शरणागतीनंतर सिद्धूंची कारागृहात रवानगी
रोडरेज प्रकरणात एक वर्षाची शिक्षा
@ पतियाळा/ वृत्तसंस्था
रोडरेजप्रकरणी पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांनी पतियाळा न्यायालयात आत्मसमर्पण केले. शरणागतीनंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांची रवानगी पतियाळा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. नवज्योतसिंग सिद्धूला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. आत्मसमर्पण करताना नवज्योतसिंग सिद्धू प्रसारमाध्यमांपासून दूर राहिले.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे नवज्योतसिंग यांनी शरणागती पत्करण्यासाठी न्यायालयाकडे एका आठवडय़ाची मुदत मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी यासंबंधीच्या क्मयुरेटिव्ह याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी न झाल्याने आत्मसमर्पण न केल्यास पंजाब पोलीस त्यांना अटक करण्याची शक्यता होती. पण, तत्पूर्वीच त्यांनी शरणागती पत्करल्याने अखेर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. याप्रसंगी त्यांनी आपल्यासोबत कपडे भरलेली बॅग आणली होती.
काँगेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांना 34 वर्षांपूर्वीच्या एका मारामारी प्रकरणात 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असल्याने या निकालाविरोधात अपील करण्याची सुविधा नाही. या निकालानंतर सिद्धूने न्यायालयाचा निर्णय शिरसावंद्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. 27 डिसेंबर 1988 या दिवशी सिद्धू यांचे पतियाळा येथील रस्त्यावर एका कार पार्किंगच्या संदर्भात वयोवृद्ध व्यक्ती गुरुनामसिंग यांच्याशी भांडण झाले होते. त्यांच्यात मारामारीही झाली होती आणि या मारामारीमुळे गुरुनामसिंग यांचा नंतर मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलिसांनी सिद्धू आणि त्यांचा मित्र रुपिंदरसिंग यांच्या विरोधात अनुद्देsश हत्येचा गुन्हा नोंद केला होता. सर्वोच्च न्यायालयाने 16 मे 2018 या दिवशी अनुद्देश हत्या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता केली. मात्र त्यांना गंभीर जखम करण्याच्या आरोपात एक वर्षाची शिक्षा देण्यात आली आहे.