लक्ष मालिकाविजयाकडे अन् विराटच्या फॉर्मकडे
झगडणाऱया विंडीजविरुद्ध आज भारताची दुसरी टी-20 : चहर उपलब्ध नसल्यास ‘विनिंग कॉम्बिनेशन’मध्ये बदल अटळ, विराट खराब फॉर्ममधून बाहेर येण्याची अपेक्षा
वृत्तसंस्था /कोलकाता
यजमान भारतीय संघ झगडणाऱया विंडीजविरुद्ध आज (शुक्रवार दि. 18) होणाऱया दुसऱया टी-20 सामन्यात एकीकडे मालिकाविजयासाठी प्रयत्नशील असेल. शिवाय, दुसरीकडे, विराट कोहली फॉर्ममध्ये परतण्याबाबतही महत्त्वाकांक्षी असेल. विंडीजचा संघ या पूर्ण दौऱयात सातत्याने झगडत आला असून त्यांच्यावर वर्चस्वाची मालिका कायम राखण्याचे भारताचे अर्थातच प्रयत्न असतील आणि विराट बहरात परतला तर हा खऱया अर्थाने ‘सोने पे सुहागा’ ठरेल. सायंकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.
यापूर्वी, अहमदाबादेत संपन्न झालेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत विंडीजचा 3-0 असा एकतर्फी धोबीपछाड केल्यानंतर तीच विजयी घोडदौड भारताने पहिल्या टी-20 सामन्यातही कायम राखली. वास्तविक, टी-20 मध्ये विंडीजचा खेळ नेहमी बहरतो. पण, पहिल्या टी-20 मध्ये त्यांना अजिबात सूर सापडला नसल्याचे दिसून आले. येथे आणखी एक विजय संपादन केल्यास रोहितला पूर्ण वेळ कर्णधार म्हणून नियुक्त केल्यानंतर भारताचा हा सलग तिसरा मालिकाविजय असेल.
विराटचा खराब फॉर्म चिंतेचा
विराट कोहलीचा खराब फॉर्म ही मात्र भारतासाठी सर्वाधिक चिंतेची बाब ठरत आली आहे. विराटला या मालिकेत अनुक्रमे 8, 18, 0 व 17 अशा किरकोळ धावांवर समाधान मानावे लागले आहे. विराट लवकरच बहरात परतेल. पण, सर्वप्रथम त्याच्या टीकाकारांनी व प्रसारमाध्यमांनी या विषयापासून दूर रहावे, असे रोहितने यापूर्वी जाहीरपणे म्हटले आहे.
यापूर्वी, पहिल्या टी-20 लढतीत रोहित शर्माने पॉवर प्लेचा उत्तम लाभ घेत 19 चेंडूत 40 धावांची आतषबाजी केली आणि याचा बराच फटका ओडियन स्मिथला बसला होता. रोहितच्या फटकेबाजीमुळे ओडियनच्या एकाच षटकात 22 धावांची लयलूट केली गेली. दुसऱया बाजूने इशान किशनला सूर सापडला नसला तरी भारताने पॉवर प्लेच्या षटकात केलेल्या 58 धावांमध्ये रोहितचा वाटा सिंहाचा राहिला होता.
रोहित त्यावेळी आठव्या षटकात बाद झाल्यानंतर कोहलीला धावा जमवण्याची सर्वोत्तम संधी होती. शिवाय, विंडीजचे गोलंदाज तुलनेने बरेच झगडत होते. पण, तरीही विराटचा खराब फॉर्म जैसे थे राहिला. त्याला 13 चेंडूत 17 धावांवर परतावे लागले. आयपीएल 2022 मधील सर्वात महागडे बाय-आऊट ठरलेला इशान किशन नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करु शकला नाही. मात्र, स्ट्राईक रोटेट करण्याच्या आघाडीवरील त्याचे अपयश आणखी चिंतेचे होते.
रोहितच्या फटकेबाजीमुळे मात्र भारताचे एककलमी वर्चस्व प्रस्थापित झाले. त्यावर नंतर सुर्यकुमार यादव व वेंकटेश अय्यर यांनी कळस चढवला. भारताने गोलंदाजी अष्टपैलू वेंकटेश अय्यरसह सहा गोलंदाजांच्या कॉम्बिनेशनवर भर देण्याचा निर्णय घेतल्यानंतर बहरातील श्रेयस अय्यरला संघाबाहेर रहावे लागेल, हे निश्चित होते. आता दुसऱया टी-20 मध्ये भारताची रणनीती काय असेल, याची उत्सुकता असेल.
सामना जिंकून देईतोवर क्रीझवर टिकून राहण्यावर माझा भर होता आणि ही रणनीती फलद्रूप ठरली, याचा आनंद आहे. मधल्या षटकात 20-25 धावांची आवश्यकता असताना ज्या-ज्यावेळी बाद झालो, त्या-त्यावेळी मला सातत्याने त्याची खंत जाणवत राहत आली आहे. ते टाळणे माझा प्राधान्यक्रम असतो.
-भारताचा मध्यफळीतील फलंदाज सुर्यकुमार यादव
दीपक चहरबाबत चित्र अद्याप स्पष्ट नाही
यापूर्वी, पहिल्या टी-20 लढतीत गोलंदाजीत आपला कोटा पूर्ण करु न शकलेला दीपक चहर आजच्या लढतीसाठी उपलब्ध असेल का, याबाबत सामन्याच्या पूर्वसंध्येपर्यंत कोणतेही चित्र स्पष्ट नव्हते. चहर क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला आणि 4 षटकांचा कोटा पूर्ण करण्यापूर्वीच त्याला मैदान सोडावे लागले. त्या लढतीत चहरचे पृथक्करण 3 षटकात 28 धावात 1 बळी, असे राहिले.
अष्टपैलूंवर भर असल्याने श्रेयसला वगळावे लागले : रोहित शर्मा
‘श्रेयस अय्यर अव्वल दर्जाचा फलंदाज असून संघातून वगळले जाणे हे त्याच्यावर अन्यायकारक आहे. मात्र, संघाची गरज सर्वाधिक महत्त्वाची असते. तूर्तास, अष्टपैलू खेळाडूंवर आमचा भर आहे आणि त्या अनुषंगाने हा निर्णय घ्यावा लागला’, असे भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.
अलीकडेच संपन्न झालेल्या आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये श्रेयस अय्यर तिसऱया क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला असला तरी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला अष्टपैलूत्व सिद्ध करावे लागेल, असे रोहितने यावेळी स्पष्ट केले. बुधवारचा दिवस श्रेयससाठी संमिश्र ठरला होता. एकीकडे, त्याला केकेआरने 12.25 कोटी रुपयांच्या बोलीसह करारबद्ध केले. पण, नंतर त्याच दिवशी सायंकाळी विंडीजविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 लढतीत तो अष्टपैलू नसल्याने भारतीय संघात त्याला स्थान लाभले नाही. उसळत्या माऱयाविरुद्ध श्रेयसचे तंत्र फारसे चालत नाही आणि ही सुद्धा त्याची कमकुवत बाजू असल्याचे एकंदरीत चित्र आहे.
संभाव्य संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकुर, रवि बिश्नोई, यजुवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, कुलदीप यादव, हरप्रीत ब्रार.
विंडीज : केरॉन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन ऍलन, डॅरेन ब्रेव्हो, रोस्टन चेस, शेल्डॉन कॉट्रेल, डॉमिनिक ड्रेक्स, जेसॉन होल्डर, शाय होप, अकिल होसेन, ब्रॅन्डॉन किंग, रोव्हमन पॉवेल, रोमारिओ शेफर्ड, ओडियन स्मिथ, काईल मेयर्स, हेडन वॉल्श ज्युनियर.
सामन्याची वेळ : सायं. 7 वा.