संपूर्ण चीन-पाकिस्तान ‘अग्नि-5’च्या टप्प्यात
पाच हजार किमी लक्ष्य गाठण्याची चाचणी यशस्वी - भारताच्या प्रयत्नांना मोठे यश
श्रीहरिकोटा / वृत्तसंस्था
भारतीय यंत्रणांनी बुधवारी 5000 किमीचा पल्ला गाठण्याची क्षमता असलेल्या अग्नि-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम तळावरून जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱया या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले. अत्यंत अचूकतेने मारा करणाऱया या क्षेपणास्त्राच्या कक्षेत आता संपूर्ण चीन आणि पाकिस्तानही आला आहे. तसेच या क्षेपणास्त्राद्वारे संपूर्ण आशिया, युरोप, आफ्रिकेच्या काही भागांवर हल्ला केला जाऊ शकतो, असा दावा केला जात आहे.
अग्नि-5 ची यशस्वी चाचणी ही विश्वसनीय असून किमान प्रतिकारशक्ती साध्य करण्याच्या भारताच्या धोरणाशी सुसंगत आहे. शेजारील चीनसोबतच्या सीमेवर दीड वर्षांहून अधिक काळ तणाव असताना भारताने या क्षेपणास्त्राची आणखी एक चाचणी केली आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या सीमेवर युद्धविराम सुरू असतानाच शेजारी देश दहशतवादी पाठवून वातावरण बिघडवण्याचा कट रचत आहेत. या सर्व भारतविरोधी कारस्थानांना अटकाव करण्याची क्षमता आता भारताकडे आल्याचा दावा अधिकाऱयांनी अग्नि-5 क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल माहिती देताना व्यक्त केला. बुधवारी संध्याकाळी 7.50 वाजता हे क्षेपणास्त्र सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
अग्नि-5 च्या यशस्वी चाचणीमुळे भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढली आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱया अग्नि-5 क्षेपणास्त्राची बुधवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. या क्षेपणास्त्राची रेंज 5,000 किमीपर्यंत आहे. अग्नि-5मधील तंत्रज्ञान इतरांपेक्षा वेगळे असल्यामुळे त्याच्या वॉरहेडवर एकाऐवजी अनेक शस्त्रे बसवता येतात. हे क्षेपणास्त्र अनेक लक्ष्ये एकाचवेळी नष्ट करू शकते.