सुरतमधील हिऱयांच्या उद्योगावर कोरोनाची छाया
हिऱयाचा व्यापार अडचणीत येण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ सुरत
कोरोना विषाणुचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम भारतामधील सुरतमधील हिऱयांच्या उद्योगावर होत असून गेल्या दोन महिन्यांमध्ये तब्बल 8 हजार कोटी रुपयाचे नुकसान होण्याचा अंदाज तज्ञांनी मांडला आहे. सुरतच्या हिऱयांच्या उद्योगासाठी जगातील हाँगकाँग सर्वात मोठे केंद्र आहे. परंतु मागील काही दिवसांपासून चीनमधील वुहानसह हाँगकाँग शहरात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. यामुळे या व्यवसायाची गती मंदावत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
प्रत्येक वर्षाला जवळपास 50 हजार कोटी रुपयाचे हिरे आणि दागिने यांना पॉलिश करुन त्याची हाँगकाँगला निर्यात केली जाते. तर सुरतमधील एकूण हिऱयांची निर्यात 37 टक्के असल्याची माहिती जेम्स ऍण्ड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशनचे रीजनल अध्यक्ष दिनेश नवादिया यांनी सांगितले आहे.
देशातील 99 टक्के हिरेसुरतमध्ये होतात पॉलिश
हाँगकाँगमध्ये मार्च महिन्यात पहिल्या आठवडय़ापर्यंत सुट्टय़ा घोषित करण्यात आल्या आहेत. गुजरातमधील काही व्यापाऱयाचे त्या ठिकाणी कार्यालये आहेत. त्याना हाँगकाँगमधून माघारी यावे लागले आहे. सध्याची स्थिती लवकरच नियंत्रणात न आल्यास हिरा उद्योगाला मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशात जो हीरा आयात केला जातो त्यातील 99 टक्के हिरा हा सुरतमध्येच पॉलिश करण्यात येतो.
दागिन्याचा व्यवसायही नुकसानीत?
हाँगकाँगमध्ये पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय दागिन्याचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. परंतु कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रसारामुळे ते प्रदर्शन रद्द होण्याची शक्यता सध्या व्यक्त होत आहे. परंतु जर असे झाले तर सुरतमधील दागिन्याचा व्यवसाय अडचणीत येण्याचे संकेत आहेत. कारण आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये हीरे आणि सोन्याचे दागिन्यांची मोठय़ा प्रमाणात विक्री होत असते. त्यावर आधारीत मिळणाऱया ऑर्डरच्या प्रमाणानुसार आम्ही वर्षभरातील व्यापाराचे ध्येय निश्चित करत असल्याचे हिऱयाचे व्यापारी प्रवीण नानावती यांनी सांगितले.