रेल्वेत आता मिळणार ब्लँकेट, उशी अन् चादर
रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी होताच रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. आता रेल्वेगाडय़ांमधून प्रवास करताना ब्लँकेट, उशी आणि चादर स्वतःसोबत नेण्याची गरज भासणार नाही. कोरोनापूर्व काळाप्रमाणेच आता रेल्वेगाडय़ांमध्ये या सर्व गोष्टी रेल्वेकडून उपलब्ध करण्यात येणार आहेत. म्हणजेच शुक्रवारपासून रेल्वेगाडय़ांमध्ये पूर्वीप्रमाणेच सर्व सुविधा उपलब्ध होतील.
रेल्वे मंत्रालयाकडून 10 मार्च रोजी जारी आदेशानुसार कोरोना संकटाच्या प्रारंभी लादण्यात आलेले निर्बंध त्वरित प्रभावाने हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारचा कोरोनाप्रतिबंधक नियम लागू असणार नाही. याचबरोबर रेल्वेगाडय़ांमध्ये पडदे देखील पूर्वीप्रमाणेच लावण्यात येणार आहेत.
कोरोनापूर्व काळात प्रवासादरम्यान लोकांना 300 रुपयांचे किट उपलब्ध करविण्याची व्यवस्था होती. या किटमध्ये प्रवाशांना नॉन वोवन ब्लँकेट, नॉन वोवन बेडशीट, नॉन वोवन पिलो, पिलो कव्हर, डिस्पोजेबल बॅग, टूथपेस्ट, टूथब्रश, हेअर ऑईल, कंगवा, सॅनिटायजर सॅशे, पेपरसोप आणि टिश्यू पेपर देण्यात येत होती. ही व्यवस्था काही राजधानी एक्स्प्रेसमध्ये सुरू झाली होती.