लसीकरणाचा लाभ
वाढत्या लसीकरणाचा लाभ अखेर देशाला झाला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये देशात तिसरी लाट येईल असा अंदाज यापूर्वी वर्तवण्यात आला होता. त्यामुळे सर्व स्तरावर चिंतेचे वातावरण होते. मात्र देशातल्या 70 टक्के प्रौढ लोकसंख्येला लसीचा पहिला डोस देण्याची कृती काम करुन गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी सोमवारी भारतातील 70 टक्के प्रौढ लोकसंख्येला कोविड -19 लसीचा पहिला डोस देण्यात आल्याचे जाहीर करून देशाचं कौतुक केलं आहे. तर देशाचा करोनाविरुद्धचा लढा असाच चालू ठेवण्याचं आवाहनही केलं आहे. काल दिवसभरात देशात 23 लाख 46 हजार 176 नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली. त्यामुळे आता लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या 90 कोटींच्या वर गेली आहे. तर 25 टक्के लोकसंख्येला दोन्ही डोस दिले गेले आहेत. 5 कोटी 67 लाख 37 हजार 905 पेक्षा जास्त शिल्लक आणि न वापरलेले लसीचे डोस अजूनही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत, अशी माहिती सरकारने जाहीर केली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात जेथे मध्यंतरीच्या काळात फार मोठय़ा संख्येने रुग्ण आढळले होते तेथे कालपासून शाळा सुरू झाल्या आहेत. मंदिरेही खुली होत आहेत. सप्टेंबर महिन्याची आकडेवारी विचारात घेता देशातील सक्रिय रुग्णसंख्या 195 दिवसातील सर्वात कमी नोंदली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याच्या म्हणण्यानुसार व्हायरसमध्ये नव्याने कोणतेही म्युटेशन आढळून आले नाही. त्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्मयता तज्ञांच्या मते आता जवळपास नाहीच. ही आनंदाची गोष्ट आहे. देशाचा पॉझिटिव्हिटी रेटसुद्धा कमी झाला असून दहा हजारापेक्षा कमी रुग्ण संख्या आढळल्याने आरोग्य खात्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे. ही खरे तर आनंदवार्ता म्हणायला हवी. तिसऱया लाटेचा धसका संपूर्ण देशाने घेतला होता. ही लाट आली तर रुग्ण संख्या पूर्वीच्या दुप्पट होईल अशी शक्मयता वर्तवली गेली होती. त्या दृष्टीने भारतातील सर्व राज्यांनी तयारी ठेवावी आणि ऑक्सीजन प्लांटपासून औषधांपर्यंत सर्व सज्जता ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. या संदर्भाने आरोग्य विभागाच्या स्तरावर जय्यत तयारीही करण्यात आली होती. जुलै, ऑगस्ट महिन्यातील परिस्थिती आणि सप्टेंबर महिन्यातील परिस्थिती यामध्ये पडलेला फरक देशाला दिलासा देऊन गेला. कोरोनाची साथ सुरू झाली त्याच वेळी खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी जनतेने कोरोनासोबत जगायची सवय करून घेतली पाहिजे असे आवाहन केले होते. कोरोनाचे आव्हान फार मोठे असणार नाही असे प्रारंभी वाटले. मात्र त्याची संहारकता इतकी मोठी होती की त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसली. अर्थात संपूर्ण जगच यामध्ये होरपळले होते. त्यात भारताचीही अवस्था बिकट झाली. महाराष्ट्र, केरळ सारखी राज्ये त्यामध्ये अधिक होरपळली. मात्र या सर्व कटू आठवणींना आणि दोन वर्षाच्या प्रचंड नुकसानीला मागे टाकून आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. कोरोना नंतरचा बदललेला समाज आपल्या जगण्यात बदल करेल असे काहींना वाटते. गर्दीचे ठिकाण टाळणे, स्वतःचे आरोग्य जपणे यासाठी प्राधान्य दिले जाईल. त्याचबरोबरीने आर्थिक क्षेत्रातही अनेक बदल पाहायला मिळतील. ऑनलाइन माध्यमाने शिक्षणक्षेत्र आणि व्यापारामध्ये मोठा बदल होईल असे म्हटले जात होते ते बऱयाच अंशी खरे ठरले. मात्र शिक्षण क्षेत्रात ऑनलाईनच्या मर्यादाही दिसून आल्या. ऑनलाइन खरेदीला मिळणारा प्रतिसाद मात्र खूप मोठय़ा प्रमाणात वाढतोय आणि ऍमेझॉन सारख्या बलाढ्य कंपन्या यानिमित्ताने आपला पाया घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशी व्यावसायिकाला हे मोठे आव्हान आहे. देशांतर्गत उद्यमी आणि कल्पक व्यावसायिकांनीही या ऑनलाईन माध्यमाचा फायदा घेत आपला व्यवसाय उभारण्याची संधी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र पारंपरिक व्यवसाय, कारागिरांना, कामगारांना मोठय़ा संकटांना सामोरे जाण्याची वेळही या काळात आली. आता या सर्व क्षेत्रांना सावरण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. जनजीवन सामान्य होत जाईल तसतसे खाजगी क्षेत्र सुधारणा करू लागेल. मात्र शासकीय कामकाजात ऑनलाइन माध्यमाचा वापर होत ही यंत्रणा अधिक लोकाभिमुख झाली तर ती कोरोना काळानंतरची सुधारणा म्हणता येईल. सर्वात महत्वाची सुधारणा मानवी जीवनात होईल असे म्हटले जाते ते निश्चितच आहे. कोरोनाने अनेक बाबतीतील निरर्थकता समोर ठेवली. जगण्यासाठी आवश्यक बाबी आणि नात्यांची गरज लक्षात आणून दिली. निराशेच्या गर्तेतून बाहेर पडायचे असेल तर जवळ चांगले मित्र हितचिंतकांची गर्दी असावी हेही शिकवले. संकटाच्या काळात केवळ स्वतः नव्हे तर आपल्या आसपासच्या लोकांनाही सावरणे आवश्यक आहे आणि त्यासाठी काही प्रयत्न स्वतः केले पाहिजेत याची जाणीव प्रकर्षाने करून दिली. संकटे येतात तसेच त्याच्यावर मात करण्याचे रस्तेही दिसतात हे दाखवून दिले. अन् आरोग्याबरोबरच बेरोजगारीच्या आव्हानालाही सामोरे जावे लागले. कष्टकरी वर्गाला असे एखादे संकट आले तर आपल्या गावा शिवाय दुसरा पर्याय नाही आणि शेती शिवाय दुसरा मार्ग नाही हेही दाखवून दिले. कृषिप्रधान देशात शेतीवर अवलंबित असणारी लोकसंख्या कमी करणे हे सरकार समोरचे उद्दिष्ट असताना वाढत्या लोकसंख्येला रोजगार आणि कमी होत असणाऱया जमिनीवर अधिक कृषी उत्पादन असे परस्पर विरोधी आव्हान समोर उभे ठाकले आहे. उत्पादनाच्या क्षेत्रात नेमके कशाला प्राधान्य द्यावे, लोकांनी कोणत्या गोष्टींवर खर्च करावा आणि बचत किती, कशी करावी याबाबत प्रचंड मोठे अभियान राबवून जितकी जागृती झाली नसती तितके कोरोनाने जगायला शिकवले आहे. बरेच काही हिरावून नेले म्हणून रडत बसायचे की या संकटातून ही तरलो या विचाराने आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने पुढे जायचे हे ज्याने त्याने ठरवण्याची संधी या संकटाने दिली आहे. कोरोनासोबत जगताना समाजाला या सर्व अनुभवांचा येथून पुढच्या काळात लाभ होईल आणि मानवी जीवन यातून अधिक सुखकारक होण्याच्या दृष्टीने मानवाची वाटचाल होईल अशी अपेक्षा करूया.