शेअर बाजार चौदाशे अंकांनी कोसळला
गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी बुडाले
वृत्तसंस्था/ मुंबई
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशीदेखील मोठय़ा प्रमाणात दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक मोठय़ा घसरणीसह बंद झाल्याचे दिसून आले.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1491 अंकांनी घसरत 52842.75 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 382 अंकांच्या घसरणीसह 15863.15 अंकांवर बंद झाला. बाजारातील या मोठय़ा घसरणीने मात्र गुंतवणूकदारांना मोठय़ा अडचणीत टाकले. गुंतवणुकदारांचे 5.68 लाख कोटी रुपये सोमवारी बुडाल्याचे दिसून आले. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल सोमवारी घटून 241.10 लाख कोटी रुपयांवर आले. या आधी शुक्रवारी ते 246.79 लाख कोटी रुपये होते.
जागतिक बाजारात देखील रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम अधिक गडदपणे दिसून आला. अमेरिका आणि युरोप रशियावर तेल आयातीबाबत प्रतिबंध लादू शकतात अशी बातमी आहे. याने जागतिक महागाई डोकेवर काढेल अशी शंका वर्तविली जात आहे. या बातमीनंतर युरोपीय बाजारामध्ये मोठी घसरण दिसली आहे. आशियाई बाजारात निक्केई 3 टक्के, कोस्पी 2.3 टक्के, हँगसेंग 4 टक्के, शांघाई कंपोझिट 2 टक्के इतके घसरणीत दिसून आले. अमेरिकेतील बाजारमध्येही सोमवारी घसरण दिसून आली.
सेन्सेक्स निर्देशांक सोमवारी 1161 अंकांच्या घसरणीसह 53172.51 अंकांवर खुला झाला होता. इंट्राडेच्या दरम्यान सेन्सेक्सने 2 हजार अंकांची जबर घसरण अनुभवली. भारती एअरटेल, एचसीएल टेक, इन्फोसिस, आयटीसी आणि टाटा स्टील यांच्यात खरेदी दिसली. धातु निर्देशांक मात्र तेजीसह बंद झाला. रियल्टी क्षेत्राचा निर्देशांक सर्वाधिक 5 टक्के इतका घसरलेला दिसला. ऑटो निर्देशांक तसेच सरकारी आणि खाजगी बँकांचा निर्देशांकही 4 टक्क्यांनी घसरणीत होता.