For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘सेव्हन सिस्टर्स’ यंदा काय करणार...

06:29 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘सेव्हन सिस्टर्स’  यंदा काय करणार
Advertisement

आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा आणि मणिपूर या राज्यांची ओळख ‘सात भगिनी“ किंवा सेव्हन सिस्टर्स अशी आहे. यातील त्रिपुरा आणि मणिपूर वगळता इतर राज्ये पूर्वी आसामचाच भाग होती. तथापि, नंतर तेथील जनतेची मागणी लक्षात घेऊन त्यांची वेगळी राज्ये निर्माण करण्यात आली होती. या सात राज्यांच्या प्रदेशाला ‘ईशान्य भारत“ म्हटले जाते. हा भाग चीन, भूतान, म्यानमार आणि बांगला देश अशा चार देशांच्या सीमेवर आहे. त्यापैकी चीन हा सातत्याने भारताच्या कुरापती काढत असतो. तसेच, म्यानमार सीमेवरही फुटीर गट मोठ्या प्रमाणात आहेत. बांगला देशची सीमा शांत असली तरी तेथून मोठ्या प्रमाणात भारतात घुसखोरी झालेली आहे. या सात राज्यांचा परस्परांमध्ये असणारा सीमासंघर्ष नेहमी डोके वर काढत असतो. या प्रदेशात सिक्किम या भारतात 1971 नंतर समाविष्ट झालेल्या प्रदेशाचाही समावेश केला जाते. सिक्किम आणि त्रिपुरा ही दोनच राज्ये त्यामानाने शांत आहेत. ही सर्व राज्ये संवेदनशील असूनही त्यांच्याकडे दुर्लक्षच करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार केंद्रात स्थानापन्न झाल्यानंतर या प्रदेशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा, वीजव्यवस्था, सीमांची नाकेबंदी, वैद्यकीय आणि शैक्षणिक सुविधा आणि इतर सोयी देण्यात येत आहेत. मार्गनिर्मिती तर पन्नास वर्षांमध्ये झाली नव्हती, इतकी गेल्या 10 वर्षांमध्ये झाल्याचे दिसून येते. या प्रदेशाचे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्व काय, याचा हा संक्षिप्त आढावा...

Advertisement

आसाम : सर्वात  मोठे राज्य

? सात भगिनींपैकी सर्वात मोठे आसाम राज्य आहे. येथे लोकसभेच्या 14 जागा आहेत. पश्चिमेकडून येणारी गंगा आणि उत्तरेकडून येणारी ब्रम्हपुत्रा या नद्यांनी या राज्याचे तीन मोठे भाग केलेले आहेत. पूर्व आणि उत्तरेच्या भागात वनवासींचे बाहुल्य आहे. पश्चिमेला चहा मळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

Advertisement

? या राज्यात हिंदू बहुसंख्य असले तरी मुस्लीमांची संख्याही 34 टक्के आहे. चार जिल्ह्यांमध्ये मुस्लीमांची लोकसंख्य अधिक प्रमाणात एकवटली आहे. यातील बहुसंख्य मुस्लीम बांगला देशातून बेकायदा घुसखोरी करुन आल्याचा आरोप केला जातो. येथे भारतीय जनता पक्षाचे राज्य सलग दुसऱ्यांना निवडून आलेले आहे.

? लोकसभा निवडणुकीतही गेल्या दोन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठी कामगिरी केलेली आहे. 2014 च्या निवडणुकीत 8 तर 2019 च्या निवडणुकीत 10 जागांवर या पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत. या पक्षासह राज्यात काँग्रेस, एआययुडीएफ, आसाम गण परिषद असे मोठे पक्ष आहेत.

मुख्य मुद्दे

? चहामळ्यांमधील कामगारांच्या वेतनाची समस्या, उत्तरेकडील वनवासी आणि बंगाली भाषिकांमधील संघर्ष, बांगला देशातून आलेले घुसखोर आणि त्यांनी काही जिल्ह्यांमध्ये बदललेली लोकसंख्येची समीकरणे, मुस्लीम घुसखोरांमुळे निर्माण होणारे सामाजिक ताणतणाव, इत्यादी अनेक मुद्दे अनेक दशकांपासून येथे आहेत.

राजकीय स्थित्यंतरे

? प्रारंभी काँग्रेसचा गढ असलेले हे राज्य 1982 च्या विद्यार्थी आंदोलनामुळे आसाम गणपरिषदेकडे नंतरच्या काळात वळले. हे आंदोलन बांगला देशातून आलेल्या घुसखोरांविरोधात प्रामुख्याने होते. याच आंदोलनातून आसाम गणपरिषदेला बळ मिळाले आणि दोनवेळा या पक्षाने राज्याची सत्ता मिळविली.

? गेल्या 25 वर्षांमध्ये येथे भारतीय जनता पक्षाचा उदय आणि विकास झाला आहे. आसाम गणपरिषदेचा प्रभाव ओसरल्यानंतर भारतीय जनता पक्ष येथे प्रमुख विरोधी पक्ष बनला. नंतर आसाम गणपरिषदेची या पक्षाशी युती झाली. आता दोन्ही पक्ष युती करुन निवडणुकांमध्ये उतरतात. ही युती यशस्वी झाली आहे.

सध्याची परिस्थिती

? सध्या भारतीय जनता पक्ष आणि आसाम गणपरिषद आणि वनवासींचा पक्ष अशी युती आहे. या युतीच्या विरोधात काँग्रेस असून एआययुडीएफ हा मुस्लीमांचा पक्षही स्पर्धेत आहे. विविध मतदानपूर्व सर्वेक्षणांच्या अनुसार भारतीय जनता पक्ष आणी त्याच्या युतीला वातावरण पोषक असल्याची स्थिती येथे दिसून येते.

अरुणाचल प्रदेश : सीमावर्ती राज्य

? हे राज्य ईशान्य भारताच्या उत्तरेला असून त्याची मोठी सीमा चीनने गिळंकृत केलेल्या तिबेटला लागून आहे. चीन या राज्याला तिबेटचा दक्षिण भाग मानतो. तसेच हा आपलाच प्रदेश आहे असाही त्याचा दावा असतो. त्यामुळे येथे सीमेवर मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून सैन्याच्या त्वरित हालचालींसाठी गेल्या 10 वर्षांमध्ये मार्गांचे जाळे उभारण्यात आले आहे. चीनचे येथे मधून मधून घुसखोरीचे प्रयत्न होत असतात. त्यामुळे सीमावर्ती भागावर लक्ष ठेवावे लागते.

? या राज्यात लोकसभेचे दोन मतदासंघ असून भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू हे लोकप्रिय नेते आहेत. राज्य सरकारही याच पक्षाचे आहे. राज्यात वनवासी, शहरी नागरीक, निमशहरी लोकसंख्या, काही प्रमाणात अन्य मागासवर्गीय अशी लोकसंख्या असून हे हिंदुबहुल राज्य आहे. येथे बांगला देशातून झालेल्या घुसखोरीचे प्रमाण कमी आहे. या लोकसभा निवडणुकीतही येथे भारतीय जनता पक्षाचेच वर्चस्व असेल, असे अनुमान आहे.

त्रिपुरा : प्राचीन प्रदेश

?           त्रिपुरा हे सात भगिनींपैकी दुसरे हिंदूबहुल राज्य असून त्याला प्राचीन असा इतिहास आहे. हे राज्य भारताच्या ईशान्य टोकाला असून बांगला देशच्याही पलिकडे आहे. येथे मूळच्या नागरीकांसमवेत बंगाली, काही प्रमाणात मुस्लीम, अन्य मागासवर्गिय, बिहारमधून आलेले नागरीक अशी वस्ती आहे. चाळीस वर्षे सतत येथे डाव्या आघाडीचे वर्चस्व होते. माणिक सरकार हे डाव्यांचे नेते आहेत. मात्र, आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव ओसरल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

?           तथापि, 2018 आणि 2023 या दोन्ही विधानसभांमध्ये भारतीय जनता पक्षाने पूर्ण बहुमत मिळविले. येथे काँग्रेसचाही काही शहरी भागांमध्ये प्रभाव आहे. येथील प्रमुख मुद्दा राज्याच्या पश्चिमेला असणाऱ्या वनवासी बहुल भागाची अस्मिता हा आहे. वनवासींचा एक पक्षही नव्याने उदयाला आलेला आहे. दोन लोकसभा निवडणुकांमध्ये दोन पैकी दोन जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या होत्या. बहुतेक सर्व विश्लेषकांच्या अनुमानांनुसार हाच पक्ष विजयी होण्याची शक्यता आहे.

मणिपूर : अशांत राज्य

? मणिपूर या राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर अशांतता दिसून येते. शहरी आणि निमशहरी प्रदेशांमधील हिंदू जनता आणि डोंगराळ भागातील अनेक ख्रिश्चन वनवासी समुदाय यांच्यात वर्चस्वाच्या मुद्द्यावर झालेल्या संघर्षात मोठा हिंसाचार झाला होता. आता तो थांबला असला तरी अशांतता कायम आहे. हे देखील हिंदू बहुल राज्य असले तरी, ख्रिश्चन लोकसंख्या येथे लक्षणीय प्रमाणात आहे.

? मुख्य वाद मैतेयी आणि कुकी समुदाय यांच्यात आहे. मैतेयी हे प्रामुख्याने हिंदूधर्मिय आहेत आणि ते खोऱ्यांच्या सपाट प्रदेशात राहतात. कुकी आणि नागा या वनवासी जमाती आणि उपजमाती डोंगराळ प्रदेशात आहेत. खोऱ्यांचा प्रदेश डोंगराळ प्रदेशानी वेढलेला आहे. जनजातींमध्ये आपला समावेश करावा ही मैतेयींची मागणी आहे. या मागणीला कुकी-नागांचा मोठा विरोध आहे.

मिझोराम : नेहमी अशांत

? ईशान्य भारतातील हे छोटे राज्य असून लोकसंख्या चाळीस लाखांच्या आसपास आहे. लोकसभेचा एक मतदारसंघ येथे आहे. येथे प्रामुख्याने काँग्रेस आणि मिझो नॅशनल फ्रंट असे पक्ष असून भारतीय जनता पक्षाचे नाममात्र अस्तित्व आहे. हे ख्रिश्चन बहुल राज्य असून अनेक वनवासी जमातींचा लोकसंख्येत समावेश आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून फुटीरतावाद या राज्यात मोठ्या प्रमाणात असून किमान 20 फुटीरवादी संघटना कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. म्यानमारची सीमा लागलेली असल्याने दोन्हीकडचे फुटीरवादी एकमेकांच्या संपर्कात सहजपणे राहू शकतात. भारत सरकारसाठी हा फुटीरतावाद मोठी डोकेदुखी असून सध्या म्यानमार सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे.

मेघालय : तुलनेने शांत

? ईशान्य भारताच्या दक्षिणेला असलेले हे राज्य तुलनेने शांत आहे. बांगला देशच्या उत्तरसीमेला लागून असलेल्या हे राज्य प्रचंड पावसाचे असल्याने त्याला मेघालय असे संबोधले जाते. हेही ख्रिश्चनबहुल राज्य असून प्रामुख्याने वनवासी समुदायांचे आहे. येथे लोकसभेच्या दोन जागा आहेत. काँग्रेसचे वर्चस्व येथे बराच काळ होते. तथापि, पी. ए. संगमा यांच्या पक्षत्यागानंतर काँग्रेसचे वर्चस्व कमी होत गेले. तसेच भारतीय जनता पक्षालाही येथे मोठे स्थान नाही. मिझोराम आणि नागालँड प्रमाणे या राज्याचाही आसाम राज्याशी सीमांवरुन झगडा होत असतो. तथापि, आता काही प्रमाणात ही भांडणे थांबली असल्याचे दिसून येते.

नागालँड : फुटीरवाद्यांचे आश्रयस्थान

? पश्चिमेला आसाम आणि पूर्वेला म्यानमारची सीमा असणारे हे राज्य मोठ्या प्रमाणात असणाऱ्या फुटीरवादामुळे प्रसिद्ध आहे. या राज्यालाही प्राचीन इतिहास असून  नाग जमातीच्या लोकांची भूमी असा त्याचा उल्लेख प्रचीन ग्रंथांमध्ये दिसून येतो. हे ख्रिश्चनबहुल राज्य असून येथे लोकसभेची एक जागा आहे. नेहमी प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व येथे राहिले आहे. तसेच काँग्रेस पक्षाचाही प्रभाव आहे. भारतीय जनता पक्षाचे अस्तित्व नाममात्र असून लोकसभेच्या दृष्टीने मोठे महत्व या राज्याला नसले तरी, ते संवेदनशील असल्याने दुर्लक्षित करण्यासारखे नाही.

एकंदरित निष्कर्ष

? या सात भगिनींना लोकसभेतील सदस्यसंख्येच्या दृष्टीने जसे महत्व आहे, तसे तेथील परिस्थितीमुळेही आहे. फुटीरतावाद आणि त्याच्यासाठी सशस्त्र संघर्ष करणाऱ्या टोळ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना सीमेपलिकडून, अर्थात चीन आणि म्यानमार यांच्याकडून सहाय्य होत असते. सीमासंरक्षणाच्या दृष्टीने हा भाग अत्यंत संवेदनशील असल्याने संरक्षणाची व्यवस्था कडोकोट ठेवावी लागत आहे.

? या सात राज्यांपैकी आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि मणिपूर ही चार हिंदुबहुल असून त्यांच्यात भारतीय जनता पक्षाला चांगले स्थान आहे. मिझोराम, मेघालय आणि नागालँड ही ख्रिश्चनबहुल राज्ये असून तेथे काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांचा प्रभाव दिसून येतो. वनवासी समुदायांची संख्या या सर्व राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. फुटीरतावाद आणि घुसखोरी या मुख्य समस्या आहेत.

? या सात राज्यांमध्ये लोकसभेच्या एकंदर 25 जागा असून संख्येच्या द़ृष्टीने त्या देशात चौथ्या क्रमांकाच्या महत्वाच्या जागा आहेत. सध्या या जागांपैकी 16 भारतीय जनता पक्षाकडे असून त्याच्या मित्रपक्षांकडे सहा जागा आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतरही  दोन-तीन जागांच्या अंतराने हीच परिस्थिती असू शकते, असे विविध मतदानपूर्व सर्वेक्षणांच्या अनुमानांवरुन दिसून येत आहे.

Advertisement
Tags :

.