वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत ओडिशा संघ विजेता
वृत्तसंस्था/ चेन्नई
हॉकी इंडियातर्फे येथे आयोजित केलेल्या वरिष्ठ पुरुषांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेचे जेतेपद ओडीशाने पटकाविले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात ओडीशाने हरियाणाचा 5-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
हा अंतिम सामना एकतर्फी झाला. ओडीशा संघातील भारताचा आंतरराष्ट्रीय हॉकीपटू शिलानंद लाक्राने आपल्या दर्जेदार खेळाच्या जोरावर 12 मिनिटांच्या कालावधीत 3 गोल नोंदविले. शिलानंदने 48 व्या, 57 व्या आणि 60 व्या मिनिटाला गोल करुन हॅट्ट्रीक साधली. तत्पूर्वी म्हणजे 11 व्या मिनिटाला रजत, आकाश तिर्कीने ओडीशाचे खाते उघडले. प्रताप लाक्राने 39 व्या मिनिटाला ओडीशाचा दुसरा गोल केला. हरियाणातर्फे एकमेव गोल 55 व्या मिनिटाला जोगिंदर सिंगने केला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत ओडीशाने हरियाणावर 1-0 अशी आघाडी मिळवली होती.
या स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात उत्तर प्रदेशने मणिपूरचा 2-1 असा पराभव केला. उत्तरप्रदेशचा कर्णधार ललीतकुमार उपाध्यायने 6 व्या मिनिटाला आपल्या संघाचे खाते उघडले. 43 व्या मिनिटाला एम. रविचंद्र सिंगने मणिपूरला बरोबरी साधून दिली. राजकुमार पालने 54 व्या मिनिटाला उत्तर प्रदेशचा दुसरा आणि निर्णायक गोल नोंदविला.