लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी 'या' कंपनीकडून 'ही' ऑफर
ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आघाडीची विमान कंपनी इंडिगोने तिकिटावर सवलत जाहीर केली आहे. लसीचा किमान एक डोस घेतला असल्यास प्रवाशाला तिकिटावर 10 टक्के सवलत मिळेल, असे इंडिगोने म्हटले आहे.
ही सवलत योजना आजपासून सुरू होत असून मर्यादित काळासाठी आहे. ज्या प्रवाशांनी लसीचा किमान एक तरी डोस घेतला आहे आणि ज्यांचे वय 18 वर्षे किंवा 18 पेक्षा अधिक असेल अशा प्रवाशाला तिकिटावर 10 टक्के सवलत मिळणार आहे. ही सवलत घेण्यासाठी प्रवाशाला विमानतळावरील कंपनीच्या काउंटरवर किंवा बोर्डिंग गेटवर लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल, असे इंडिगोने म्हटले आहे.
- आरोग्य सेतू ॲपवर देखील दाखवू शकता प्रमाणपत्र
तसेच प्रवाशांना आरोग्य सेतू ॲपवर देखील लस घेतल्याचा स्टेट्स दाखवता येईल, असे कंपनीने म्हटले आहे. देशातील मोठी विमान कंपनी म्हणून आम्हाला जबाबदारीची जाणीव आहे. राष्ट्रीय पातळीवरील लसीकरण मोहीमेला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीने तिकीट दरावर सवलत देऊन प्रयत्न केला असल्याचे इंडिगोचे मुख्य महसूल अधिकारी संजय कुमार यांनी सांगितले.