महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सत्तासंग्राम

07:00 AM Feb 18, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

फूट पाडून सत्ता मिळविण्याचा काँग्रेसचा डाव

Advertisement

चन्नी यांच्या विधानाप्रकरणी बरसले राजनाथ सिंह

Advertisement

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे पंजाबमध्ये भैय्यांना येऊ देणार नसल्याचे म्हणत आहेत. त्यांचे विधान पाहता काँग्रेस फूट पाडून सत्ता प्राप्त करू पाहत असल्याचे स्पष्ट होते अशी टीका संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी केली आहे.

चन्नी हे भैय्यांना पंजाबमध्ये येऊ देणार नसल्याचे म्हणत असताना प्रियंका वड्रा टाळय़ा वाजवत होत्या. पंजाबमध्ये सध्या बदल घडवून आणण्याचे वातावरण दिसून येतेय. काँग्रेसने पंजाबला लुटले तर आम आदमी पक्षाने दिल्लीत काहीच केले नाही. काँग्रेसमध्ये एकाच क्रीझवर दोन जण फलंदाजी करत असल्याने ते बाद होणार हे निश्चित असल्याचे म्हणत राजनाथ यांनी चन्नी-सिद्धू यांच्यातील कोल्डवॉरचा मुद्दा उपस्थित केला आहे.

पंजाबमधील अमली पदार्थांची समस्या केवळ भाजपच संपवू शकतो. भाजप सरकार सत्तेवर आल्यास अमली पदार्थ कुणीच विकू शकणार नाही. काँग्रेसच्या प्रत्येक सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. परंतु भाजपच्या कुठल्याच सरकारवर असे आरोप झालेले नाहीत. भ्रष्टाचार भाजपच रोखू शकतो असे राजनाथ सिंह म्हणाले.

मोदी सिस्टीममध्ये 100 टक्के रक्कम लोकापर्यंत पोहोचेल असा बदल घडवून आणला गेला आहे. भाजप सरकार आल्यापासून भारताचा सन्मान विदेशात वाढला आहे. कोरोना संकटावर भारताने नियंत्रण मिळविले असून याची चर्चा जगभरात सुरू आहे. काँग्रेस पक्ष सत्ताप्राप्तीसाठी देशाला तोडण्यासही तयार असतो. सर्जिकल स्ट्राइकप्रकरणी काँग्रेस पाकिस्तानच्या तोंडी असलेली भाषा बोलत होता. बीएसएफचे अधिकारक्षेत्र वाढविण्यास काँग्रेसचा विरोध असल्याचे राजनाथ यांनी म्हटले आहे. राजनाथ गुरुवारी यांनी श्री हरमंदिर साहिब आणि श्री दुर्ग्याणा तीर्थमध्ये जात नमन केले आहे.

माझा मान ठेवून अखिलेशला विजयी करा

मैनपुरीत मुलायम सिंह यादवांचे भावुक आवाहन

आरोग्याच्या कारणास्तव आराम करत असलेले समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांनी गुरुवारी दीर्घकाळानंतर जाहीर सभेत हजेरी लावली आहे. मैनपुरीमध्ये सभेला संबोधित करताना त्यांनी भाजप सरकारच्या काळात गरीबी आणि बेरोजगारी वाढल्याचे म्हटले. समाजवादी पक्ष लोकांना निराश करणार नाही. माझ्या भावनेचा मान ठेवून अखिलेश यादव यांना मोठय़ा बहुमताने विजयी करा, असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले आहे.

लोकांमध्ये पोहोचल्यावर आनंद होतोय. भाजप सरकारमुळे जनता त्रस्त असून शेतकऱयांसमोर उत्पन्नाची समस्या उभी ठाकली आहे. शेतकऱयांना खत देणे, पाण्याची व्यवस्था करणे, युवकांना नोकरी मिळवून देणे हा समाजवादी पक्षाचा विचार आहे. सप सरकार आल्यावर रोजगाराची व्यवस्था केली जाईल तसेच व्यापाऱयांना सुविधा प्रदान करत शेतकऱयांचे पिक खरेदी करण्यास चालना देण्यात येईल, असे मुलायम म्हणाले.सध्या देशात भीतीचे वातावरण असून सर्व जण चिंतेत आहे. येथे लोक अपेक्षेसह आले असून त्यांची ही अपेक्षा सप सरकार पूर्ण करणार आहे. लोकांना निराश करणार नसल्याचा विश्वास मी देत आहे. शेतकरी, तरुणाई आणि व्यापारी हेच देशाचा विकास करतील असे त्यांनी म्हटले आहे.

अखिलेश देखील उपस्थित

मुलायम सिंह यांचे संबोधन समाप्त होईपर्यंत फिरोजाबादमधून अखिलेश यादव देखील मैनपुरीत पोहोचले. हा नेताजींचा मतदारसंघ राहिला आहे. नेताजींनी कुस्ती लढत अनेकांना चीतपट केले होते. भाजपचे लोक सहानुभूती मिळविण्यासाठी काहीही करू शकतात. कायद्याला न जुमानण्यांनी समाजवादी पक्षाला मतदान करू नये. आम्हाला अशा लोकांच्या मतांची गरज नाही. आम्ही राज्याला समृद्धीच्या मार्गावर नेऊ इच्छितो. भाजपला जितका मोठा नेता, तितक्याच प्रमाणात तो खोटं बोलतो असा दावा अखिलेश यांनी केला आहे.

डमी अर्ज मागे घेण्यास विसरली पत्नी

पतीविरोधात ठरली अपक्ष उमेदवार

पंजाबच्या 117 मतदारसंघांपैकी 2 ठिकाणी अजब प्रकार घडत आहे. या मतदारसंघांमध्ये पत्नीने डमी उमेदवार म्हणून अर्ज भरला होता, परंतु तो मागे घेण्यास विसरल्याने आता त्या पतीविरोधात अपक्ष उमेदवार ठरल्या आहेत. निवडणूक आयोगाने त्यांना निवडणूक चिन्ह देखील प्रदान केले आहे. या महिला आता प्रचार करत नसल्या तरीही पतींचे टेन्शन मात्र वाढले आहे. गैरसमजातून समर्थकांनी पत्नीला मतदान केल्यास पतींच्या विजयात अडथळा निर्माण होणार आहे. 

बैंस यांची पत्नीशीच लढत

लुधियानाच्या आत्मनगर मतदारसंघात आमदार सिमरजीत सिंह बैंस यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. बैंस हे लोक इन्साफ पक्षाचे प्रमुख आहेत. बैंस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुरिंदर कौर बैंस यांनी डमी उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. त्यांच्या पत्नी अर्ज मागे घेऊ न शकल्याने निवडणूक आयोगाने त्यांना अपक्ष उमेदवार मानत पेन्सिल बॉक्स हे चिन्ह प्रदान केले आहे.

शिअद उमेदवाराची गोची

कोटकपुराचे शिरोमणी अकाली दलाचे (अमृतसर-मान) उमेदवार जसकरन सिंह   यांच्यावर अशीच स्थिती ओढवली आहे. त्यांच्या पत्नी धनवंत कौर यांनी डमी उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. अर्ज भरताना तांत्रिक चूक झाली आणि निवडणूक आयोगाने धनवंत कौर यांना अपक्ष उमेदवारी म्हणून मंजुरी दिली.

यामुळे झाली ही स्थिती

आयोगानुसार मान्यताप्राप्त पक्षाच्या नामांकनासह एक प्रस्ताव जोडावा लागतो. उमेदवाराचा अर्ज स्वीकार होताच कव्हरिंग उमेदवाराचा अर्ज आपोआप फेटाळला जातो. नोंदणीकृत परंतु मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षांसाठी वेगळे नियम आहेत. त्यांना 10 प्रस्ताव जोडून अर्ज मागे घेण्यासाठी अर्ज करावा लागतो. एखाद्याने अर्ज मागे न घेतल्यास आयोग त्याच्या उमेदवारीला मान्यता देत कव्हरिंगला अपक्ष उमेदवार ठरवतो.

‘युपी के भैय्या’वर पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर

चन्नींकडून संत रविदास, गुरु गोविंद यांच्या भूमीचा अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी पंजाबच्या अबोहर येथे प्रचारसभेला संबोधित केले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या ‘युपी-बिहारच्या भैय्या’संबंधीच्या विधानावर त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  कॉँग्रेसने नेहमीच एका क्षेत्रातील लोकांचे दुसऱया क्षेत्रातील लोकांशी भांडण लावून दिले आहे. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याने विधान केले आणि दिल्लीच्या परिवाराच्या मालकाने शेजारी उभे राहून टाळय़ा वाजविल्याचे पूर्ण देशाने पाहिल्याचे मोदी म्हणाले.

उत्तरप्रदेश किंवा बिहारच्या बंधूभगिनी मेहनत करत नसतील असे एकही गाव पंजाबमध्ये नसेल. बुधवारीच आम्ही संत रविदास यांची जयंती साजरी केली. संत रविदास हे उत्तरप्रदेशच्या वाराणसीत जन्मले होते. काँग्रेस उत्तरप्रदेशच्या भैय्यांना घुसू देणार नसल्याचे म्हणत आहे. मग संत रविदास यांनाही बाहेर काढाल का? श्री गुरु गोविंद सिंह यांचा जन्म बिहारमधील पाटण्यात झाला. बिहारच्या लोकांना पंजाबमध्ये येऊ देणार नसल्याचे काँग्रेस म्हणत आहे. काँग्रेसने एकप्रकारे श्री गुरु गोविंद सिंहजी यांचाच अपमान केला असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

आम अदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवालांवर त्यांच्याच विश्वासू सहकारी आणि मित्राने (कवी कुमार विश्वास)  केलेले आरोप अत्यंत धोकादायक आहे. केजरीवालांच्या हेतूबद्दल त्याने सांगितलेल्या गोष्टी प्रत्येक मतदार आणि देशवासीयाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. हे लोक पंजाबला तोडण्याचे स्वप्न पाहत आहेत. सत्ता प्राप्त करण्यासाठी ते फुटिरवाद्यांसोबत हातमिळवणी करण्यास तयार आहेत. त्यांचा, देशाचे शत्रू आणि पाकिस्तानचा अजेंडा वेगळा नाही. याचमुळे हे लोक सीमेवर बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढविण्यास विरोध करतात. फुटिरवाद आणि अराजकतेच्या आहारी गेलेल्या या लोकांना पंजाबने अनेक घाव झेलून देखील देशासाठी बलिदान करण्यास कायमच पुढे राहिल्याचे माहित नसावे असे उद्गार मोदींनी काढले आहेत.

शेतकरी आशीर्वाद देणार

पीएम किसान सन्मान निधीच्या स्वरुपात पंजाबच्या शेतकऱयांच्या बँक खात्यात 3,700 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. याचा लाभ पंजाबच्या 23 लाख शेतकऱयांना मिळाला आहे. शेतकरी मला नक्की आशीर्वाद देतील असे त्यांनी म्हटले आहे.

व्यापाऱयांना सुरक्षित वातावरण देऊ

पंजाबमध्ये सध्या प्रत्येक व्यापार माफियाच्या कब्जात आहे. व्यापारी माफियांच्या  दयेवर जगत आहेत. यामुळे छोटय़ा व्यापाऱयांना मोठा त्रास होतोय. राज्यात असुरक्षा आणि चुकीच्या धोरणांमुळे व्यापारी नुकसान झेलत आहे. अनेक शक्यतांनी भरलेल्या पंजाबमधून उद्योग स्थलांतर करत आहेत. तरुणाईच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काँग्रेस सरकारच्या धोरणांमुळे राज्यात उद्योग निर्माण करण्यासाठी कुणीच येत नसल्याची स्थिती आहे. भाजप हे चित्र बदलणार असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.

वाळू, ड्रग माफियांना हाकलू

या निवडणुकीत भाजपला विजयी करत डबल इंजिनचे सरकार पंजाबमध्ये आणण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. भाजप सत्तेवर आल्यास पंजाबमध्ये वेगाने विकास होणार आहे. तसेच वाळू आणि अमली पदार्थांच्या माफियांचे उच्चाटन केले जाणार आहे. पंजाबमध्ये औद्योगिक विकास होणार असल्याचे मोदी म्हणाले.

भगवंत मान हे मद्यपी अन् निरक्षर

मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचे विधान : 12 वी पास होण्यासाठी लागली तीन वर्षे

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनी ‘मद्यपी आणि निरक्षर’ संबोधिले आहे. आपने पंजाबमध्sय मान यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केले आहे. तर काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे चेहरे म्हणून चन्नी यांचेच नाव जाहीर झाले आहे.

भटिंडामधील कार्यक्रमात बोलताना चन्नी यांनी मान यांना लक्ष्य केले. भगवंत मान हे मद्यपी आणि निरक्षर व्यक्ती आहेत. त्यांना 12 वी उत्तीर्ण होण्यासाठी 3 वर्षे लागली. पंजाबची धुरा आम्ही अशा व्यक्तीकडे कशी देऊ शकतो असे विधान चन्नी यांनी केले आहे. मागील आठवडय़ात मान यांनी राहुल गांधींकडून चन्नींना ‘गरीब घराचा सदस्य’ ठरविण्याच्या विधानावर टीका केली होती. कुठल्या दृष्टीकोनातून चन्नी हे गरीब आहेत? हा गरीब माणूस पंजाबच्या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत असून त्याच्याकडे कोटय़वधी रुपयांची मालमत्ता असल्याचे मान यांनी म्हटले होते.

बडे मियां, तो बडे मियां, छोटे मियां...

प्रियंका वड्रा यांचे मोदी अन् केजरीवालांवर शरसंधान

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका वड्रा यांनी गुरुवारी पठाणकोट येथील सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘बडे मियां और छोटे मियां...’ म्हणत त्यांनी दोघांना लक्ष्य केले. बडे मियां शेतकऱयांना दहशतवादी ठरवतात आणि छोटे मियां स्वतः दहशतवाद्याच्या घरात जाऊन राहतात. काँग्रेसच पंजाबमध्ये पंजाबियत वाचविणार आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी खरे पंजाबी आहेत. त्यांच्या मनात पंजाब्यात आहे. त्यांनी 111 दिवसांमध्ये मोठी कामे केली असल्याचे प्रियंका म्हणाल्या.

पंतप्रधान मोदी आणि केजरीवाल पंजाबियतबद्दल बोलतात, परंतु त्यांना याचा अर्थ ज्ञात नाही. माझा विवाह एका पंजाबी कुटुंबात झाला आहे. माझ्या सासऱयांनी सर्व काही सोडून सासूला पाकिस्तानच्या सियालकोटमधून वाचवत आणले होते. मुरादाबादमध्ये त्यांनी घाम गाळून व्यवसाय उभा केला. पंजाबियत म्हणजे सेवा, सत्य, सद्भाव, मेहनत आणि स्वाभिमान आहे. केवळ भगवंतासमोर पंजाबी झुकत असल्याचे प्रियंका यांनी म्हटले आहे.

बडे मियां उद्योजक मित्रांसमोर झुकले आहेत. छोटे मियां केजरीवाल सत्तेसाठी कुणासमोरही झुकू शकतात. छोटय़ा व्यापाऱयांचे हाल कुणीच जाणून घेत नाही. सरकार रोजगार पुरविणारे सरकारी उपक्रम विकत आहे. अशा स्थितीत रोजगार कुठून येणार? शेतकऱयांच्या मेहनतीची कमाई देखील पंतप्रधान दोन उद्योगपतींना सोपवत होते. पंतप्रधानांनी स्वतःसाठी 16 हजार कोटींची दोन विमाने खरेदी केली,  जगभर फिरले, परंतु शेतकऱयांना भेटू शकले नाहीत. केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने 6 शेतकऱयांना जीपखाली चिरडले. काँगेसने याप्रकरणी आंदोलन केल्यावर कारवाई झाली. त्याच मंत्र्याच्या मुलाला जामीन मिळाला असून तो सुटला आहे. अशा मंत्र्यासोबत पंतप्रधान एकाच व्यासपीठावर दिसून येत आहेत. पूर्ण देश निवडक उद्योगपतींना विकला जात असल्याचा आरोप वड्रा यांनी केला.

संकट काळात फसविणारा संधीसाधू

झाशीमध्ये योगींचा सपवर शाब्दिक हल्ला

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी झाशी येथील बबीनामध्ये प्रचारसभेला संबोधित करताना समाजवादी पक्षाला संधीसाधू ठरविले आहे. भजपने लोकांसोबत प्रत्येक संकटात उभे राहत संकटावर उपाययोजना केली आहे. बुंदेलखंडला पाणी संकटापासून मुक्ती मिळवून दिली आहे. बुंदेलखंडमध्ये आता वेगाने विकास होतोय. प्रत्येक घराला पाणी, प्रत्येक हाताला काम हेच आमचे लक्ष्य असल्याचे योगींनी म्हटले आहे.

बुंदेलखंड एक्स्प्रेसवे लवकरच पूर्ण होणार आहे. कोरोना संकटा काळात भाजप सर्वांसोबत उभा राहिला. संकटात जो फसवितो, तो संधीसाधू असतो हे सर्वांनाच माहित आहे. आम्ही धान्यासह सर्वांना पुठल्याही भेदभावाशिवाय लस दिली आहे, कारण आमचा उद्देश सबका साथ, सबका विकास हाच असल्याचे ते म्हणाले.

राज्यातील कायदा-सुव्यवस्था सुधारणे हे आमचे लक्ष्य होते आणि  यात आम्ही  यशस्वी ठरलो आहोत. बुलडोझर किती उपयुक्त असेल हे लोकांनी पाहिले असेल. राज्यात सुरक्षित वातावरण दिल्याने 1 कोटी 61 लाख तरुण-तरुणींना नोकरी आणि रोजगार उपलब्ध होऊ शकला आहे. आता कुठल्याही वाटसरू, व्यापारी किंवा मुलीवर बंदूक डागण्याचे दुस्साहस कुणी करू शकत नाही. समाजवादी नाव असलेल्या पक्षाचे काम तमंचा (बंदूक) वादी आणि विचारसरणी घराणेशाहीची होती. बुंदेलखंडमधील लोक अत्यंत स्वाभिमानी असतात, ते कधीच कुणासमोर हात पसरत नसल्याचे विधान योगींनी केले आहे.

बोललो कमी, काम केले अधिक

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची निवडणुकीत एंट्री : मोदी सरकारचा राष्ट्रवादी नकली

5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची एंट्री झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अबोहर येथील सभेपूर्वी त्यांनी व्हिडिओद्वारे केंद्र सरकारला लक्ष्य केले. मोदी सरकारचा राष्ट्रवाद नकली असून तो इंग्रजांच्या ‘फूट पाडा आणि राज्य करा’ या धोरणावर चालत असल्याचा आरोप मनमोहन यांनी केला आहे.

डॉ. सिंह यांनी केंद्र सरकारला चीनच्या मुद्दय़ावरूनही घेरले आहे. एक वर्षापासून चिनी सैन्य भारताच्या पवित्र भूमीवर ठाण मांडून आहे. या सरकारला घटनेवर विश्वास नाही. घटनात्मक संस्थांना सातत्याने कमकुवत केले जातेय. सरकार देशातच नव्हे तर विदेश धोरणाच्या आघाडीवरही अपयशी ठरल्याचे ते म्हणाले.

महागाईने लोक त्रस्त

सध्या देशाची स्थिती चिंताजनक असून कोरोनाच्या काळात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था खालावली आहे. महागाई आणि बेरोजगारीने लोक त्रस्त आहेत. 7 वर्षे सरकार चालविल्यावरही केंद्र सरकार स्वतःच्या चुका मान्य करत नाही. लोकांच्या समस्यांसाठी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार ठरविले जात असल्याचा दावा मनमोहन यांनी केला आहे.

चिनी कब्जा लपविला जातोय

पंतप्रधानपदाचे एक विशेष महत्त्व असते. इतिहासावर दोष माथी मारून स्वतःचे गुन्हे कमी होत नाहीत. पंतप्रधान म्हणून काम करत मी अधिक बोलण्याऐवजी कामाला प्राधान्य दिले. आम्ही राजकीय लाभासाठी देशाला विभागले नाही. कधी सत्य झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. चीनच्या सैन्याच्या घुसखोरीचा मुद्दा दडपला जातोय. शेजारी देशांसोबत आमचे संबंध बिघडत आहेत. बळजबरीने गळाभेट घेणे, हिंडविणे किंवा न बोलावता बिर्याणी खाण्यासाठी पोहोचल्याने देशाचे संबंध सुधारत नसल्याचे सत्ताधाऱयांना उमगले असेल अशी अपेक्षा करत असल्याचे माजी पंतप्रधान यांनी म्हटले आहे.

पंजाबसाठी काँग्रेसच योग्य

निवडणुकीच्या वातावरणात पंजाबच्या जनतेसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत. त्यांना योग्यप्रकारे तोंड देणे आवश्यक आहे. काँग्रेसच पंजाबमध्ये शेतकऱयांना समृद्धी देत बेरोजगारी दूर करू शकते. भारत सध्या एका महत्त्वाच्या वळणावर पोहोचला आहे. पंजाब, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, गोवा आणि मणिपूरमधील बंधू-भगिनींसोबत देश आणि राज्याच्या स्थितीबद्दल चर्चा करण्याची मोठी इच्छा होती. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे अशाप्रकारे संबोधित करत असल्याचे मनमोहन यांनी नमूद केले आहे.

पंजाबला नाहक बदनाम केले

काही दिवसांपूर्वी पंजाबच्या सुरक्षेच्या नावावर मुख्यमंत्री चरणजीत चन्नी आणि येथील लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार कुठल्याही प्रकारे योग्य मानला जाऊ शकत नाही. शेतकरी आंदोलनादरम्यान देखील पंजाब आणि पंजाबियतला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्या पंजाबींचे शौर्य, देशभक्ती आणि बलिदानाला पूर्ण जग सलाम करते, त्यांच्याबद्दल बरेच काही बोलले गेले. पंजाबच्या भूमीवर जन्मलेला एक सच्चा देशवासीय म्हणून मला याप्रकरणी अत्यंत दुःख झाल्याचे माजी पंतप्रधान म्हणाले.

आर्थिक धोरणे चुकीची

चुकीच्या धोरणांमुळे देश आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि महिला त्रस्त आहेत. देशात सामाजिक विषमता वाढली आहे. लोकांवरील कर्ज वाढत असून उत्पन्न घटत आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब अधिक गरीबीत लोटले जात आहेत. सरकार आकडेवारीत फेरफार करून सर्व काही सुरळीत असल्याचे सांगतेय असा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसच्या जागा घटणार, अकाली-भाजपचे बळ वाढणार

राजकीय जाणकारांचा अंदाज : आप समोर समर्थन मतदानात रुपांतरित करण्याचे आव्हान

पंजाबमध्ये मतदानाला मोजके दिवस शिल्लक राहिले असून विधानसभा निवडणुकीवरून प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांनी पूर्ण जोर लावला आहे. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीसभा घेत वातावरणनिर्मिती केली आहे. काँग्रेसच्या प्रचाराची धुरा राहुल गांधी आणि प्रियंका वड्रा यांनी स्वतःच्या हातात घेतली आहे.

आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल मागील अनेक दिवसांपासून पंजाबमध्ये तळ ठोकून आहेत. मतदानाचा दिवस नजीक येत असताना राजकीय चित्रही काहीसे स्पष्ट होत आहे. पंजाबच्या 117 मतदारसंघांपैकी बहुतांश ठिकाणी त्रिकाणी किंवा आमने-सामने लढतीचे चित्र आहे. यंदा काँग्रेसच्या जागा कमी होऊ शकतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू हे स्वतःच्याच मतदारसंघात अडचणीत असल्याचे मानले जाते. कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा पंजाब लोक काँग्रेस पक्ष मोठी कामगिरी करताना दिसून येत नसला तरीही भाजपच्या जागा अवश्य वाढू शकतात.

शेतकरी संघटनांचा संयुक्त समाज मोर्चा देखील 2-4 जागा वगळता उर्वरित ठिकाणी केवळ उपस्थिती नोंदवत आहे. संयुक्त समाज मोर्चामुळे सर्वाधिक फटका आम आदमी पक्षाला बसणार आहे. आपचा पंजाबच्या ग्रामीण मतदारांवरील प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. परंतु मागील विधानसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही मतदानाच्या दिवशी यातील किती लोक आपच्या बाजूने मतदान करतात, हे महत्त्वाचे ठरेल. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या रणनीतिकारांसमोर या मतदारांना स्वतःच्या पक्षाच्या बाजूने वळविण्याचे आव्हान आहे.

काँग्रेसला नुकसान शक्य

काँग्रेसला सिद्धू-चन्नी यांच्यातील शीतयुद्ध आणि अन्य नेत्यांमधील परस्पर विवाद किंवा महत्त्वाकांक्षेमुळे नुकसान होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस नेत्यांचे पक्ष सोडण्याचे सत्र सुरूच आहे. माजी केंद्रीय कायदा मंत्री अश्विनी कुमार, पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी, श्रीहरगोविंदपूरचे आमदार बलविंदर सिंह लाडीसमवेत अनेक मोठय़ा नेत्यांनी मतदानापूर्वी पक्षाला रामराम ठोकला आहे. समरालाचे 4 वेळा आमदार राहिलेले अमरीक सिंह ढिल्लों आणि नवाशहरचे आमदार अंगद सिंह हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

कॅप्टनमुळे मतविभागणी

काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष स्थापन करणारे कॅप्टन अमरिंदर सिंह स्वतःचा पारंपरिक मतदारसंघ पतियाळा शहरमधून विजयी होण्याची दाट शक्यता असली तरीही त्यांना यंदा चुरसपूर्ण आव्हान मिळतेय. कॅप्टन यांच्या पक्षामुळे काँग्रेसचा नुकसान होत असल्याने याचा थेट लाभ आपला मिळतोय. आपने कॅप्टनसमोर पतियाळाचे माजी महापौर अजितपाल सिंह कोहली यांना उतरविले आहे. कॅप्टन यांच्या पक्षाचे अन्य उमेदवार विजयी होण्याच्या स्थितीत नसले तरीही त्यांना मिळणारी मते ही काँग्रेसला नुकसान पोहोचविणारी असतील.

आपसमोर आव्हानात्मक स्थिती

आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये यंदा पूर्ण जोर लावला असून याचा लाभ देखील त्याला मिळत आहे. आपचा सर्वात मोठे बलस्थान म्हणजे शहरी तसेच ग्रामीण भागातही त्याचे समर्थक असून ते बदल घडवून आणण्याच्या मानसिकतेत आहेत. चंदीगडपासून अटारी सीमेपर्यंत आपने प्रभाव निर्माण केला आहे. पक्षासमोर सर्वात मोठे आव्हान या समर्थनाला मतांच्या स्वरुपात परावर्तित करण्याचे आहे. अन्यथा 2017 सारखी स्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते. अरविंद केजरीवालांनी 2017 पासून धडा घेत यंदा पूर्वीच भगवंत मान यांना स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केले आहे.

गमाविण्यासारखे काहीच नाही

अकाली दल या निवडणुकीत भाजपऐवजी बहुजन समाज पक्षासोबत आघाडी करून मैदानात उतरला आहे. दोन्ही पक्षांकडे गमाविण्यासारखे फारसे काहीच नाही. पक्षाची कामगिरी 2017 मध्ये अत्यंत खराब राहिली होती. पक्षाला विरोधी पक्षाचा दर्जा देखील मिळविता आला नव्हता. यंदा सुखबीर बादल यांच्या नेतृत्वाखाली अकाली दल चांगल्या स्थितीत दिसून येतोय. अकाली दलाचे कॅडर अद्याप कायम आहे. तसेच सुखबीर यांच्या नेतृत्वात पक्ष एकजूट होत निवडणूक लढवत आहे. गावांमधील स्वतःच्या पारंपरिक मतपेढीला विखुरण्यापासून रोखण्याचे आव्हान सुखबीर यांच्यासमोर आहे.

दुहेरी रणनीतिमुळे भाजपला लाभ

भाजपच्या जागा या निवडणुकीत वाढणार आहेत. पंजाबमध्ये पहिल्यांदाच मोठय़ा भावाच्या भूमिकेत निवडणूक लढविणारा पक्ष शहरी मतदारसंघांमध्ये चांगली कामगिरी करू शकतो. 3-4 पातळय़ांवर होणाऱया मतविभाजनाचा लाभही पक्षाला मिळेल. या निवडणुकीत भाजप शहरी क्षेत्रांसह स्वतःचे सहकारी कॅप्टन अमरिंदर सिंह आणि सुखदेव सिंह ढींडसा यांच्या मदतीने ग्रामीण भागांमध्येच स्वतःचे अस्तित्व निर्माण करणार आहे. पारपंरिक मतदारसंघांमध्ये विजय मिळविणे आणि पहिल्यांदाच लढत असलेल्या ठिकाणी अधिकाधिक मतपेढी निर्माण करण्याच्या दुहेरी रणनीतिवर पक्ष काम करत आहे. यामुळे आगामी काळात पक्षाला पंजाबमध्ये स्वतःचा विस्तार करण्यास मदत होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article