सलग तिसऱया दिवशी सेन्सेक्स तेजीत
सेन्सेक्स 353 अंकानी वधारला : निफ्टी 12,089.15 वर बंद
चालू आठवडय़ात मुंबई शेअर बाजार सलग तिसऱया दिवशी तेजीत राहिला आहे. मागील आठवडय़ापासून कोरोना विषाणुच्या धास्तीने जगभरातील शेअर बाजारात कोसळले, उद्योग व्यापार क्षेत्र सुस्त पडले होते, विमान प्रवास आवश्यक असल्यास करावा आणि याची दखल घेत संयुक्तराष्ट्र संघाकडून जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली होती. यामुळे शेअर बाजारातील व्यवहारावर सगळय़ात मोठा प्रभाव राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. बुधवारी जगातील संशोधकांना कोरोना विषाणूला प्रतिबंद करण्यासाठी औषध शोधण्यास यश मिळाले असल्याचा अहवाल सादर झाल्यामुळे हा उत्साह राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिवसभरातील बीएसई व्यवहारात सेन्सेक्स दिवसअखेर 353.28 अंकानी वधारुन निर्देशांक 41,142.66 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 109.50 अंकानी वधारुन 12,089.15 वर बंद झाला आहे. प्रमुख कंपन्यांमध्ये टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक 5.14 टक्क्यांनी तेजीत राहिले असून सोबत भारती एअरटेल, एचडीएफसी, टीसीएस, लार्सन ऍण्ड टुब्रो, स्टेट बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग वधारले आहेत.
दुसऱया कंपन्यांमध्ये हिरो मोटोकॉर्पचे समभाग 3.83 टक्क्यांनी घसरले असून पॉवरग्रिड कॉर्प, एशियन पेन्ट्स आणि नेस्ले इंडियाचे याचे समभाग मात्र नुकसानीसह घसरुन बंद झाले आहेत.
सेवा क्षेत्राचा उच्चांक
भारतामधील सेवा क्षेत्रातील कामगिरी सुधारणा झाली असून मागील सात वर्षांचा उच्चांक सेवा क्षेत्राने पार केला आहे. यामध्ये नवीन व्यवसाय, नवे रोजगार आणि मागणीत होत असणारी वाढ यामुळे ही कामगिरी झाली असल्याचे आयएचएस मार्केट सर्वेक्षणातून मांडले आहे. याचा फायदा शेअर बाजारातील व्यवहारार बुधवारी झाल्याचे पहावयास मिळाले आहे.