सरकारी पेट्रोलियम कंपन्या 98 हजार कोटी गुंतवणार?
गरजा पूर्ण करण्याचे लक्ष : चालू वर्षाच्या तुलनेत चार टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ओएनजीसी, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) तसेच इतर सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्या पुढील आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 98,521 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्या तेल आणि वायू उत्खनन, रिफायनरी, पेट्रोकेमिकल्स आणि पाईपलाईन टाकण्यासाठी ही गुंतवणूक करणार आहे. यामुळे ऊर्जेच्या वापराच्या बाबतीत जगात सर्वात वेगाने देशाच्या विकसित होणाऱया गरजांना पूर्ण केले जाऊ शकेल. पेट्रोलियम कंपन्या पुढील वर्षात चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत सुमारे चार टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक करणार आहेत. चालू आर्थिक वर्षात त्यांची गुंतवणूक 94,974 कोटी रुपये असेल असा अंदाज आहे.
ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनचा (ओएनजीसी) पुढील आर्थिक वर्षात गुंतवणूक 19 टक्क्यांनी वाढून 32,501 कोटी रुपये होईल. ओएनजीसीची विदेशी संस्था ओएनजीसी विदेश लि. (ओव्हीएल) देशाच्या बाहेर तेल आणि वायू व्यवसायासाठी 7,235 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. ही गुंतवणूक चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत सुमारे 10 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. देशातील सर्वात मोठी तेल रिफायनरी कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनची (आयओसी) गुंतवणूक 17.4 टक्क्यांच्या वाढीसह 26,233 कोटी रुपये असणार आहे.
गॅस कंपनी गेल इंडिया लिमिटेडची गुंतवणूक 5,412 कोटी रुपये राहणार आहे. परंतु, चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही गुंतवणूक अधिक नाही. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) 2020-21 मध्ये 11,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. देशातील दुसरी सर्वात मोठी पेट्रोलियम उत्पादक कंपनी आईल इंडिया लिमिटेड (ओआयएल) 3,877 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. चालू आर्थिक वर्षात त्यांची गुंतवणूक 3,675 कोटी रुपये राहील असा अंदाज आहे.
बीपीसीएलचा भांडवली खर्चाचा प्रस्ताव
खासगीकरणासाठी अग्रेसर असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीपीसीएल) पुढील आर्थिक वर्षासाठी 9 हजार कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाचा प्रस्ताव दिला आहे. हा चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत एक टक्क्यापेक्षा अधिक आहे.