For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वासराच्या काळजीने तिचे व्याकूळ हंबरणे...

05:10 AM Jan 26, 2021 IST | Abhijeet Khandekar
वासराच्या काळजीने तिचे व्याकूळ हंबरणे
केर : गोठय़ात आल्यावर रात्री साडेअकरा वाजता गाईने वासराला पान्हा दिला.
Advertisement

रात्रीच सैरावैरा धावली जंगलात :  केर येथील प्रसंगाने ग्रामस्थांचे डोळे पाणावले

Advertisement

तेजस देसाई / दोडामार्ग:

मायलेकराच्या, गाय-वासराच्या नात्याला कोणती उपमा देणार? त्यांचे नाते नेहमीच हळवे राहिले आहे. आणि संकटकाळात ते आणखी गहिवरते. याचाच
प्रत्यय रविवारी रात्री केर गावी आला. एक गाय मोठमोठय़ाने हंबरायला सुरुवात करते. त्यावेळी सारे चक्रावतात. थोडय़ा वेळाने लक्षात येते की गाय व्यायली असणार आणि ती आपल्या वासराच्या ओढीने हंबरत असावी. तिला गोठय़ातून सोडल्यावर ती जंगलच्या दिशेने धावत सुटते. जवळपास अडीच किलोमीटर जंगलातील झाडीत जाऊन वासराकडे येऊन थांबते. मग वासराला उचलून गाईला पुन्हा गोठय़ात आणले जाते आणि एका मातेच्या धडपडीला पूर्णविराम मिळतो.

Advertisement

माय व गाय यांच्या ममतेतील साम्य अनेक कवींनी आपल्या लेखन शैलीतून वर्णिले आहे. गाईला मातेची उपमा दिली जाते. ‘हंबरून वासराला चाटते जवा गाय, तवा मला तिच्यामध्ये दिसती माझी माय’ यासारखे वर्णन कवितेते वाचतो, तेव्हा बऱयाचदा डोळय़ांच्या कडा ओल्या होतात. पण, असे प्रसंग वास्तवात जेव्हा समोर येतात, तेव्हा हृदयस्पर्शी अनुभव समोर येतो. केर गावात गाय व वासरू यांच्यातील ताटातूट व त्यानंतरचा शोध हा प्रसंगही तसाच अनुभूती देणारा आहे.

दोडामार्ग तालुक्यात तिलारीच्या दिशेने केर गाव आहे. या ठिकाणचे ग्रामस्थ शेती व पशुपालन असे प्रमुख व्यवसाय करतात. या गावच्या भोवताली मोठय़ा प्रमाणात जंगल भाग आहे. येथील पशुपालन सामूदायिक पद्धतीने होते. गावातील सगळय़ांची गुरे एकत्र ‘पाळी’ पद्धतीने राखली जातात. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे गुरे राखणीला गेली. ज्यामध्ये शंकर शांताराम देसाई यांची गाभण गाय होती. राखणीला गेलेली गुरे तिन्ही सांजेला पुन्हा गावच्या (गोठय़ाच्या) दिशेने येतात. सध्या लवकर रात्र होत असल्याने गुरे बांधणीपर्यंत काळोख झाला. देसाई यांची गाय नेहमीप्रमाणे गोठय़ात बांधली गेली. पण, रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गाय मोठमोठय़ाने हंबरू लागली. ती सहज हंबरत असेल म्हणून सुरुवातीला दुर्लक्ष झाले. मात्र, गाईचे हंबरणे सुरुच राहिले. त्यानंतर मालक शंकर देसाई उठले. शेजारीही जमा झाले. बारकाईने बॅटरीच्या साह्याने पाहिले असता गाईचे पोट थोडे कमी दिसले. त्यामुळे ती जंगलात व्यायली असणार, असा अंदाज बांधला. त्यामुळे गाईला बांधलेला दोर सोडण्यात आला. त्यानंतर गाय जंगलाच्या दिशेने पळू लागली. तिच्यापाठोपाठ मालक देसाई यांच्यासह शेजारी नितीन देसाई, मोहन देसाई व अन्य ग्रामस्थही निघाले. जंगलाच्या गर्द झाडीतून वाट काढत साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गाय एका झाडीकडे थांबली. गाय थांबल्यावर मागावर असलेले पुढे गेले तर झाडीत वासरू होते. मालकाने वासराला उचलून घेतले आणि घराच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली. गायही मागोमाग आली आणि गोठय़ात गाईने पान्हा दिल्यावर तृप्त झाली. हा प्रसंग पाहणाऱयांना एक हृदयस्पर्शी अनुभव घेता आला.

                 हा तर हृदयस्पर्शी अनुभव -देसाई

गाईचे मालक देसाई म्हणाले, गाय व्यायल्यावर शक्यतो मालक वासरू घेऊन येतात व रात्री गाईचा पान्हा तिला मिळतो. पण, गाय व्यायल्याचे आपल्या लक्षात आले नाही. गाईला आपले वासरू गोठय़ात दिसले नाही. त्यामुळे ती हंबरायला लागली. मात्र, त्यानंतर जंगलातील झाडी ते पुन्हा गोठा असा प्रवास हृदयस्पर्शी होता.

Advertisement
Tags :

.