सोमवारी शेअरबाजार घसरणीसह बंद
सेन्सेक्स 519 अंकांसह घसरला ः हिंडाल्को, टीसीएस नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअरबाजार सोमवारी घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 519 अंकांसह घसरणीसोबत बंद झाला आहे.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 519 अंकांच्या घसरणीसह 61,144.84 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 147 अंकांच्या घसरणीसह 18,159.95 अंकांवर बंद झाल्याचे पाहायला मिळाले. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेची बैठक लवकरच होणार असून याचा परिणाम बाजारावर दबाव निर्माण करताना दिसला. तर दुसरीकडे पुढील वर्षासाठी भारताचा विकास दर कमी होणार असल्याचा अंदाज गोल्डमॅन सॅच समूहाने वर्तविल्याने तोही परिणाम बाजारावरती तरळत होता. दिवसभराच्या सत्रामध्ये सेन्सेक्स 550 अंकांपर्यंत खाली घसरला होता.
निफ्टी निर्देशांकातील 35 समभाग घसरणीत होते. अदानी पोर्ट्स, हिंडाल्को, टीसीएस, एचडीएफसी, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिरो मोटो कॉर्प, इन्फोसिस, जेएसडब्ल्यू स्टील, ग्रेसीम आणि बजाज फायनान्स यांचे समभाग सोमवारी शेअरबाजारात 1.5 टक्के ते 2 टक्के इतके घसरणीत राहिले होते. सार्वजनिक बँकांचा निर्देशांक मात्र याउलट 1.4 टक्के तेजी दर्शवत होता. निफ्टीमधील आयटी आणि रिऍल्टी हे निर्देशांक मात्र घसरणीसह बंद झाले. याचदरम्यान आर्चियन केमिकल इंडस्ट्रीज यांचा समभाग 450 रुपयांवर शेअरबाजारामध्ये प्रिमियमसह लिस्ट झाला. या कंपनीची इश्यू किंमत 407 रुपये प्रतिसमभाग इतकी होती.
जागतिक बाजारांकडे पाहता युरोपियन बाजार काहीसे संमिश्र प्रतिसाद दर्शवत होते. महागाईचा दबाव या बाजारामध्ये अधिक दिसून आला. अमेरिकेतील बाजार काहीसे तेजी दर्शवत होते. आशियाई बाजारामध्ये निक्की आणि सेट कम्पोझिट फक्त तेजीत होते. हँगसेंग 336 अंक, कोस्पी 24, शांघाय कम्पोझिट 12 अंकांसह घसरणीत व्यवहार करत होता.