For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संघाच्या प्रशिक्षण पद्धतीत परिवर्तन होणार

06:31 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
संघाच्या प्रशिक्षण पद्धतीत परिवर्तन होणार
Advertisement

वृत्तसंस्था / नागपूर

Advertisement

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली असून विविध क्षेत्रांमधील आणि विविध समाजघटकांमधील अनेक लोक आता संघाकडे आकर्षित होऊ लागले असून संघाची व्याप्ती वाढत आहे. लोकांच्या भावनांची नोंद घेऊन आता संघाने आपल्या प्रशिक्षण पद्धतीत परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहमहासचिव मनमोहन वैद्य यांनी केले आहे. ते येथील संघप्रशिक्षण वर्गातील स्वयंसेवकांसमोर शुक्रवारी बोलत होते.

संघाचे वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम संघाच्या प्रारंभापासून होत आलेले आहेत. या कार्यक्रमांमध्ये 7 दिवसांचा प्राथमिक संघ प्रशिक्षण कार्यक्रम, 20 दिवसांचा प्रथम वर्ष संघ प्रशिक्षण कार्यक्रम, 20 दिवसांचा द्वितीय वर्ष संघ प्रशिक्षण कार्यक्रम आणि 25 दिवसांचा तृतीय वर्ष संघ प्रशिक्षण कार्यक्रम अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. या कार्यक्रमांना अलिकडच्या काळात तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. संघाला जाणून घेण्यासाठी आणि त्यांची सामाजिक कार्ये आणि विचारसरणी यांची माहिती घेण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यांच्या सोयीसाठी आणि संघाची व्याप्ती अधिक वाढविण्यासाठी संघ प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये आवश्यक ते परिवर्तन करण्यात आले आहे. मात्र, हे परिवर्तन करत असताना संघ आपल्या मूळ विचारसरणीपासून ढळणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. अलिकडच्या काळात प्राथमिक संघ प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांची संख्या प्रतिवर्ष 15 हजार ते 17 हजार इतकी वाढली आहे. त्यापुढची अधिक कालावधीची प्रशिक्षणे घेण्यासाठीही अनेक तरुण इच्छुक आहेत, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

Advertisement

अभ्यासक्रमात परिवर्तन

संघ प्रशिक्षण अभ्यासक्रमात काही प्रमाणात परिवर्तन करण्यात आले आहे. काही संज्ञांमध्येही आवश्यक ते परिवर्तन काळानुसार करण्यात आले आहे. हा नवा अभ्यासक्रम या वर्षापासून लागू करण्यात आला आहे. संघाच्या प्रकल्पांमध्ये आणि सेवा कार्यांमध्ये भाग घेण्याची इच्छा असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यांना संघासंबंधीची माहिती सुलभरित्या होईल, अशा प्रकारे अभ्यासक्रमात परिवर्तन करण्यात आलेले आहे, अशी माहिती वैद्य यांनी दिली.

Advertisement
Tags :

.