For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हेलच्या उलटीची तस्करी, 12 प्रकरणे उघड

05:00 AM Oct 01, 2021 IST | Abhijeet Khandekar
व्हेलच्या उलटीची तस्करी  12 प्रकरणे उघड
Advertisement

कारवाई अंतर्गत 112 किलो ‘एम्बरग्रीस’ जप्त : सागरी जीव तस्करीमागील स्थानिक कनेक्शन तपासा

Advertisement

तस्करीमागे कर्नाटक, गोवा, गुजरातमधील तस्करांचे जाळे?

 पाळेमुळे शोधून काढल्यास अशा तस्करींना आळा बसेल

Advertisement

संदीप बोडवे / देवबाग:

गेल्या चार महिन्यात व्हेल या सागरी सस्तन प्राण्याच्या उलटीच्या (एम्बरग्रीस) तस्करीची सुमारे 12 प्रकरणे उघडकीस आली. यात रत्नागिरी व पुणे येथील प्रत्येकी एक, तर मुंबई येथील दहा प्रकरणांचा समावेश आहे. या कारवाईतून तब्बल 115 किलो एम्बरग्रीस जप्त करण्यात आले आहे. या तस्करी मागे कर्नाटक, गुजरात आणि गोव्यातील तस्करांचे जाळे असल्याचे बोलले जात आहे. सागरी जीवांची अथवा त्यांच्या अवशेषांची तस्करी पकडण्यात तपास यंत्रणांना यश आले असले, तरीही अशा तस्करींना आळा घालण्यासाठी त्याची पाळेमुळे शोधून काढणे आवश्यक आहे.

 एम्बरग्रीसची झालेली ही तस्करी नेमकी कोणत्या किनाऱयावरून करण्यात आली,  त्यामागे कोणत्या स्थानिक कनेक्शनचा हात होता, ही बाब सुद्धा उघड होणे तितकेच गरजेचे आहे. महाराष्ट्रात मौल्यवान अशा एम्बरग्रीसच्या अवैध व्यापाराची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. याबाबत कांदळवन विभागाचे अतिरिक्त प्रधन मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोच्या उपसंचालकांना पत्र लिहून लक्ष वेधले आहे. या पत्रात त्यांनी तस्करीच्या प्रकरणांमधील सागरी जीवांच्या वा त्यांच्या अवशेषांच्या बेकायदेशीर व्यापाराचा सामना करण्यासाठी पोलिसांसह वन विभागाच्या कर्मचाऱयांची क्षमता वाढविण्यासाठी कार्यशाळा घेण्याचे सूचविले आहे.

 एम्बरग्रीसच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याच्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी विशिष्ट कलमाखाली गुन्हा दाखल करण्यामध्ये स्पष्टता येणे आवश्यक आहे. या प्रक्रियेचा प्रोटोकॉल तयार करण्याची आवश्यकता असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. एम्बरग्रीसच्या नमुन्याची प्राथमिक ओळख करून तो नमुना जतन करण्याचे मार्ग तसेच प्रयोग शाळेच्या विश्लेषणासाठी विशिष्ट सरकारी प्रयोगशाळांची सूची तयार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यात नमूद केले आहे.

      काळी जादू आणि अंधश्रद्धेपोटी होते तस्करी

 बऱयाचदा अंधश्रद्धेपोटी, गुडलक चार्म म्हणून किंवा जादू-टोण्यासाठी दुर्मिळ जीवांची खरेदी केली जाते. आयुर्वेदिक औषधांमध्येही त्यांचा वापर केला जातो. काही जीवांचे अवशेष घरात, कार्यालयात, दुकानात ठेवल्याने सुखशांती, आरोग्य, आणि लक्ष्मी नांदते, या अंधश्रद्धेपोटी या वस्तू बाळगल्या जातात. यात बऱयाचदा दुर्मिळ स्टार कासवे, सी हॉर्स, समुद्री शंख, समुद्री प्रवाळ, ब्लॅक कोरल्स (इंद्रजाल) तसेच खवले मांजराची खवले आदी सागरी तसेच वन्य जीवांच्या अवशेषांची चोरी -छुपी तस्करी होत असते. या पैकी बहुतांश जीवांना भारतीय वन अधिनियम 1972 च्या शेडय़ुल 1 नुसार संरक्षण प्राप्त आहे. अशा जीवांच्या तस्करींवर नियंत्रण मिळविण्यासाठी तपासी यंत्रणांनी कंबर कसली आहे. वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो, वन विभाग, पोलीस क्राईम ब्रँच अशा तपासी यंत्रणांना तस्करांच्या मुसक्मया आवळण्यात यश आले आहे.

      तस्करीचे केंद्र मुंबई, नाशिक, पुणे?

  अलिकडील काळात उघडकीस आलेल्या सागरी तसेच वन्य जीवांशी संबंधित तस्करींमध्ये महाराष्ट्रातून मुंबई, नाशिक आणि पुणे हे केंद्र असल्याचे पुढे आले आहे. यंदाच्या पावसाळी हंगामात मुंबई आणि उपनगरातून एम्बरग्रीसच्या तस्करीची अनेक प्रकरणे समोर आली. त्या पाठोपाठ नाशिक आणि पुणे येथूनही याच काळात दुर्मिळ सागरी जीवाशी संबंधित तस्करी पकडण्यात आल्या. नुकतेच पुणे, कल्याण व नाशिक येथून मिळून 500 हून अधिक ब्लँक कोरल्सचे तुकडे (इंद्रजाल) जप्त करण्यात आले. पुणे येथून तीन कोटींचे एम्बरग्रीस आणि 63 कासवे जप्त करण्यात आली. या सर्व तस्करींचा विचार करता गोवा, कोकण आणि गुजरातच्या किनारपट्टीवरून होणाऱया सागरी जीवांच्या तस्करीशी मुंबई, नाशिक, आणि पुणे हे केंद्रबिंदू म्हणून समोर येत आहेत.

    तस्करीचे किनारी कनेक्शन समोर येणे आवश्यक

  अलिकडच्या काळात मोठय़ा प्रमाणात एम्बरग्रीसचा कोटय़वधी रुपये किंमतीचा अवैध व्यापार पकडण्यात आला. अन्य सागरी जीवांची आणि त्यांच्या अवशेषांची तस्करीही रोखण्यात आली. या सर्वच प्रकरणात जप्त मुद्देमाल अवैधरित्या बाळगणे किंवा वाहतूक केल्याप्रकरणी तस्करांच्या मुसक्मया आवळण्यात आल्या आहेत. परंतु अवैध व्यापार होणारा सागरी जीव अथवा त्याचा अवशेष कोणत्या किनारपट्टीवरून तस्करी करण्यात आला होता हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. अशा तस्करीची पाळेमुळे शोधून ती उखडून टाकण्यासाठी या तस्करींमागे कोणते स्थानिक कनेक्शन आहे हे शोधणेही तितकेच गरजेचे आहे.

     हव्यासापोटी स्वर्णीम सागरी संपत्तीला नखं

 देशभरातील किनारपट्टीवर जैवविविधतेने समृद्ध आणि स्वर्णीम सागरी साधन संपत्ती लाभलेल्या किनाऱयांमध्ये कोकण किनारपट्टीचा समावेश होतो. यात  सिंधुदुर्गची सागरी जैवविविधता अव्वल स्थानी आहे. अंदमान-निकोबार नंतर मालवणचे प्रवाळ क्षेत्र अलौकिक असेच आहे. नदी, खाडय़ांमध्येही दुर्मिळ सागरी प्रजातींचा अधिवास आहे. दहा वर्षांपूर्वी मालवणच्या प्रवाळ क्षेत्रातून प्रवाळांची तस्करी होत असल्याचे समोर आले होते. परंतु येथील सजग नागरिकांनी याबाबत एकमुखाने आवाज उठविताच अशा तस्करीची दखल घेणे संबंधित यंत्रणांना भाग पडले. नुकतेच पुणे, नाशिक येथे ब्लँक कोरल्सच्या शेकडो तुकडय़ांचा कोटय़वधी रुपयांचा अवैध व्यापार उघडकीस येणे, ही बाब काही सिंधुदुर्गसाठी शुभसंकेत नाहीत. अशा तस्करींमध्ये कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असते. यामुळे झटपट पैशांच्या हव्यासासाठी येथील स्वर्णीम सागरी संपत्तीला नखं लावण्याचा प्रयत्न होऊ शकतो. नुकतेच मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे वालसर या समुद्री प्राण्याच्या सुळय़ांची तस्करी करणाऱया संशयितांवर वन व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून केलेली कारवाई ताजी आहे. यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

  वन विभागाचे कार्यालय मालवणात हवे

 मालवण शहरात सर्व शासकीय विभागांची मुख्य कार्यालये असून वन विभागाचे कार्यालय शहरापासून बाहेर आहे. तालुक्मयात अगर शहरात कुठे वन्यजीवांसंदर्भात माहिती घ्यायची झाल्यास अगर संपर्क साधायचा झाल्यास वन विभागाचे अधिकारी नेहमीच बाहेर असल्याचे दिसून आले आहे. यामुळे अनेक वेळा स्थानिकांना ताटकळत राहवे लागत आहे. यासाठी वन विभागाचे कार्यालय मालवण शहरात तातडीने होणे आवश्यक आहे. वन विभागाचा एक अधिकारी कायमस्वरुपी मालवणात कार्यरत असणे महत्वाचे आहे. तस्करीसंदर्भात आम्ही अनेकदा या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकारी अगर कार्यालयाचे दूरध्वनी बंद अथवा संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी वन विभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 जारी करण्यात आला आहे. बऱयाचदा या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकत नाही ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी सिंधुदुर्ग वन विभागाशी संपर्क साधायचा कसा, असा प्रश्न पडला आहे.

Advertisement
Tags :

.