सिंधुदुर्गात तात्पुरते कोविड रुग्णालय सुरू करा!
आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जिल्हय़ात कोविड 19 तपासणी लॅब सुरू करा
मुख्यमंत्र्यांसोबत नाईक यांचा व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद
वार्ताहर / कणकवली:
जिल्हय़ात कोरोना व्हायरसची तपासणी लॅब करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सिंधदुर्गात कोरोना टेस्ट, रुग्णांसाठी बेडची संख्या वाढविणे व मुंबईप्रमाणे तात्पुरते कोविड रुग्णालय सिंधुदुर्गात उभारण्याची मागणी नाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. रत्नागिरी येथे कोविड लॅब सुरू करण्यास मंजुरी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती नाईक यांनी दिली.
या व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये नाईक यांनी कोरोनासंदर्भात जिल्हय़ात येणाऱया समस्यांबाबत अनेक मुद्दे मुख्यमंत्र्यांकडे थेट मांडले. मुंबईहून गावी येणाऱया चाकरमान्यांबाबत नाईक यांनी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडली. या सर्व प्रश्नांवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे ठाकरे यांनी मान्य केल्याची माहिती नाईक यांनी दिली.
सिंधुदुर्गात कोविडची लॅब करा!
मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधताना आमदार नाईक म्हणाले, मुंबईतून मोठय़ा संख्येने चाकरमानी जिल्हय़ात येत आहेत. जिल्हय़ात कोरोनाचे 17, तर रत्नागिरी जिल्हय़ात 150 रुग्ण आढळले आहेत. मात्र, या रुग्णांच्या प्रमाणात कोरोना टेस्ट जिल्हय़ात होत नाहीत. मुंबईतील सुमारे 40 हजार चाकरमानी जिल्हय़ात आले आहेत. 2 लाख चाकरमानी जिल्हय़ात येण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे मुंबईसारख्या कोरोना बाधीत भागातून जिल्हय़ात एवढय़ा मोठय़ा संख्येने चाकरमानी आले, तर त्यांची तातडीने तपासणी करण्याच्या अनुषंगाने सिंधुदुर्गातच कोविड 19 ची तपासणी होण्याची गरज आहे.
तात्पुरते कोविड रुग्णालय सुरू करा!
कोरोना पॉझिटिव्ह मिळालेल्या रुग्णांच्या संख्येत जिल्हा रुग्णालयात बेडची संख्या कमी पडत आहे. येणाऱया मुंबईकर चाकरमान्यांच्या दृष्टीने मुंबईप्रमाणे तात्पुरते कोविड रुग्णालय सिंधुदुर्गात उभारण्याची मागणी नाईक यांनी केली. ज्यामुळे पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना जलदगतीने उपचार देणे सोपे जाणार असल्याकडे नाईक यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
चाकरमान्यांना टप्प्याटप्प्याने गावी पाठविणार!
नाईक यांनी मांडलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी येथे कोविड तपासणी लॅब सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. तेथे सिंधुदुर्गातील कोरोना टेस्ट होतील, असे स्पष्ट केले. जे चाकरमानी मुंबईत आहेत, त्यांनी गावी जाण्याची घाई करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. तुम्ही जेथे आहात, तेथे सुरक्षित आहात. ज्यांना अत्यावश्यक आहे, अशाच चाकरमान्यांना त्यांच्या मूळ गावी टप्प्याटप्प्याने पाठविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती नाईक यांनी दिली.