सातारा तालुक्यात 141 जण बाधित
प्रतिनिधी /सातारा
सातारा तालुक्यात कोरोनाचा वाढता आकडा काही थांबेना झाला आहे. तालुक्यातील सातारा शहरासह 194 गावातील बहुतांशी गावात कोरोना पोहचला आहे. कोरोनाच्या अनुषंगाने प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सातारा पंचायत समितीत बैठक घेतली आहे. त्या बैठकीत गणनिहाय कंटेटमेंट झोन कसे करायचे, कोणत्या उपाययोजना करायच्या त्यावर सुचना दिल्या. रात्री आलेल्या अहवालात तालुक्यात 141 जण बाधित झाले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
सातारा तालुक्यात बहुतांशी गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांची साखळी तुटता तुटेना झाली आहे. नव्याने रुग्णांची भर पडत आहे. आढळून येणारे रुग्णांमध्ये वृद्ध रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याकरता प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सातारा पंचायत समितीत बैठक घेतली. त्या बैठकीला सभापती सौ. सरिता इंदलकर, गटविकास अधिकारी किरण सायमोते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांच्यासह विस्तारअधिकारी उपस्थित होते. सातारा तालुक्यात वाढत चालेल्या आकडेवारीवरुन प्रत्येक गावाची गणनिहाय माहिती घेण्यात आली. एखादा रुग्ण आढळून आल्यास तेथे कंटेटमेंट झोन कसा करायचा त्यावर सुचना देण्यात आल्या. प्रांताधिकारी यांनी दिलेल्या सुचनांचे पालन प्रत्येक गावात झाले पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला. काल रात्री जाहीर झालेल्या अहवालात क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे कोडवे येथील 60 वर्षीय पुरुष, सातारा येथील 54 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.