रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पिस्टलसह पकडले
कराडात गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई
प्रतिनिधी /कराड
बेकायदा पिस्टल बाळगलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास गुरूवारी कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने गजाआड केले. त्याच्याकडून 45 हजार रूपये किमतीचे पिस्टल हस्तगत करण्यात आले. सोमनाथ अधिकराव सूर्यवंशी (वय 31, रा. ओगलेवाडी, ता. कराड) असे पोलिसांनी पकडलेल्या संशयित गुन्हेगाराचे नाव आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान संशयित सोमनाथ हा हजारमाची ग्रामपंचायतीचा सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमनाथ अधिकराव सूर्यवंशी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या हालचालीवर कराड शहर पोलीस नजर ठेवून होते. दरम्यान गुरूवारी सोमनाथ सूर्यवंशी हा बेकायदा पिस्टल घेऊ कराड- पाटण रोडवर फिरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांना मिळाली होती. पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर व त्यांच्या पथकास सूचना दिल्या. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने कराड-पाटण रोडवर सापळा रचून संशयिताच्या हालचालींवर पाळत ठेवली. त्यानंतर अचानक झडप टाकून संशयित सोमनाथ सूर्यवंशी याला ताब्यात घेतले. त्याची जाग्यावरच दोन पंचासमक्ष जागीच अंगझडती घेतली असता कंबरेच्या पाठीमागे पॅन्टला अडकवलेले पिस्टल आढळून आले. एक सिल्व्हर रंगाचे लोखंडी व लोखंडी मुठीस लाकडी कव्हर असलेले देशी बनावटीचे मॅगझीनसह पिस्टल मिळून जप्त करण्यात आले. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अमित बाबर, पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर, संतोष सपाटे, सतीश जाधव, पोलीस हवालदार जयसिंग राजगे, नितीन येळवे, पोलीस नाईक संजय जाधव, सचिन साळुंखे, संदीप कुंभार, मारुती लाटणे, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, संग्राम पाटील, सुजीत दाभाडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.