सप्ताहाचा समारोप तेजीच्या उसळीने
वृत्तसंस्था/मुंबई :
चालू आठवडय़ात शेअर बाजारात तेजीचा प्रवास कायम राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यात केंद्र सरकारकडून येत्या 3 मेनंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता करण्याच्या संकेतामुळे आणि विविध प्रकारच्या आर्थिक मदतीच्या घोषणेमुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण राहिल्याचे दिसून आले आहे. गुरुवारी शेअर बाजाराचा अंतिम दिवस होता. कारण शुक्रवारी 1 मे असल्यामुळे महाराष्ट्र दिन व कामगार दिनामुळे बाजार बंद राहणार आहे. गुरुवारी शेअर बाजारातील सेन्सेक्स 997 अंकांनी वधारला तर निफ्टीनेही समाधानकारक कामगिरी केली आहे.
दिवसभरातील व्यवहारात जागतिक बाजारात सकारात्मक घडामोडीमुळे ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि बँकिंग क्षेत्रातील समभागात तेजी राहिली होती. यामुळे भारतीय शेअर बाजार सलग चौथ्या सत्रातही उत्साहाचे वातावरण कायम ठेवत बंद झाला आहे. दिवसअखेर सेन्सेक्स 997.46 अंकांनी वधारुन निर्देशांक 33,717.62 वर बंद झाला आहे तर दुसऱया बाजूला निफ्टी 306.55 अंकांनी वधारुन निर्देशांक 9,859.90 वर बंद झाल्याचे दिसून आले आहे.
बाजारात प्रमुख क्षेत्रात ऊर्जा माहिती तंत्रज्ञान आणि बँकिंग या क्षेत्रातील समभागांनी समाधानकारक कामगिरी केली आहे. यात ओएजीसीचे समभाग सर्वाधिक 13 टक्क्मयांपेक्षा अधिक वधारले आहेत. तसेच सोबत एचसीएल टेक, हिरोमोटो कॉर्प, एनटीपीसी, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, एनटीपीसी, टीसीएस, इन्फोसिस आणि मारुती सुझुकी यांचे समभाग वधारले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टेक महेंद्रा यांचे समभाग तिमाहीतील नफा कमाईच्या आकडेवारीमुळे 3 टक्क्मयांनी वधारले आहेत. दुसरीकडे मात्र हिंदुस्थान युनिलिव्हरच्या समभागाची घसरण झाली असून अन्य कंपन्यांमध्ये सन फार्मा, इंडसइंड बँक, एशियन पेन्ट्स यांचे समभागही घसरणीसह बंद झाले.
लॉकडाऊनच्या चर्चेचा परिणाम
देशातील दुसऱया सत्रातील लॉकडाऊन येत्या 3 मे रोजी समाप्त होणार आहे. यामुळे केंद्र आणि विविध राज्य सरकार विविध क्षेत्राला काही प्रमाणात दिलासा देण्याचे संकेत पहावयास मिळत आहेत. हीच चर्चा अन्य देशातही सुरु असल्याने यांचा योग्य परिणाम म्हणून शेअर बाजारातील गुंतवणूकदार धाडसाने गुंतवणूक करण्याकडे वळत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळेच देशातील शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.