सेन्सेक्स वधारला-निफ्टीत घसरण
सेन्सेक्स 12.81 अंकानी तेजीत : निफ्टी 12,352.35 वर बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
मुंबई शेअर बाजारात आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी सेन्सेक्समध्ये दूरसंचार आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील कामगिरीमुळे बाजारत तेजीचे वातावरण राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. सेन्सेक्स दिवसअखेरीस 12.81 अंकानी वधारुन 41,945.37 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला मात्र राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 3.15 अंकानी घसरुन 12,352.35 वर बंद झाली आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये दिवसभरात रिलायन्स इंडस्ट्रीज , एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि टीसीएस या कंपन्यांच्या समभागात नफा कमाई झाली आहे. तर भारती एअरटेलचे समभाग सर्वाधिक म्हणजे 5.47 टक्क्यांनी वधारले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाकडून दूरसंचार कंपन्यांना थकबाकी जमा करण्या संदर्भात कोणताही दिलासा मिळणार नसल्याचा आदेश देण्यात आला आहेत. यामुळे यांचा काहीसा परिणाम दूरसंचार कंपन्यांच्या समभागांवर होणार असल्याचे संकेत आहेत.
एचडीएफसी कंपनीचे समभाग 1.23 टक्क्यांनी, इंडसइंड बँक, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक आणि लार्सन ऍण्ड टुब्रो यांचे समभाग सर्वाधिक घसरल्याचे दिसून आले आहेत. दुसऱया बाजूला भारती एअरटेल, रिलायन्स, सन फार्मा, एचसीएल टेक आणि मारुती सुझुकी यांचे समभाग मात्र वधारले होते.
तिमाही आकडेवारी
डिसेंबर तिमाहीतील नफा कमाईचे आकडे सध्या कंपन्यांकडून सादर करण्यात येत आहेत. यामध्ये टीसीएस एचसीएलचे आकडे सादर झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात या कंपन्यांच्या समभागात मोठी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.