातून ‘हॅट्ट्रिक’ नोंदवून दाखविली...या स्पॅनिश संघात कारकीर्द चांगलीच बहरत असली, तरी चालून आलेली ‘पॅरिस सेंट जर्मेन’ची (पीएसजी) महाकाय ऑफर स्वीकारण्याचा मोह नेमार ज्युनियरला टाळता आली नाही. त्याच्यासाठी सदर प्रेंच क्लबनं सुमारे 23 कोटी युरो मोजून हा ब्राझिलियन त्यावेळी सर्वांत महागडा खेळाडू बनला होता...नेमारच्या आगमनानंतर ‘पीएसजी’नं चार लीग जेतेपदं पटकावलीत अन् पदार्पणाच्या हंगामातच त्यानं मान मिळविला तो ‘लीग वन प्लेयर ऑफ द इयर’ ठरण्याचा. यापैकी सर्वांत उल्लेखनीय म्हणजे 2019-20 च्या हंगामात क्लबला त्यानं मिळवून दिलेली चार देशी स्पर्धांची जेतेपदं. शिवाय पहिल्यांदाच ‘चॅम्पियन्स लीग’च्या अंतिम फेरीचं दर्शनही घडविलं...
नेमार ज्युनियरचं कौशल्य खरं तर युवादशेतच चमकू लागलं होतं. ब्राझीलनं 2011 साली जी दक्षिण अमेरिकी युवा स्पर्धा जिंकली त्यात तो अग्रगण्य ‘गोल स्कोअरर’ ठरला, तर 2013 साली ‘फिफा कॉन्फेडरेशन कप’ पटकावला त्यावेळी तो बनला ‘गोल्डन बॉल’चा मानकरी...2016 साली ऑलिंपिकमधलं पुरुषांच्या फुटबॉलचं पहिलं सुवर्णपदक त्या देशानं मिळविलं होतं ते त्याच्या नेतृत्वाखालीच. पुढं त्यानं कर्णधारपदाला सोडचिठ्ठी दिली. 2021 च्या ‘कोपा अमेरिका’ स्पर्धेत ब्राझीलला अंतिम फेरीपर्यंत धडक मारण्यास केलेली मदत ही संघासाठी तो वेळोवेळी किती महत्त्वाचा ठरलाय त्याची आणखी एक साक्ष...
- राजू प्रभू
विश्वचषक आणि नेमार...
महान पेले अन् अलीकडच्या काळातील रोनाल्दिनियोनंतर ‘10’ क्रमांकाची जर्सी परिधान करण्याचा वारसा 2013 पासून चालविणाऱया नेमार ज्युनियरची ही तिसरी विश्वचषक स्पर्धा अन् या 30 वर्षीय खेळाडूला ‘पॅरिस सेंट जर्मेन’मधील त्याचा संघ सहकारी लायोनेल मेस्सी आणि पोर्तुगालचा क्रिस्तियानो रोनाल्डो या दोन ‘सुपरस्टार्स’च्या सावलीतून बाहेर येण्याची ही सर्वोत्तम संधी...
नेमारचं विश्वचषकाकडील नातं हे गुंतागुंतीचंच राहिलंय...2014 मध्ये त्यानं या स्पर्धेत पर्दापण केलं तेव्हा ब्राझील हाच यजमान. त्यामुळं असलेल्या जबरदस्त दबावाचा भार उचलत त्यानं उपांत्यपूर्व फेरीपर्यंत संघानं मारलेल्या मुसंडीत मोलाचा वाटा उचलला. मात्र उपांत्यपूर्व फेरीत प्रतिस्पर्धी कोलंबियाच्या एका आघाडीपटूनं घेतलेली उडी त्याच्या पाठीला अत्यंत घातक असा ‘प्रॅक्चर’ करून गेली आणि त्यासरशी त्या विश्वचषकातील त्याचा प्रवास तर संपुष्टात आलाच, शिवाय त्याची कारकीर्द देखील संपण्याची भीती निर्माण झाली होती (ब्राझीलनं तो सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला खरा, पण पुढं जर्मनीकडून 7-1 असा लाजिरवाणा पराभव त्यांना पत्करावा लागला)...
चार वर्षांनंतर रशियामध्ये नेमारनं 2014 च्या कटू आठवणी पुसून काढण्याच्या निर्धारानं प्रभावी कामगिरी केली होती. तथापि उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमनं त्याचे व ब्राझीलचे सारे मनसुबे उधळवून लावले...
पेले नंतरचा दुसरा
वयाच्या 18 व्या वर्षी ब्राझीलच्या राष्ट्रीय संघात पदार्पण केल्यापासून 121 सामन्यांमध्ये 75 गोल केलेला नेमार सर्वाधिक गोल नोंदविण्याच्या बाबतीत महान पेलेच्या मागं दुसऱया स्थानावर विसावलाय. हा लेख लिहिताना त्याला सर्वेच्च स्थानावर जाण्यासाठी गरज होती ती तीन गोलांची. त्यादृष्टीनं कतारमधील विश्वचषक स्पर्धा त्याच्यासाठी ऐतिहासिक ठरू शकते...
गोल नोंदविण्यात पटाईत ‘प्लेमेकर’ म्हणून ओळखल्या जाणाऱया नेमारनं तीन वेगवेगळ्या क्लबांसाठी खेळताना प्रत्येकी किमान 100 गोल नोंदविलेत. अशी कामगिरी केवळ तीनच खेळाडूंना करता आलेली असून त्यापैकी तो एक...
थोडक्यात नेमार...
- जन्म : 5 फेब्रुवारी, 1992
- उंची : 5 फूट 9 इंच
- वजन : 68 किलो
- कमाई : 9.5 कोटी डॉलर्स (2022 नुसार)
व्यायाम व आहार...
नेमारच्या पहिल्या वर्कआऊटमध्ये भरपूर ‘स्ट्रेचिंग’, त्यानंतर लवचिकता नि बळकटी वाढविणाऱया ‘स्क्वॅट्स जंपिंग’, ‘हॉपिंग हर्डल्स’, ‘रोप स्किपिंग’, 5 मिनिटे धावणे आणि लहान स्प्रिंट यांचा समावेश असतो...तर दुसऱया वर्कआऊटमध्ये भर ‘पिलर स्किप, ‘मल्टीडायरेक्शनल लंज’, ‘फॉरवर्ड लंज’ यांसारख्या हालचाली चपळ बनविणाऱया व्यायामांवर...
खेरीज तंदुरुस्तीसाठी नेमार बॉक्सिंग, गिर्यारोहण, योग, टेनिससह इतर अनेक प्रकार करतो...सोमवार ते शुक्रवारपर्यंतच्या त्याच्या व्यायामाचा नित्यक्रम ठरवून दिला गेलाय. शनिवारी व रविवारी तो सहसा फुटबॉल खेळतो अथवा विश्रांती घेतो...
‘बार्सिलोना’ क्लबच्या न्युट्रिशनिस्टनी नेमार ज्युनियरला भरपूर कॅलरी मिळवून देणारा आहार ठरवून दिला होता. त्यानुसार न्याहारीत उकडलेली अंडी, पालक, टर्कीचे मांस आणि प्रोटीन शेकचा समावेश. दुपारच्या जेवणामध्ये टर्की मीट बॉल्स, हिरवी चटणी व अर्धे रताळे, तर रात्रीच्या जेवणात उकडलेला कोबी, प्रोटीन शेक नि मासे. रात्रीचे स्नॅक्स म्हणून नेमार वेगवेगळ्या फळांच्या रसांसह स्मुदींचे सेवन करतो...
नेमारची कारकीर्द...
संघ | सामने | गोल |
पीएसजी | 163 | 115 |
बार्सिलोना | 186 | 105 |
सांतोस | 225 | 136 |
ब्राझील | 121 | 75 |
एकूण | 695 | 430 |
खेळ जुना ओळख नवी
‘डेकॅथलॉन’ ‘ट्रक अँड फिल्ड’
‘डेकॅथलॉन’मध्ये स्पर्धक 10 ‘ट्रक अँड फिल्ड’ स्पर्धांमध्ये भाग घेतात. त्याच्या अंतर्गत ऑलिम्पिकमध्ये पहिल्या दिवशी 100 मीटर धावणं, लांब उडी, गोळाफेक, उंच उडी आणि 400 मीटर धावण्याची शर्यत, तर दुसऱया दिवशी 110 मीटर हर्डल्स, थाळीफेक, पोल व्हॉल्ट, भालाफेक आणि 1500 मीटर धावण्याची शर्यत होते...
‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ऍथलेटिक्स फेडरेशन्स’नं तयार केलेल्या तक्त्यानुसार स्पर्धकांना प्रत्येक स्पर्धेतील त्यांच्या कामगिरीसाठी गुण दिले जातात. त्यांची बेरीज करून दहा स्पर्धा झाल्यानंतर ज्याची गुणसंख्या सर्वांत जास्त होते त्या ऍथलिटला विजेता घोषित केलं जातं...
पारंपरिक पद्धतीनुसार ‘डेकॅथलॉन’ जिंकणाऱया व्यक्तीला ‘जगातील महान ऍथलिट’ असं संबोधले जातं अन् हा खेळ ज्या प्रकारे शारीरिक तंदुरुस्ती व स्टॅमिनाचा कस पाहतो ते पाहता ही उपाधी योग्यच...
अमेरिकी ऍथलिट जिम थॉर्प हे पहिले ऑलिम्पिक ‘डेकॅथलॉन’ विजेते. आधुनिक काळात या प्रकारातील गाजलेलं नाव म्हणजे ब्रिटनचे डेली थॉम्पसन...
सध्या अधिकृत ‘डेकॅथलॉन’ विश्वविक्रम प्रेंच ऍथलिट केव्हिन मेयर याच्या नावावर विसावलाय. त्यानं फ्रान्समधील 2018 सालच्या ‘डेकास्टर’मध्ये एकूण 9126 गुण मिळवले...
ऑलिम्पिकमध्ये ‘डेकॅथलॉन’ होते ती फक्त पुरुषांच्या गटात. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कॅनडाच्या डॅमियन वॉर्नरनं 9018 गुणांच्या ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक पटकावलं. 9 हजार गुणांचा टप्पा ओलांडणारा तो इतिहासातील चौथा ऍथलिट...