वेंगुर्ल्यातून मिरजला एसटीमधून आंबा कलमे रवाना
वार्ताहर / वेंगुर्ले:
वेंगुर्ला-भटवाडी येथील काशिकुंज निसर्ग रोपवाटिकेमधून एस.टी. महामंडळाच्या मालवाहक गाडीमधून वेंगुर्ल्यातून मिरज येथे 1800 आंबा कलमे पाठविण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात खाजगी वाहतूक बंद आहे. त्यामुळे बाहेरगावी कलमे पाठविण्यास अडथळा निर्माण होऊ नये. यासाठी रोपवाटिकेचे संचालक अरुण सावंत यांनी एसटी महामंडळाच्या मालवाहतूक गाडीची मदत घेतली. त्यानुसार श्री. सावंत यांनी मिरज येथे जाण्यासाठी लागणाऱया सर्व परवानगी, पास तसेच एसटीचे पैसे अदा केल्यानंतर एसटी महामंडळाने त्यांना मालवाहतूक गाडी उपलब्ध करुन दिली. 15 जुलै रोजी एस.टी.च्या या मालवाहतूक गाडीतून सुमारे 1800 आंबा कलमे मिरज येथे रवाना करण्यात आली. यावेळी एसटी चालक योगेश बोवलेकर, अरुण सावंत, विक्रांत सावंत, केदार सावंत, कौस्तुभ सावंत, प्रकाश सावंत, प्रवीण सावंत, सुभाष सावंत आदी उपस्थित होते.