विशेष आर्थिक पॅकेजची पंजाबची केंद्राकडे मागणी
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पंजाबसाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी पंतप्रधानांकडे केली. पंजाब सरकार सध्या कर्जाच्या विळख्यात असून केंद्र सरकारने राज्याला सावरण्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा मान यांनी पंतप्रधानांकडे व्यक्त केली. त्यानुसार पंजाबवर सध्या 3 लाख कोटींचे कर्ज असून केंद्र सरकारने 1 लाख कोटींची मदत करावी, असे मान म्हणाले. आगामी दोन वर्षात 50 हजार-50 हजार कोटी याप्रमाणे मदत मिळाल्यास राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर आणण्यासाठी ‘आप’चे सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. मान यांच्या या मागणीला अनुसरून अर्थमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंजाबला मदत देण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.
भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच त्यांनी दिल्ली दौरा केला. या दौऱयात त्यांनी पंतप्रधानांसह काही निवडक केंद्रीय मंत्र्यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्याच्या विविध प्रश्नांबाबत सल्ला-मसलतही केली. पंतप्रधानांच्या भेटीवेळी भगवंत मान यांनी पिवळय़ा रंगाचा फेटा परिधान केला होता. याप्रसंगी पंतप्रधानांनी पुढे जाऊन त्यांच्याशी हस्तांदोलन केले. दोन्ही नेत्यांच्या भेटीचा फोटो पीएमओच्या वतीने ट्विट करण्यात आला आहे.
भ्रष्टाचाराच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराची तक्रार नोंदवण्यासाठी वैयक्तिक व्हॉट्सऍप क्रमांक 9501 200 200 जारी केला आहे. या क्रमांकावर लोक फोटो, ऑडिओ, व्हिडीओ पाठवून भ्रष्टाचाराची तक्रार करू शकतात, असे जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बुधवारी शहीद भगतसिंग यांच्या गावात जात तेथे त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाईनचा नंबर जारी केला. मागील आठवडय़ात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी यासंबंधी घोषणा केली होती.