स्पोर्ट्स mania
‘प्लेमेकर’ मेस्सी !
मागील दोन दशकांचा विचार केल्यास जसं टेनिसचं विश्व रॉजर फेडरर नि राफेल नदाल यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही तसाच फुटबॉल जगताचा आढावा पोर्तुगालचा क्रिस्तियानो रोनाल्डो नि अर्जेन्टिनाचा ‘प्लेमेकर’ लायोनेल मेस्सी यांच्या उल्लेखाशिवाय पूर्णत्वास जाऊ शकणार नाहीये...दोघेही इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक. दोघांहीमध्ये जबरदस्त स्पर्धा अन् त्यांच्यापैकी सर्वोत्तम कोण याची चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये सदैव रंगणारी...डाव्या पायाचा ‘ड्रिबलर’ या नात्यानं मेस्सीच्या खेळण्याच्या शैलीची नेहमी तुलना होते ती अर्जेन्टिनाचा महान खेळाडू दिएगो माराडोनाशी. खुद्द माराडोनानं त्याचं वर्णन आपला वारसदार अशा शब्दांत केलं होतं...
24 जून 1987 रोजी मध्य अर्जेंटिनामध्ये जन्मलेला लायोनेल आंद्रेस मेस्सी हा वयाच्या 13 व्या वर्षी ‘बार्सिलोना’मध्ये सामील होण्यासाठी स्पेनला गेला अन् ऑक्टोबर, 2004 मध्ये 17 व्या वर्षी स्पर्धात्मक फुटबॉलमध्ये पाऊल ठेवल्यानंतर त्या क्लबचा एक अविभाज्य घटक बनण्यासाठी त्याला अवघी तीन वर्षं लागली...2008-09 मधील पहिल्याच अखंड खेळलेल्या हंगामात त्यानं ‘बार्सिलोना’ला स्पॅनिश फुटबॉलमधील किताबांची हॅटट्रिक नोंदविण्यास मदत केली. त्यावेळी मेस्सी 22 वर्षांचा. त्यानं पहिला ‘बालॉन डी’ऑर’ जिंकला तो त्याचवर्षी. त्यानंतर सलग चार वेळा सदर पुरस्कार पटकावणारा तो पहिला खेळाडू बनला...
2011-12 च्या हंगामात ‘ला लीगा’ आणि युरोपियन स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदविणाऱया मेस्सीनं पुढं ‘बार्सिलोना’च्या इतिहासात स्थान मिळविलं ते सर्वांत जास्त गोल नोंदविणारा खेळाडू बनून...2018 मध्ये क्लबचं कर्णधारपदही त्याच्याकडे चालून आलं. मेस्सीची जवळजवळ सारी कारकीर्द घडली ती ‘बार्सिलोना’तर्फे. त्यानं त्या स्पॅनिश क्लबला ‘बायबाय’ म्हटलं ते गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अन् तो वळला प्रेंच क्लब ‘पॅरिस सेंट-जर्मेन’कडे. तिथं तो आघाडीपटू म्हणून वावरताना दिसतोय...
अर्जेंटिनासाठी 164 सामन्यांमध्ये 90 गोल नोंदविणाऱया लायोनेल मेस्सीची कामगिरी राष्ट्रीय संघापेक्षा क्लबतर्फे जास्त झळाळती राहिलीय यात शंका नाही. असं असलं, तरी युवा स्तरावर अर्जेन्टिनाला 2005 साली ‘विश्व युवा फुटबॉल स्पर्धा’ ‘गोल्डन बॉल’ व ‘गोल्डन शू’सह जिंकून देणारा हा खेळाडू 2008 च्या उन्हाळी ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक प्राप्त करणाऱया संघाचा देखील भाग राहिला. 2016 मध्ये ‘कोपा अमेरिका’च्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाचा चिलीकडून पराभव झाल्यानंतर निराश होऊन मेस्सीनं लगेच आपली आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर केली होती. परंतु त्यानं आपला निर्णय मागं घेण्यास वेळ लावला नाही आणि ती कसर गेल्या वर्षी भरून काढली ‘गोल्डन बॉल’ व ‘गोल्डन शू’सह ‘कोपा अमेरिका’चा चषक उचलून....
2005 मध्ये अर्जेन्टिनाच्या वरिष्ठ संघातून पदार्पण केल्यानंतर लायोनेल मेस्सी 2006 साली विश्वचषक खेळणारा आणि त्यात गोल करणारा देशाचा सर्वांत तरुण खेळाडू बनला. 2011 मध्ये संघाचं कर्णधारपद सोपविल्यानंतर विश्वचषक स्पर्धेत नेतृत्व करण्याची त्याची ही सलग तिसरी खेप...यंदाची स्पर्धा ही मेस्सीची पाचवी आणि अंतिम यात दुमत नाही. पॅरिस सेंट-जर्मेनसाठी 17 सामन्यांत 12 गोल करून पुन्हा ‘फॉर्म’मध्ये परतलेल्या या अफलातून खेळाडूसाठी विश्ववचषकावर नाव कोरण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची ही शेवटची संधी !
मेस्सीचे पराक्रम...
मेस्सीनं विक्रमी सात वेळा ‘फ्रान्स फुटबॉल’ या नियतकालिकाकडून दिला जाणारा ‘बालॉन डी’ऑर’ पुरस्कार, तर सहा वेळा ‘युरोपियन गोल्डन शू’ पटकावलाय...
त्याच्या कारकिर्दीत बार्सिलोना क्लबनं विक्रमी 35 चषक जिंकले. त्यात 10 ‘ला लीगा’, 7 ‘कोपा डेल रे’ व 4 ‘युएफा चॅम्पियन्स लीग’ अजिंक्यपदांचा समावेश...
‘ला लीगा’मधील गोलांचा उच्चांक (474), एका ‘ला लिगा’ व ‘युरोपियन लीग’ हंगामात सर्वांत जास्त गोल (50) तसंच ‘ला लीगा’ (36) नि ‘चॅम्पियन्स लीग’ (8) या स्पर्धांत सर्वाधिक हॅटट्रिक असे पराक्रम आहेत ते मेस्सीच्याच खात्यावर...
मेस्सीनं वरिष्ठ स्तरावर क्लब आणि देशासाठी मिळून 785 गोल केले असून एकाच क्लबतर्फे सर्वाधिक गोल नोंदविणारा खेळाडू म्हणूनही बोट दाखवावं लागेल ते त्याच्याचकडे...
तो अर्जेंटिनाचा सर्वांत जास्त सामने खेळलेला अन् आजवरचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू...एखाद्या दक्षिण अमेरिकी पुरुष खेळाडूनं सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल (90) करण्याचा विक्रम जमा झालाय तो मेस्सीच्याच नावावर...
संघ | सामने | गोल |
बार्सिलोना | 778 | 672 |
पॅरिस सेंट-जर्मेन | 53 | 23 |
अर्जेन्टिना | 164 | 90 |
एकूण | 995 | 785 |
विश्वचषक स्पर्धेतील आजवरची कामगिरी...
साल | नोंदवलेले गोल | प्रतिस्पर्धी संघ |
2006 | 1 | सर्बिया |
2010 | - | - |
2014 | 4 | नायजेरियाविरुद्ध 2, तर बोस्निया व हर्झेगोविना आणि इराणविरुद्ध प्रत्येकी 1 |
2018 | 1 | नायजेरिया |
चपळ, वेगवान बनविणारा व्यायाम...
? 35 वर्षांचा असून देखील मेस्सी अजूनही अत्यंत तंदुरुस्त आणि सर्वोच्च स्तरावर खेळण्यास सक्षम दिसून येतो...त्याला चपळता नि वेग राखण्यास मदत करणाऱया ‘लंज’, ‘हॅमस्ट्रिंग स्ट्रेच’, ‘पिलर ब्रिज प्रंट्स’ आणि ‘पिलर स्किप्स’ यासारख्या व्यायामांवर लक्ष केंद्रीत केल्याचा हा परिणाम. शिवाय पायाचे स्नायू बळकट करण्यासाठी दोरीवरील उडय़ा, ‘स्क्वॅट्स’ नि ‘हर्डल हॉप्स’...
? मेस्सी बचावपटूंना चकविणाऱया ‘ड्रिब्लिंग’च्या तंत्रासाठी प्रसिद्ध. त्यामुळं तो पटकन चेंडूची दिशा बदलू शकतो. याकरिता तो ‘हर्डल्स’ व ‘कोन्स’ घेऊन सराव करतो. हे त्याला मैदानावर चपळपणे हालचाली करण्यास मदतकारी ठरतं...
पोषक आहाराची महत्त्वाची भूमिका...
? लायोनेल मेस्सीसारख्या खेळाडूला योग्य आहारही तितकाच आवश्यक. याबाबतीत इटालियन न्युट्रिशनिस्ट गिउलियानो पोजर यांनी 2014 पासून महत्त्वपूर्ण भूमिका बजावलीय. पोजर यांनी सांगितल्यानुसार, ऑलिव्ह तेल, ताजी फळे, भाज्या, पाणी नि संपूर्ण धान्य हे मेस्सीच्या आहाराचे मुख्य घटक. आहारात साखरेपासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिलाय. साखर ही स्नायूंसाठी सर्वांत वाईट गोष्ट, असं ते म्हणतात...
? पोजर यांनी मेस्सीला जास्त मांसाहार न करण्याचाही सल्ला दिलाय...‘पिझ्झा’ हा देखील त्याच्या आवडत्या खाद्यपदार्थांपैकी एक. पण तोही खाणं बंद करण्यास त्याला सांगण्यात आलंय...
- राजू प्रभू
खेळ जुनाच, ओळख नवी !
‘ट्रायथलॉन म्हणजे ‘स्टॅमिना’ आणि वेग यांचा कस पाहणारा एक ‘मल्टिस्पोर्ट्स इव्हेंट’. यामध्ये एकापाठोपाठ एक होणाऱया तीन वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांचा समावेश असतो...
‘सुपरस्प्रिंट ट्रायथलॉन’, ‘स्प्रिंट ट्रायथलॉन’, ‘ऑलिम्पिक ट्रायथलॉन’, ‘हाफ-आयर्नमॅन ट्रायथलॉन’ अन् ‘फूल आयर्नमॅन ट्रायथलॉन’ असे त्याचे अंतराच्या बाबतीत भिन्नता असलेले वेगवेगळे प्रकार आढळतात...
सर्वांत प्रचलित प्रकारात जलतरण, सायकलिंग आणि धावणे यांचा समावेश होतो. ऑलिम्पिकमध्ये ‘ट्रायथलॉन’ होते ती याच क्रमाने...
ऑलिम्पिकंमध्ये समाविष्ट नवीन खेळांपैकी हा एक. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत 2000 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्याने पदार्पण केले...
ऑलिम्पिकमध्ये ‘ट्रायथलॉन’च्या अंतर्गत 1.5 किलोमीटरांची पोहण्याची, 40 किलोमीटरांची सायकलिंग आणि 10 किलोमीटरांची धावण्याची शर्यत होते...
टोकियोतील 2020 च्या ऑलिम्पिकमध्ये ‘मिश्र रिले’ची आणखी एक स्पर्धा जोडली गेली. यात दोन पुरुष नि दोन महिलांचे संघ आपल्या सहकाऱयाला ‘टॅग’ करण्यापूर्वी 300 मीटर पोहणे, 8 किलोमीटरांचे सायकलिंग आणि 2 किलोमीटरांच्या धावण्याच्या शर्यतीत सहभागी झाले...