सर्वसाधारण विमा कंपन्यांचे विलीनीकरण होणार मार्चपर्यंत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
सार्वजनिक क्षेत्रातील तीन सर्वसाधारण विमा कंपन्यांचे विलीनीकरण करण्याचा सरकारचा हेतू आहे. नॅशनल इन्शुरन्श कंपनी लिमिटेड, युनायटेड इंडिया इन्शुरन्श कंपनी लिमिटेड आणि ओरिएन्टल इन्शुरन्श कंपनी लिमिटेड यांचे विलीनीकरण मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तिन्ही कंपन्यांच्या संबंधित संचालक मंडळाने अगोदरच विलीनीकरणाला आपली तत्वतः मंजुरी दिली आहे, असे अर्थ सचिव राजीव कुमार यांनी सांगितले.
विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर काम सुरू असून, सरकार विलीनीकरणानंतर संबंधित कंपन्यांच्या सूचीबद्धतेबाबत निर्णय घेईल. विलीनीकरणाचा मार्ग सुलभ करण्यासाठी अर्थसंकल्पात या तिन्ही विमा कंपन्यांमध्ये पुढील आर्थिक वर्षात 6,950 कोटी रुपयांचे भांडवल जमा करण्याचा प्रस्तावही सरकारकडून करण्यात आला आहे. सरकारने पहिल्या पूरक अनुदान मागणीद्वारे चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबरमध्ये तिन्ही कंपन्यांमध्ये 2500 कोटी रुपयांचे भांडवल गुंतविले आहे, अशी माहितीही कुमार यांनी दिली.
तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2018-19 च्या अर्थसंकल्पात तिन्ही कंपन्यांचे विलीनीकरण करून एक विमा कंपनी बनविण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. परंतु, या तिन्ही कंपन्यांची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.