सिकंदराबाद येथे 11 जणांचा होरपळून मृत्यू
हैदराबाद / वृत्तसंस्था
तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद शहरात लाकडाच्या एका वखारीला लागलेल्या भीषण आगीत किमान 11 जण जळून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. ही आग बुधवारी पहाटे 4 च्या आसपास लागली. जळालेले सर्वजण याच वखारीत रोजंदारीवर कामाला होते आणि ते बिहारचे होते, अशी माहिती देण्यात आली.
या वखारीत भंगाराचे गोदामही होते. येथे किमान 15 कामगार रात्री झोपलेले असताना ही आग लागली. ती कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी या घटनेसंबंधात दुःख व्यक्त केले असून प्रत्येक मृतामागे 2 लाख रुपयांचे अनुदान घोषित केले.
श्वास कोंडल्यामुळे मृत्यू
हे कामगार गोदामातील दोन खोल्यांमध्ये झोपले होते. आग लागल्यानंतर त्यांना लवकर बाहेर पडता आले नाही. धुरामुळे त्यांचा श्वास कोंडून ते बेशुद्ध झाले असावेत आणि नंतर आग पसरल्यावर त्यांचा जळून मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आग लागल्यानंतर काही वेळातच अग्नीशमन दलाने ती विझविण्याचा प्रयत्न सुरु केला. तथापी या कामगारांचे प्राण वाचू शकले नाहीत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही या घटनेसंबंधात दुःख व्यक्त केले असून राज्य सरकारच्या वतीने प्रत्येक मृतामागे 5 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान घोषित केले. तसेच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांना दिला. आगीची कारणे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होतील असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या घटनेचा सविस्तर अहवाल राज्य सरकारने द्यावा असा आदेश दिला आहे.