शिवपाल यादव भाजपमध्ये येणार ?
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांचे काका आणि या पक्षाचे संस्थापक मुलायमसिंग यादव यांचे बंधू शिवपाल सिंग यादव भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यांचा अखिलेश यादव यांच्याशी वाद असून आपल्याला पक्षात योग्य तो सन्मान मिळत नाही. तसेच नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची निवड करताना आपल्या समर्थकांवर अन्याय करण्यात आला, अशी त्यांची भावना आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांचे मुलायमसिंग यादव आणि अखिलेशसिंग यादव यांच्याशी तीव्र मतभेद झाले होते. त्यामुळे समाजवादी पक्षातून बाहेर पडून त्यांनी नवा पक्ष स्थापन केला होता आणि समाजवादी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात आपल्या पक्षाचे उमेदवार उभे केले होते. याचा फटका समाजवादी पक्षाला बसला होता. 2022 च्या निवडणुकीत मात्र काका आणि पुतण्या यांच्यात समझोता झाल्याचे दिसत होते. तथापि हा समझोता अल्पजीवी ठरल्याचे स्पष्ट होत असून आता शिवपाल यादव भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात मोठय़ा प्रमाणात होत आहे.