राष्ट्रपतींने केले पवित्र कुंभस्नान, पूजन
वृत्तसंस्था / प्रयागराज
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाकुंभमेळ्यात सहभागी होऊन पवित्र कुंभस्नान केले आहे. प्रयागराज येथील संगम तीर्थक्षेत्रावर सोमवारी त्यांनी त्रिवेणी संगमस्थळी पवित्र डुबकी घेतली. तसेच त्या स्थानी पूजाअर्चाही केली. त्यांच्या पवित्र स्नानासाठी तरंगत्या तराफ्याची व्यवस्था करण्यात आली होती. या तराफ्यावरुन संगमात उतरुन त्यांनी पवित्र डुबकी घेतली. यावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. कुंभमेळ्यास सहभागी होऊन संगम स्नान करणाऱ्या त्या भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती आहेत. हा मान दिवंगत राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनाही मिळाला होता.
काही दिवसांपूर्वी या महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन 30 भाविकांचा मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेनंतर राष्ट्रपतींचा हा कार्यक्रम होत असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. तसेच 10 मिनिटांसाठी संगमावर भविकांचा ओघ थांबविण्यात आला होता. राष्ट्रपतींचा कार्यक्रम पार पडल्यानंतरच अन्य भाविकांसाठी मार्ग मोकळा करून देण्यात आला होता.
स्नानापूर्वी पूजाअर्चा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पवित्र स्नान केल्यानंतर संमगस्थळी पूजाअर्चा केली. त्यानंतर, त्यांनी ‘महाकुंभमेळा डिजिटल अनुभव केंद्रा’ला भेट दिली. आपल्या महाकुंभ सहभागासंबंधी काही नोंदी त्यांनी या कक्षात केल्या. तसेच अन्य भाविकांची भेट घेतली. या महाकुंभाच्या व्यववस्थापनाची माहिती त्यांनी घेतली. प्रयागराज क्षेत्रात त्यांचे वास्तव्य आठ तास होते. प्रयागराज नगरीतील इतर महत्त्वाच्या धार्मिक तीर्थक्षेत्रांनाही त्यांनी भेट दिली, अशी माहिती देण्यात आली.
अनेक स्थळांना भेट
कुंभस्नान करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी संगमावरील स्थलांतरक्षम पक्ष्यांना खाऊ घालून आपले निसर्गप्रेम दर्शवून दिले. स्नानानंतर त्यांनी पवित्र ‘अक्षयवट’ वृक्षाचे दर्शन घेतले. हा वृक्ष सनातन धर्माच्या अमरत्वाचे प्रतीक म्हणून मानण्यात येतो. या वृक्षाचे उल्लेख अनेक प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये असून हे स्थान हिंदू धर्माचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून महत्त्वाचे आहे. त्यानंतर त्यांनी प्रयागराज येथील ‘बडे हनुमान’ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. हे ऐतिहासिक मंदिर आहे. या मंदिरात त्यांनी देशाच्या समृद्धीसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. त्यांनी प्रयागराज येथील अन्य काही पवित्र क्षेत्रांनाही भेट देऊन पूजा आणि अनुष्ठानात भाग घेतला.
राजेंद्र प्रसाद यांच्या आठवणींना उजाळा
भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्या कार्यकाळात महाकुंभ मेळ्यात पवित्र त्रिवेणीसंगम स्नान केले होते. त्यावेळी त्यांनी संगमावर विशिष्ट स्थानी उभे राहून संगमावर आलेल्या लक्षावधी भाविकांचे दर्शन घेतले होते. ते स्थान तेव्हापासून ‘राष्ट्रपती दृष्टीस्थान’ या नावाने परिचित झाले आहे.