विमान कंपन्यांमध्ये भरती प्रक्रियेला वेग
विमानांची संख्या वाढल्याचा परिणाम - विस्तारा, इंडिगोची भरती
वृत्तसंस्था/ मुंबई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या वषी हवाई उद्योगाला मोठा फटका बसला होता. या क्षेत्रातील अनेक कर्मचाऱयांना कमी करण्यात आले होते तसेच अनेकांच्या वेतनात कपात करण्यात आली होती. मात्र आता परिस्थितीत सुधारणा होत असून विमान फेऱयांची संख्या देशातील विविध शहरांमध्ये वाढताना दिसते आहे. अनेक नवनव्या मार्गांवर विमान सेवा सुरू केली जात आहे. परिस्थिती पूर्वपदावर येत असून कंपन्यांनी आता वाढत्या विमान फेऱयांची मागणी लक्षात घेऊन नव्याने कर्मचारी भरती करण्यासाठी पुढाकार घेण्यास सुरुवात केली असल्याचे समजते. त्यामुळे येणाऱया काळामध्ये हवाई क्षेत्रातील कंपन्या नव्या उमेदवारांना नोकरीत सामावून घेताना दिसतील.
अनेक हवाई कंपन्यांच्या कामांमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे. नोव्हेंबरनंतर कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यावर हळुहळू विमान फेऱयांमध्ये टप्याटप्याने वाढ होत गेली आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात विमान फेऱयांची संख्या वाढल्याने आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा भरून काढण्यासाठी आता कंपन्यांना नव्याने भरती करायची गरज जाणवते आहे. कोरोनाच्या काळामध्ये अनेकांना काम थांबवण्याची सूचना करण्यात आली होती. कदाचित त्यांना आता पुन्हा कामावर घेतलं जाईल अशी शक्मयता वर्तवली जात आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये विस्तारा कंपनीने 50 टक्के कर्मचाऱयांना भरती करून घेतले आहे. याचप्रमाणे इंडिगो कंपनीनेही नव्या उमेदवारांचा शोध सुरू केला असल्याचे समजते.