For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाजे अलगूज...

11:05 PM Jun 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाजे अलगूज
Advertisement

संध्याकाळची वेळ...पाऊस अर्धवट पडून गेलेला. मातीचा तापलेपणा संपूर्णपणे गेला नसला तरी तिने पावसाचं गाणं गायला सुरुवात केली आहे हे नक्की. आता वाऱ्याच्या सुगंधी पावसाळी झुळका यायला सुरुवात होते. पायवाट भिजरी झालेली. आता काही सारखं सारखं पाणी आणायला कालिंदीच्या काठावर जावं लागणार नसतं. पण आता मात्र ताजं पाणी आणायला निघालेली ती विचार करत असते की कष्ट वाचले म्हणून आनंद मानावा की कितीतरी फेऱ्या ज्याच्यासाठी नदीकडे जाण्याच्या निमित्ताने होतात त्याला भेटायला नवीन निमित्त शोधावं लागणार आहे म्हणून वाईट वाटून घ्यावं? तिथेच कुठेतरी एखाद्या वृक्षातळी टेकते तोच घरी जाण्यासाठी निघालेलं गोकुळाचं खिल्लार दिसतं. ती डोळे मिटून घेते. काहीतरी घडणार असतं. नाकाला जाणवणारा तो दिव्य सुगंध! दिवसभराच्या धावपळीने अंगावर चिकटलेल्या धूळमातीचंही आयुष्य धन्य करणारा. आणि कानी येऊ लागतात अलगुजाचे नितांत मधुर स्वर...इतका इतका आनंद मनाच्या कारंज्यातून वर उसळून येतो की तो कुणाला कसा सांगावा हा प्रश्न पडतो. बरं तो सांगायचा कुणाला? सासरचं घर.. द्वाड नणंद, खाष्ट सासू, संशयी पती, कुणाला सांगण्यासारखे नाही. पण हे असं काय होतंय? बासरीचे, त्या अलगुजाचे सूर असे देहाला वेढून टाकतायत. देहावरच्या प्रत्येक सुखबिंदूला स्पर्श करत करत असे उतरत जातायत की जणुकाही एकांतात निर्धास्तपणे अलगद वस्त्रं उतरवीत जावं तसंच अगदी. कळत नाही आत्मा कोणता आणि देह कुठे आहे?

Advertisement

आलिंगन चुंबनाविना हे मीलन अपुले झाले गं

पहा पहा परसात हरीच्या, रुमडाला सुम आले गं

Advertisement

असं अशरीरी काहीसं या दुनियेच्या पलीकडचं घडून जातं. पावा वाजत वाजत किती पुढे निघून जातो ते कळतही नाही. एकाएकी मनावर जाणिवांची आणि ऐहिक भावभावनांची वस्त्रं चढतात. ओढाळ भावनांचा ढळलेला पदर ती चापूनचोपून घट्ट बांधते आणि डोळे उघडते तोच...सांजवेळेची आभाळाची निळाई गहिऱ्या काळोखात वितळत असते.

देखावे ते डोळा दिसे बाई निळे

सोज्ज्वळे कोवळे वाचे वानिता न ये

काय आहे हे? आभाळाचा निळेसावळेपणा की त्याचा? असे भास का होतात? किती ती कोवळीक त्या देहाची? वर्णन तरी कसं करू? वाणीच खुंटतेय. अन् मग भानावर आलेली ती व्यवहाराच्या चरकावर गरगरत निघून जाते. आजकाल तिच्या लक्षात राहतच नसतं काही. ‘तो’ इथून गेल्यापासून जिकडे तिकडे तोच दिसत राहतो आहे. अगदी घरीदारीदेखील तोच तो. कसं करावं हे कळत नाही पण एकांतीही त्याचंच प्रतिबिंब येतं. नको ते ध्यान सुटून लक्ष संसारात लागलंय हे पाहून घरचे सगळे खूष आहेत. आणि ती? तो असूनही नाही म्हणून त्याला शोधत राहते आणि तो नसूनही सर्वत्र आहे म्हणून त्याला उरी दडवत राहते. हो...कुठेही येतो कसाही छळतो.. घरच्यांना कळलं तर? कुणी पाहिलं तर? तरी बरं. तो एकटा थोडाच दिसतो? नेहमीच गुळाच्या खड्याला मुंगळे डसावेत तसे सगळेजण त्याला चिकटलेले!

मागेपुढे धेनू चोहीकडे वेणू

नंदाचा नंदनू परि धरिता न ये

ही वेणू मोठी मायाविनी आहे! कानाशी सतत नाद करत राहते. तिला जणू डिवचत राहते. की पहा बरं..मी त्याच्या ओठीच असते सदैव. तुझं काय ते तू बघ. चिडून ती मनाशीच म्हणते पण अगं त्याच्या त्या दैवी सुरांनी मला कुठे कुठे स्पर्श केलेत ते माहीत तरी आहे का तुला? तुझा देह पोकळ नळीचा. मी एक पूर्ण स्त्राr आहे. माझ्या रोमारोमात त्याचे सूर भरलेत. प्रत्येक रंध्रागणिक एकेक आनंदलहर उठते. म्हणून तर मी कायम ऐकत असते ते सूर. माझ्यापासून ते वेगळे नाहीतच मुळी. आणि एकाएकी ती दडवू पाहते शरीरावर उठलेले रोमांच! त्याच्या असण्याची निशाणी.. तिला कळतच नाही की तो आपल्या देही रुजला कसा? सगळ्या सगळ्या अवकाशात आणि कणाकणात भरला कसा? आणि जर इथे सगळीकडे तो आहे तर आता आपल्याला कुणी नावं कशी ठेवत नाही? आणि आपलं चित्त त्याने हरण केलेलं असूनही आपलं वागणं कुणाला खटकत कसं नाही? अजबच आहे हे सगळं. काय म्हणावं या अवस्थेला? उन्मनी अवस्था म्हणायची का पिसेपणा? चारीही बाजूला धेनू आणि चोहीकडे त्याच्या ओठी लावलेली वेणू सूर पेरत असते. हा नंदाचा नंदनू कधी येऊन भेटतो आणि कधी हातून सुटतो तेच कळत नाही. एक मात्र नक्की की तो पाऱ्यासारखा हातून निसटतच जातो. हाक मारता येत नाही आणि धरू जाता हाती लागत नाही. झाडाझुडपाआडून खट्याळ हसत राहतो आणि त्याला धरू जावं तर नाहिसाच होतो.

एवढी त्या कार्तिक पौर्णिमेला रासक्रीडा करत होतो पण तिथेही तेच. तो माझाच आहे असं वाटत असतानाच एकाएकी अदृश्य झाला होता. किती कासावीस झाला होता जीव. असं वाटत होतं की आत्ता हा जीव त्याच्या पायी वाहून टाकावा. नको दुसरं काही. संसार नको. संपत्ती नको काहीच नको. कृष्ण कृष्ण कृष्ण जपाशिवाय मनात काही ठरेनाच मग. झाला की मग प्रकट आपोआप. त्यावेळचा आनंद काय वर्णावा. असं वाटे आनंदाने कोंदून जाऊन हा प्राण कुडीचा निरोप घेतो की काय? संसाराच्या तापाने त्रस्त झाले होते तेव्हाही किती गोड समजूत करायचा तो. राधे अगं संसार कुणाला चुकलाय गं? तो असायचाच! मला सांग, संसाराचे ताप सुरू असतात म्हणून तर मी भेटल्यावर तुझ्या जिवाला गार वाटतं ना? आणि ती म्हणाली होती, अगदी मृगाच्या पावसासारखं गार वाटतं रे. अंकुर फुटून येतात मनाला. मग? अगं तापल्याशिवाय रुजणार कसं? उबाऱ्याशिवाय रुजणं होत नाही राधे... रुजल्याशिवाय पुनर्निर्मिती नाही. ती नसली तर जग थांबणार नाही का? अशी कशी तू? ती पाहतच राहायची त्याच्याकडे. किती छान सांगतो हा! घटकाभरापूर्वी तापलेलं अंतर अगदी शीतल झालंय. बरं आत्ता जाऊ नकोस. थांब थोडावेळ. कालिंदीच्या या अंगाला मी हिंदोल बांधलाय तुझ्यासाठी. चार झोके घे. मग जा. आणि मग तिला पेच पडायचा. एवढा अंधार दाटतोय. त्या तिथे ती सगळी गोपबालकं खेळतायत. तुझ्या धसमुसळेपणाने झोके देण्याने माझे केस विस्कटतात, वेश अस्ताव्यस्त होतो. सगळं गोकुळ संशय घेईल कृष्णा. कसं कळत नाही तुला? पुन्हा तेच गोड हसू... राधे तुला काय वाटतं? आत्ता तुझ्याविषयी काहीच बोलत नाही का कोण? सगळीजणं कुजबुज करतायत.

राधा कृष्णावरी भाळली, गुजगुज उठली गोकुळी

बोल. आता काय म्हणणं आहे तुझं? ती रडकुंडीला यायची. आता रे काय करू? अगं मी आहे ना? बघ त्या समोरून जाणाऱ्या लोकांना आपण दिसतोय का? आणि ती आश्चर्याने पाहते. त्या दोघांच्या अंगावरून ती माणसं पलीकडे निघून जातात. वाऱ्यापलीकडे गेल्यासारखं. म्हणजे? ती प्रश्नार्थक नजरेने पाहते त्याच्याकडे. आणि सुखावते. आज मी मनसोक्त झोके घेणार. खूप खूप गप्पा मारणार तुझ्याशी. असंच मला सांभाळशील ना कान्हा? आणि तो म्हणतो की थोडाचवेळ हं राधे...मग परतायचं... आणि तिला तो घरापर्यंत पोचवतो. आत जाते तेव्हाही घरातल्या कुणालाच कळत नाही की तिला उशीर झाला होता. प्रत्येकजण आपल्यातच गुंग. आणि तिची अवस्था?

सुखानेही असा जीव कासावीस

तरी हा परीस दूर सारता न ये

माझ्या कानी बाई वाजे अलगूज

सांगो जाता तुज गूज सांगता न ये.

अशी. आता तो गोकुळ सोडून निघून गेला खरा. पण आजही ‘देखावे ते डोळा दिसे बाई निळे’ असंच असतं तिचं. अलगूज....

-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :

.