सेनेच्या मोर्चेबांधणीने उत्सुकता वाढली
जि. प. अध्यक्षपद निवड आज : सत्ताधारी भाजपकडून मनस्वी घारेंचे नाव आघाडीवर
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक 24 मार्चला होत असून ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या या पदासाठी सत्ताधारी भाजपकडून मनस्वी घारे यांचे नाव आघाडीवर आहे. त्याशिवाय अनेक नावे चर्चेत आहेत. त्यामुळे आयत्यावेळी अनपेक्षित नाव पुढे येऊन धक्कातंत्राचाही वापर होऊ शकतो. तर दुसरीकडे शिवसेनेनेही भाजपच्या नाराज सदस्यांना हाताशी धरून अध्यक्ष पदाची निवडणूक लढण्याची जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे जि. प. अध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष व विषय समितीच्या चार सभापती निवडीसाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. अध्यक्षपदाची निवडणूक 24 मार्चला, तर विषय समिती सभापती पदाची निवडणूक 26 मार्चला होणार आहे. दरम्यान, अध्यक्षपदी व सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता आहे.
24 व 26 मार्चला जि. प. च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सकाळी 11 ते 3 या वेळेत हा निवडणूक कार्यक्रम होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भू संपादन अधिकारी वर्षा शिंगण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अध्यक्षपदी कुणाची वर्णी? राजकारण तापले
जि. प. अध्यक्षपद हे ओबीसी महिलासाठी आरक्षित आहे. त्यामुळे या प्रवर्गातील सत्ताधारी भाजपकडे संजना सावंत, मनस्वी घारे, उन्नती धुरी, माधुरी बांदेकर, समिधा नाईक या उमेदवार आहेत. पैकी देवगड तालुक्मयातील किंजवडे मतदारसंघातून विजयी झालेल्या मनस्वी घारे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, इच्छुकांची संख्या जास्त असल्याने आयत्यावेळी अनपेक्षित नावही पुढे येऊ शकते.
भाजपकडे एकूण 31 सदस्य असल्याने पूर्ण बहुमत आहे. परंतु, काही सदस्य नाराज असल्याने शिवसेनेसोबत जाण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे खासदार नारायण राणे यांनी सर्व सदस्यांची एक बैठक घेऊन सर्वांनी संघटित राहण्याच्या सक्त सूचनाही दिल्या आहेत. तरीही काही सदस्य शिवसेनेसोबत जातात का? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
शिवसेनाही अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याच्या तयारीत
शिवसेनेकडे 19 सदस्य आहेत. पूर्ण बहुमत नसले, तरी अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. भाजपचे नाराज सदस्य हाताशी लागले, तर भाजपला शिवसेना धक्का देऊ शकते. त्यामुळे शिवसेनेमधून ओबीसी महिला प्रवर्गातील सदस्या स्वरुपा विखाळे यांचे नाव पुढे येऊ शकते तसेच शिवसेनेने आपल्या सदस्यांची फोडाफोडी होऊ नये, यासाठी गोवा सीमेवर एका अज्ञातस्थळी त्यांना ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जि. प. अध्यक्ष निवडीची उत्सुकता वाढली आहे.