लक्षद्वीपबाबत इस्रायलची मोठी घोषणा
समुद्राचे पाणी शुद्ध करण्याच्या प्रकल्पावर काम करण्यास राजी : इस्रायली तंत्रज्ञान लक्षद्वीपसाठी वरदान
वृत्तसंस्था/ तेल अवीव
मालदीव सरकारमधील युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला उपमंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान मोदींविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर आता इस्रायलही संतप्त झाले आहे. लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदींना मरियम यांनी ‘जोकर’ आणि ‘इस्रायलचे कठपुतळी’ असे संबोधले होते. या खेदजनक टिप्पणीला भारतीयांनी जोरदार विरोध केल्यावर त्यांनी आपले ट्विट डिलीट केले. भारताच्या तीव्र विरोधानंतर मालदीव सरकारने तीन मंत्र्यांना निलंबित केले आहे. याचदरम्यान आता इस्रायल उघडपणे या संपूर्ण वादात उतरला आहे. लक्षद्वीपमधील समुद्राचे पाणी शुद्ध करण्याच्या प्रकल्पावर काम करण्यास आपला देश तयार असल्याचे इस्रायलने जाहीर केले आहे.
भारतातील इस्रायली दुतावासाने ट्विट करत यासंबंधी माहिती दिली. लक्षद्वीपमधील समुद्राचे खारट पाणी स्वच्छ करून ते पिण्यायोग्य बनवण्यासाठी इस्रायल मदत करू शकते असे स्पष्ट करण्यात आले आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी इस्रायल पूर्णपणे तयार असल्याचे इस्रायली दुतावासातील प्रवक्त्याने सांगितले. लक्षद्वीप चारही बाजूंनी समुद्राने वेढलेले असून तेथे गोड्या पाण्याची मोठी समस्या आहे. समुद्राच्या खारट पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करण्याचे कौशल्य इस्रायलकडे आहे. लक्षद्वीपमध्ये पर्यटन वाढवण्यासाठी हे खूप महत्त्वाचे ठरू शकते.