वाहतूक शाखेत बंदुकीचा थरार
वाहन सोडवण्यासाठी आलेल्या युवकाकडे निघाली बंदूक
प्रतिनिधी/ सातारा
वाहन नो पार्किंगमधून आणल्यानंतर ते वाहन सोडवायला आलेल्या युवकाकडे बंदूक निघाली. ती बंदूक न सोडता तो युवक ती घेवून पळण्याचा प्रयत्न करू लागल्याने ट्रफिक ऑफिसमध्ये थरार निर्माण झाला. पोलिसांनी संबंधित युवकाला फैलावर घेतल्यानंतर या बंदूकीचा परवाना कुटुंबातील दुसऱया व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी बंदूक ताब्यात घेवून संबंधित युवकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, रविवारी रात्री 8 वाजता संशयित आरोपी गणेश हणमंत देवरे (वय 35 रा. गुरसाळे ता. खटाव), विकास प्रल्हाद देवरे (वय 26 रा. दहिवड) हे दोघे दुचाकी घेण्यासाठी वाहतूक शाखेत आले. यावेळी दोघांनी गोंधळ घातला. वाहतूक पोलिसांनी त्याना शांत करत कागदपत्रे दाखवण्यास सांगितली. मात्र तो काही केल्या ऐकत नव्हता. हा वाद वाढत असतानाच पोलिसांना संशयास्पद हलचाली वाटल्याने पोलिसांनी त्यांची तपासणी केली. यावेळी विकास प्रल्हाद देवरे यांच्या कंबरेला बंदूक खोचलेली आढळून आली. या बंदूकीच्या परवानाबाबत विकासकडे चौकशी केली असता त्याने ही बंदूक गणेश देवरे यांने त्यांच्याकडे दिल्याचे सांगितले.
या बंदूकीचा परवाना गणेशचा भाऊ अनिल हणमंत देवरे यांचा नावावर आहे. यामुळे बेकायदेशीरपणे पिस्तूल जवळ बाळगल्याने गणेश देवरे व विकास देवरे यांच्यावर सातारा शहर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार, पोलीस हेड कॉन्टेबल अमर काशिद, विजय शिंगटे, नायकवडी पोलीस कॉन्टेबल देवानंद बर्गे यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मोटे करत आहेत.