विक्रमी स्तरावरून सेन्सेक्स 416 अंकांनी घसरला
मोठय़ा विक्रीचा परिणाम : निफ्टीत 127 अंकांची घसरण
वृत्तसंस्था/ मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक आणि टीसएस सारख्या मोठय़ा कंपन्यांच्या समभागामध्ये तिमाही परिणामानंतर झालेल्या मोठय़ा विक्रीमुळे सोमवारी एका क्षणाला विक्रमी उंचीवर पोहोचल्यानंतर सेन्सेक्स 416 अंकांनी घसरला. मुंबई शेअर बाजारातील 30 समभागांचा निर्देशांक सेन्सेक्स व्यापारादरम्यान, 42273.87 अंकांच्या विक्रमी स्तरावर पोहोचला होता. परंतु, काहीवेळातच ही तेजी संपुष्ठात येऊन सेन्सेक्स 416.46 अंकांच्या घसरणीने 41,528.91 अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजारातही याचप्रकारे निफ्टी 127.80 अंकांनी घसरत 12,224.55 अंकांवर बंद झाला. निफ्टी एका वेळेला 12,430.50 अंकांच्या स्तरावर होता. सेन्सेक्सच्या कंपन्यांमध्ये कोटक महिंद्रा बँकेमध्ये सर्वाधिक 4.70 टक्के घसरण झाली. बँकेकडून सोमवारी जाहीर केलेल्या परिणामामध्ये सांगण्यात आले होते की, तिसऱया तिमाहीत त्यांची नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता वाढली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि टीसीएसच्या समभागातही 3.08 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. या तिन्ही कंपन्यांनी शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर तिसऱया तिमाहीतील आकडे जाहीर केले होते. तर पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनमध्ये 3.75 टक्क्यांची तेजी होती. भारती एअरटेल, आयटीसी, एशियन पेन्ट्स, आयसीआयसीआय बँक आणि एल अँड टीच्या समभागात तेजी होती. विशेष कंपन्यांसोबतच शेअर बाजार विक्रमी स्तरावर आल्यामुळे गुंतवणूदारांकडून नफाकमाई करण्यात आल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले आहे.
आशियायी बाजारात चीनच्या शंघाई कंपोजिट, जपानचा निक्की आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी वधारात पाहायला मिळाले. तर हाँग काँगचा हँगसँग घसरणीत बंद झाला. यूरोपीयन बाजार सुरुवाती व्यापारादरम्यान घसरणीत होता. याचदरम्यान, ब्रेंट क्रुड 0.66 टक्क्यांच्या वाढीसह 65.28 डॉलरवर राहिले. लीबियामध्ये सुरक्षादलाकडून एक पाईपलाईन बंद करण्यात आल्यामुले निर्यातीवर परिणाम झाला आहे. याव्यतिरिक्त इराकच्या महत्वपूर्ण तेल क्षेत्रात संपामुळे उत्पादनावरही परिणाम होत आहे.