शिथिलता मिळालीय, पण व्यापाऱयांना दंडाची धास्ती
प्रशासनाकडून सुधारित आदेशानुसार दुकाने उघडली
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्य़ात एखाद्या बाजारपेठेत अथवा दुकानाच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर गर्दी होऊन सामाजिक अंतराचे पालन होताना न दिसल्यास उपविभागीय कार्यालय पोलिस व नगर परिषदेच्या मार्फत ते दुकान तात्काळ बंद करावे. तसेच संबधितांवर कारवाई करण्याचे सुधारित आदेश गुरुवारी जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत. मात्र मुख्य बाजारपेठ वगळता अन्य ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूने बहुतांशः दुकाने सुरू होती. नागरिकांचीही वर्दळ मोठय़ा प्रमाणात सुरू झालेली दिसून आली.
कोरोना ‘ब्रेक द चेन’ लॉकडाऊनमध्ये गुरूवारपासून आणखीन आठवडाभर वाढ केल्याचे पडसाद व्यापारी वर्गात उमटले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला नमते घ्यावे लागत व्यापाऱयांसाठी सुधारित आदेश काढले. त्यामुळे शहरात शहरातील व्यापाऱयांसाठी सुधारित नियमावली जारी केली. रस्त्या कडेची एक दिवसाआड बाजूची दुकाने सुरू करण्याच्या च्या धर्तीवर म्हणजेच एक दिवसाआड दुकाने सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय कार्यालयांना दिला आहे.
तसेच यासंदर्भात वेळोवेळी सूचना व आदेश देण्यात येतील असेही जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी आज दिलेल्या आदेशात मध्ये म्हटले आहे. जिह्यात आता 15 जुलैपर्यंत लॉकडाऊन आहे. पण, कडक लॉकडाऊनचा निर्णय जिल्हा प्रशासनाने अवघ्या 24 तासांत बदलला आहे. बाजारपेठा बंद ठेवल्याने अनेक व्यापायांनी तक्रारी केल्या होत्या. त्यावर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तोडगा काढला. त्यानुसार प्रशासनाकडून बाजारपेठेत एका बाजूची दुकाने उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
नवीन निर्णयानुसार रत्नागिरी शहरात आज दुकाने उघडण्यात आली आहेत. मात्र, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे, बाजारात फिरताना तोंडाला मास्क लावणे, हे नियम पाळणे बंधनकारक आहे. यावर प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे. नियम पाळत नाही, अशा नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. रत्नागिरी नगर परिषदेचे एक पथक तसेच पोलीस बाजारपेठेत फिरून या नियमांचे पालन होत आहे की नाही? याची पाहणी करत आहेत. तसेच दुकानात येणाऱया ग्राहकांनी देखील मास्क लावणे, दुकानात सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मास्क लावला नसेल, तर 500 रुपये दंड आकाराला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.