For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लखनौची मोसमातील सर्वोच्च धावसंख्या

01:06 AM Apr 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
लखनौची मोसमातील सर्वोच्च धावसंख्या
Advertisement

धावांचा पाठलाग करताना पंजाब 56 धावांनी पराभूत, स्टोनिस-मेयर्सची अर्धशतके, यश ठाकूरचे 4 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ मोहाली

मोहालीच्या पीसीए आयएस बिंद्रा स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने पंजाब किंग्सचा 56 धावांनी पराभव केला. चालू हंगामातील हा संघाचा पाचवा विजय आहे. प्रारंभी, लखनौने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 257 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचे फलंदाज 19.5 षटकांत 201 धावांत सर्वबाद झाले.

Advertisement

258 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबच्या फलंदाजांची लखनौच्या गोलंदाजांनी दमछाक केली. सलामीला उतरलेला कर्णधार शिखर धवनला स्वस्तात माघारी जावे लागले. मार्कस स्टॉयनिसने शिखर धवनला झेलबाद केले. धवन एक धाव करून तंबूत परतला. त्यानंतर प्रभसिमरन सिंगला नवीन उल हकने 9 धावांवर बाद केले. यानंतर अथर्व तायडेनं चौफेर फटकेबाजी केली परंतु, 66 धावांवर असताना रवी बिष्णोईने त्याला झेलबाद केले आणि पंजाबला मोठा धक्का बसला. त्यानंतर सिकंदर रजा यश ठाकूरच्या गोलंदाजीवर 36 धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर रवी बिष्णोईने लियाम लिविंगस्टोनला 23 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. नवीन उल हकने सॅम करनला 21 धावांवर बाद केले. शेवटच्या फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे पंजाबचा डाव 201 धावांवर आटोपला.

स्टोईनिस, मेयर्सची जलद अर्धशतके

 फलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर काईल मेयर्स व स्टोईनिस यांची तुफानी अर्धशतके आणि आयुष बदोनी, निकोलस पूरन यांच्या चौफेर फटकेबाजीच्या बळावर लखनौ सुपर जायंट्सने आपयीएलमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या नोंदवताना शुक्रवारच्या सामन्यात निर्धारित 20 षटकांत 5 बाद 257 धावा जमवित यजमान पंजाब किंग्ससमोर 258 धावांचे कठीण आव्हान ठेवले.

प्रारंभापासूनच जोरदार फटकेबाजी सुरू केल्यानंतर चौथ्या षटकात लखनौचा कर्णधार केएल राहुल 9 चेंडूत 12 धावा काढून बाद झाल्यानंतर हा निर्णय काहीसा सार्थ ठरल्याचे वाटले. पण नंतरच्या फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेत मोठी धावसंख्या रचली. 41 धावसंख्येवर पहिला बळी गेल्यानंतर मेयर्स व आयुष बदोनी यांनी चौफेर फटकेबाजी केली. विशेषत: मेयर्स जास्त आक्रमक होता. त्याने केवळ 20 चेंडूतच नोबॉलवर षटकार ठोकून आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर तो उत्तुंग फटका मारताना झेलबाद झाला. मेयर्सने 24 चेंडूत 7 चौकार, 4 षटकारांचा पाऊस पाडत 225 च्या स्ट्राईकरेटने 54 धावा झोडपल्या.

बदोनीला नंतर स्टोईनिसकडून चांगली साथ मिळाली. या दोघांनी अधूनमधून चौकार, षटकारांची आतषबाजी करीत तिसऱ्या गड्यासाठी केवळ 46 चेंडूत 89 धावा तडकावल्या. बदोनी तिसऱ्या गड्याच्या रूपात बाद झाल्यानंतर पूरनने स्टोईनिससमवेत धावांचा ओघ कायम राखला. बदोनीने 24 चेंडूतच 3 चौकार, 3 षटकारांच्या मदतीने 43 धावा फटकावल्या. पूरन व स्टोईनिस यांनी संघाचे द्विशतक 16 षटकांत नोंदवले. स्टोईनिस व पूरन यांनी चौथ्या गड्यासाठी 29 चेंडूत 76 धावा झोडपल्या. स्टोईनिस 19 व्या षटकात करनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 40 चेंडूत 6 चौकार, 5 षटकारांसह 72 धावा तडकावल्या. संघाच्या 250 धावा अखेरच्या षटकात फलकावर लागल्या. याच षटकात पूरन रिव्हर्स फटका मारताना पायचीत झाला. त्याने केवळ 19 चेंडूत 45 धावा फटकावल्या. दीपक हुडा 11 व कृणाल पंड्या 2 चेंडूत 5 धावांवर नाबाद राहिले.

संक्षिप्त धावफलक : लखनौ सुपरजायंट्स 20 षटकांत 5 बाद 257 : केएल राहुल 9 चेंडूत 12, मेयर्स 24 चेंडूत 7 चौकार, 4 षटकारांसह 54, आयुष बदोनी 24 चेंडूत 43, स्टोईनिस 40 चेंडूत 72, निकोलस पूरन 19 चेंडूत 7 चौकार, 1 षटकारासह 45, हुडा 6 चेंडूत नाबाद 11, कृणाल पंड्या 2 चेंडूत नाबाद 5, गोलंदाजी : रबाडा 2-52, अर्शदीप 1-54, करन 1-38, लिव्हिंगस्टोन 1-19.

पंजाब सुपर किंग्स 19.5 षटकांत सर्वबाद 201 (अथर्व तायडे 66, सिकंदर रजा 36, लिव्हिंगस्टोन 23, सॅम करन 21, जितेश शर्मा 24, नवीन उल हक 30 धावांत 3 बळी, यश ठाकूर 37 धावांत 4 बळी, रवि बिष्णोई 41 धावांत 2 बळी).

आयपीएलमध्ये यंदाच्या हंगामात लखनौची सर्वोच्च धावसंख्या

पंजाबविरुद्ध सामन्यात लखनौने आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या उभी केली. अवघ्या 6 धावा कमी पडल्यामुळे लखनौ सुपर जायंट्सला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा विक्रम मोडता आला नाही. लखनौ संघाने निर्धारित 20 षटकांमध्ये 5 बाद 257 धावा केल्या. आयपीएल इतिहासातील ही दुसरी सर्वात मोठी खेळी ठरली. आयपीएलमध्ये सर्वात मोठी धावसंख्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर म्हणजेच आरसीबीच्या नावावर आहे. आरसीबीने 2013 साली पुणे वॉरिअर्स इंडिया संघाविरुद्ध तब्बल 263 धावा कुटल्या होत्या. हा विक्रम अद्याप अबाधीत आहेत.

आयपीएलमध्ये सर्वोत्तम धावसंख्या साकारणारे संघ

263  आरसीबी  वि. पुणे वारिअर्स, 2013

257  लखनौ वि पंजाब, 2023

248  आरसीबी वि  गुजरात, 2016

246  चेन्नई विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 2010

245  कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स, 2018

Advertisement
Tags :

.