वर्षात 183, महिन्यात 143 जणांचा मृत्यू
सिंधुदुर्गसाठी ‘एप्रिल’ क्लेशकारक : बाधितांचीही आतापर्यंतची उच्चांकी संख्या : महिन्यात 5350 रुग्ण
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात मार्च 2020 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गेल्या वर्षभरात कोरोनाने 183 जणांचा, तर एका एप्रिल महिन्यात तब्बल 143 जणांचा मृत्यू झाला. एप्रिलात बाधित रुग्णसंख्याही उच्चांकी राहिली. 5 हजार 350 कोरोना बाधित रुग्ण या महिन्यात आढळले. एकूणच एप्रिल महिना सिंधुदुर्गसाठी कमालीचा क्लेशकारक ठरला. जिल्हय़ात कधी नव्हे एवढी गंभीर स्थिती निर्माण झाली असून अजूनही त्यावर नियंत्रण आलेले नाही. कोरोना रोखण्याबरोबरच मृत्यूही रोखण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.
जिल्हय़ात आतापर्यंत कोरोनाने एकूण 326 जणांचे बळी गेले आहेत. त्यातील 183 जणांचे मृत्यू मार्च 2020 ते मार्च 2021 या एक वर्षात झाले. एप्रिल 2021 या एका महिन्यात 143 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने या रुग्णांचा मृत्यू झाला, हे खरे आहे. मात्र अजूनही बरीच कारणे आहेत. काही रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा झाला नाही, काहींवर वेळेत उपचार झाले नाहीत, काहींना इतर आजार होते, तर काहींचा कोरोनाच्या भीतीनेही मृत्यू झाला.
सर्वाधिक मृत्यू कणकवली तालुक्मयात
जिल्हय़ात आतापर्यंत कोरोनाने 326 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक कणकवली तालुक्मयात 81 जणांचे मृत्यू झाले आहेत. एप्रिल महिन्यात झालेल्या 143 मृत्यूंमध्येही कणकवली तालुक्मयातच सर्वाधिक 33 जणांचे मृत्यू झाले आहेत. तसेच एकूण 326 मृत्यूमध्ये देवगड 33, दोडामार्ग नऊ, कुडाळ 47, मालवण 40, सावंतवाडी 59, वैभववाडी 33, वेंगुर्ले 22 आणि जिल्हय़ाबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
एप्रिल महिन्यात 5,350 जणांना कोरोनाची लागण
जिल्हय़ात आतापर्यंत 12 हजार 472 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. मार्च 2021 अखेरपर्यंत 7 हजार 122 रुग्ण आढळले होते. त्यामध्ये वाढ होऊन एप्रिलमध्ये 5 हजार 350 रुग्ण आढळले. कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून एका महिन्यातील ही सर्वोच्च संख्या आहे.
एप्रिलमध्ये त्सूनामीचीच
ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांत कोरोना रुग्ण वाढले होते. परंतु त्या महिन्यात जेवढे रुग्ण आढळले त्यापेक्षाही जास्त रुग्ण एप्रिलच्या एका महिन्यात आढळले आहेत. त्या तीन महिन्यात एकूण 4 हजार 524 रुग्ण आढळले होते आणि एप्रिलमध्ये 5 हजार 350 रुग्ण आढळले.
कणकवली तालुक्मयात सर्वाधिक रुग्ण
कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण कणकवली तालुक्मयात सर्वाधिक आहे. तसे बाधित रुग्ण वाढीचे प्रमाणही कणकवली तालुक्मयात सर्वाधिक आहे. एकूण बाधित 12 हजार 472 रुग्णांपैकी कणकवली तालुक्मयात सर्वाधिक 3 हजार 212 रुग्ण आढळले आहेत. तसेच एप्रिलमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्येही कणकवली तालुक्मयात सर्वाधिक 1 हजार 74 रुग्ण आढळले. आतापर्यंत आढळलेल्या 12 हजार रुग्णांमध्ये देवगड तालुक्मयातील 1230, दोडामार्ग 644, कुडाळ 2524, मालवण 1378, सावंतवाडी 1602, वैभववाडी 815, वेंगुर्ले 970 आणि जिल्हय़ाबाहेरील 97 रुग्णांचा समावेश आहे.
भीती तिसऱया लाटेची
कोरोनाची ही लाट मेअखेरपर्यंत ओसरेल आणि पुन्हा जुलै किंवा ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येईल, असे आरोग्य तज्ञांचे मत आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱया लाटेत एवढी गंभीर स्थिती, मग तिसऱया लाटेत काय होईल? त्यासाठी आतापासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
आतापर्यंत 10,027 रुग्णांची कोरोनावर मात
रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण वाढत असताना दिलासा देणारी बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. एकूण बाधित 12 हजार 472 रुग्णांपैकी 10 हजार 27 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर मात करणाऱयां रुग्णांची संख्या ही निश्चितच जास्त आहे. मात्र मृत्यू प्रमाण वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे.
आरोग्य सुविधांवर भर हवा
सद्यस्थितीत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. तसेच रिक्त पदांवर भरती करणे आवश्यक आहे. दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील, त्याचवेळी मृत्यू कमी होतील. तसेच प्रत्येक नागरिकाने कोविडचे नियम पाळायला हवेत. पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष घालून आरोग्य सुविधा निर्माण करायला हव्यात.