शेख हसीना चौथ्यांदा पंतप्रधानपदी शपथबद्ध
बांगलादेशात सर्वाधिक काळ नेतृत्त्व करणाऱ्या नेत्या बनल्या
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी अवामी लीगच्या (एएल) विजयानंतर शेख हसीना यांनी बुधवारी सलग चौथ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. हसीना आणि इतर नवनिर्वाचित खासदारांना संसदेच्या अध्यक्षा शिरीन शर्मीन चौधरी यांनी शपथ दिली. याशिवाय निवडून आलेल्या अपक्ष खासदार आणि अन्य नवनिर्वाचितांनाही या सोहळ्यात शपथ देण्यात आली. आता अवामी लीग गुऊवारी आपले नवीन मंत्रिमंडळ स्थापन करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आता बांगलादेशात शेख हसीना ह्या सर्वाधिक काळ देशाचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्या बनल्या आहेत.
बांगलादेशात रविवारी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी अवामी लीगने 298 पैकी 223 जागा जिंकल्या. अपक्ष उमेदवारांनी 61 जागा जिंकल्या, तर राष्ट्रीय पक्षाला 11 जागा आणि इतर मित्रपक्षांना दोन जागा मिळाल्या. याशिवाय बांगलादेश कल्याण पार्टीला एक जागा मिळाली. या निवडणुकीत 41.8 टक्के मतदान झाले होते. विरोधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) नेत्यांनी घेतलेल्या बहिष्काराच्या निर्णयानंतर आणि मोठ्या प्रमाणात घडवण्यात आलेल्या हिंसाचार व अटकेदरम्यान रविवारी निवडणूक पार पडली होती.